पॅडमॅन – एका संवेदनशील विषयाला हाताळण्याचा प्रयत्न – निहार सप्रे

1,842

माझ्या आठवणीतला एक किस्सा सांगतो. मी लहान होतो. आईला पाळीचा खूप त्रास व्हायचा आणि मी लहान असल्यानं तिला काय होतंय हे मला कळायचं नाही पण हे मात्र जाणवायचं की तिचा मूड ठीक नाहीये. कधीकधी ती चिडून उगाच ओरडायची किंवा रपटेही लावायची. तेव्हा तिचा खूप राग यायचा. ही असं का वेड्यासारखं वागतीये? असं वाटायचं. या व्यतिरिक्त एक गोष्ट प्रकर्षानं जाणवायची ती म्हणजे कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर ती काही “विशेष” कापडं वाळत घालायची. ती कापडं इतर कपड्यांपासून थोडी दूर वाळत घातलेली असत. तेव्हा प्रश्न पडायचा की, आई ती कापडं वेगळी वाळत का घालते? नंतर जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षणाचे धडे चालू झाले तेव्हा या प्रश्नांचा उलगडा थोड्या फार प्रमाणात होऊ लागला. तेव्हा कळालं की, स्त्रियांच्या आयुष्यात काही दिवस असे येतात, ज्या दिवसांमध्ये त्यांच्या योनीमार्गातून रक्त बाहेर येतं. पण त्यामागचं शास्त्रीय कारण काय? या गोष्टीचा उलगडा पूर्णपणे झालाच नाही. हा किस्सा आहे साधारण वीस वर्षांपूर्वीचा. वीस वर्षं झाली पण आजही “पाळी” हा विषय लैंगिक शिक्षण देण्याची पहिली पायरी आहे. आजही तो एक चर्चेचा विषय आहे. आजही मुलं – मुली आणि त्यांचे पालक यांना पाळीविषयी अनेक प्रश्न भेडसावतात, त्यांच्यात या विषयी खुला संवाद होत नाही, त्यांना त्यांच्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरं मिळत नाहीत. आणि जरी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तरी अनंत सामाजिक आणि धार्मिक बंधनांमुळे त्यांना ती उत्तरं आपल्या मेंदूत पूर्णपणे उतरवण्याची तयारी नसते. असं का होत असेल?

एक कारण असू शकतं ते म्हणजे आजही पाळी या गोष्टीबद्दल आपल्या समाजात प्रचंड गुप्तता बाळगली जाते. घरातल्या पुरुषांना त्याबद्दल बोलण्याची लाज वाटते किंवा त्यांना त्याबद्दल काहीच पडलेलं नसतं आणि स्त्रिया स्वतःला होणाऱ्या त्रासाबद्दल काहीच बोलत नाहीत कारण वर्षानुवर्षे समाजानं त्यांना तसंच घडवलंय. दुसरं एक कारण असू शकतं ते म्हणजे पाळीला प्रथा, परंपरा आणि मुख्यतः धार्मिक पातळीवर इतकं जास्त महत्व दिलं गेलंय की, त्याविषयी उघडपणे बोलणं म्हणजे प्रथा, परंपरा, धर्म यांबद्दल बोलणं. आणि आपल्या समाजात कोणाची धार्मिक अस्मिता कधी आणि काय कारणाने दुखावली जाईल हे सांगता येत नाही. तिसरं कारण असू शकतं ते म्हणजे पाळीसारख्या नैसर्गिक गोष्टीकडे प्रॉब्लेम किंवा अडचण या दृष्टीकोनातून बघितलं जात असल्याने त्याबद्दल समाजात एक प्रकारची घृणाच दिसते. म्हणजे असा संवाद बऱ्याचदा ऐकायला मिळतो – “हा स्त्रीयांचा ‘प्रश्न’ आहे. त्यात पुरुषांची लुडबुड कशाला?” “ते कपडे बाजूला ठेवायला पाहिजेत कारण ते घाण आहेत” वगैरे. मुळात पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा? किंवा ती गोष्ट घाण कशी? उलट पाळी नं येणं हा प्रॉब्लेम म्हणायला हवा ना?

तर हे सर्व लिहिण्यामागचं प्रयोजन म्हणजे नुकताच पॅडमॅन (दिग्दर्शक – आर. बल्की.) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट तसा बाळबोध आहे शिवाय त्यामध्ये पाळीसंबंधी प्रश्नांबाबत किंवा त्याच्याशी संबंधित जुनाट सामाजिक, धार्मिक रूढी – परंपरांविषयी खोलवर जाऊन काहीच बोललं गेलं नाहीये. खरंतर तसं करायला खूप वाव होता पण चित्रपटातून एक बरी गोष्ट समोर येते ती म्हणजे एक पुरुष पात्र पाळीसंबंधी काही करताना, बोलताना दिसतं. तेवढंच काय ते व्यावसायिक चित्रपटांना अनुसरून ठीक!

पॅडमॅनची कथा बेतली आहे अरुणाचलम मुरुगानाथम या व्यक्तीच्या आयुष्यावर. अरुणाचलम यांनी महागड्या सॅनिटरी पॅडला पर्याय मिळावा म्हणून स्वस्तात पॅड बनवणाऱ्या मशीनचा शोध लावला आणि केवळ भारतातील आर्थिकदृष्ट्या सामान्य स्तरातील स्त्रियांना परवडतील असे पॅड उपलब्ध होतील याचीच व्यवस्था केली नाही तर स्त्रियांना सॅनिटरी पॅड वापरण्याचे महत्वही पटवून दिलं. एवढंच नाही तर त्यांच्या या शोधामुळे अनेक स्त्रियांना रोजगारही उपलब्ध झाला.

पॅडमॅन मधील मुख्य पात्र – लक्ष्मी प्रसाद (अक्षय कुमार) हा आर्थिकदृष्ट्या अतिशय सर्वसामान्य स्तरातला पुरुष. पाळीच्या काळात आपल्या पत्नीची (राधिका आपटे) घाणेरडे कपडे वापरण्याची पद्धत, त्यातून तिच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आणि महागडे सॅनिटरी पॅड विकत आणणं आपल्याला शक्य नाही या बाबी लक्षात आल्यानंतर लक्ष्मी स्वतःहून पॅड बनवायचं ठरवतो आणि त्यातून तो सॅनिटरी पॅड स्वस्तात बनवणाऱ्या मशीनचा शोध लावतो. हा शोध लावत असताना लक्ष्मीला कोणत्या सामाजिक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्या अडचणींवर मात करून तो कशा प्रकारे मशीनचा शोध लावतो आणि देशाचा पॅडमॅन बनतो याची कथा म्हणजे “पॅडमॅन”.

वास्तविक पाहता अशा प्रकारच्या विषयावर चित्रपट बनवणं आणि तो प्रदर्शित करणं हे व्यावसायिक दृष्ट्या फक्त धोकादायकच नाहीये तर आव्हानात्मकही आहे. कारण मुळातच भारतीय समाजामध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या आरोग्याबाबत उदासीनता दिसते आणि त्यातही स्त्रियांचे आरोग्य ही तर समाजाच्या दृष्टीने दुर्लक्षित बाब आहे. कारण पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रचंड पगडा असणाऱ्या भारतीय समाजात स्त्रिया या सर्वाधिक खालच्या स्तरात येतात त्यामुळं त्यांच्या आरोग्याला समाज फार महत्व देत नाही आणि त्यातही पाळी सारख्या विषयावर उघडपणे बोलणं म्हणजे आपण काहीतरी फार भयंकर करतोय, धर्म, संस्कृती, रूढी – परंपरा यांच्या विरोधात करतोय असाच समाजाचा समज असतो. त्यामुळं अशा परिस्थितीत पॅडमॅन सारखा चित्रपट निर्माता / दिग्दर्शकाने बनवला याचं कौतुकच करायला हवं. पण चित्रपट संपल्यावर मात्र प्रेक्षकांकडून कशाचं कौतुक होतं? तर लक्ष्मीनं लावलेल्या मशिनच्या शोधाचं. उलट लक्ष्मीचं पात्र त्याच्या पत्नीबद्दल, तिला पाळीमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल, समाजाने तिच्यावर घातलेल्या बंधनांबद्दल कशा प्रकारे संवेदनशील आहे यावर निर्मात्यांनी भर दिला असता तर आणखी बरं झालं असतं. कारण आज सॅनिटरी पॅड किंवा तत्सम आरोग्याविषयी वस्तू स्वस्तात उपलब्ध होण्याकरिता वेगवेगळे शोध लावण्याची गरज तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त गरज आहे ती समाजाने आणि खासकरून पुरुषांनी स्त्रियांच्या आरोग्याविषयी, त्यांना पाळीमध्ये होणाऱ्या त्रासाविषयी संवेदनशील बनण्याची किंवा एकुणच स्त्रियांच्याकडे बघण्याचा पारंपारिक दृष्टीकोन बदलण्याची. तर असे अनेक मुद्दे चित्रपटात येतात जिथे चित्रपटाची कथा मार खाते. आणखी एक उदाहरण द्यायचे म्हणजे पाळीमध्ये स्त्रियांना घराबाहेर झोपावे लागते किंवा इतर लांच्छनास्पद गोष्टी कराव्या लागतात या विषयांना चित्रपटात हात तर लावलाय पण पुढे त्या विषयी काहीच सविस्तर बोललं गेलं नाहीये किंवा त्या गोष्टींवर कोणत्याच प्रकारे टीका झालेली दिसत नाही. वास्तविकतेमध्ये पाळीविषयी समाजात असणाऱ्या घाणेरड्या प्रथांविरोधात दिग्दर्शक बोलू शकला असता किंवा टीका करू शकला असता, पण त्यानं तसं काहीच केलं नाहीये. उलट एका लहानग्या मुलीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा सर्व स्त्रिया गाणं म्हणत चं कौतुक करताना दिसतात. का? तर तोही सामाजिक प्रथेचाच एक भाग आहे. पाळी आली म्हणजे ती लहानगी मुलगी आता “स्त्री” झाली, मूल जन्माला घालायला परिपक्व झाली म्हणून तिचं कौतुक करायचं ही कसली प्रथा? म्हणजे एकतर पुन्हा आपण पाळीकडे निसर्गनियम म्हणून नं बघता काहीतरी खास गोष्ट आहे या उद्देशातून बघतो आणि दुसरं म्हणजे त्या लहानग्या मुलीचा कोवळेपणा घालवून तिला एका साचेबध्द चौकटीमध्ये अडकवतो. यावर निर्मात्यांकडून असं उत्तर येऊ शकतं की, तो चित्रपटाचा मुद्दाच नाहीये पण जर निर्माते, क्रिएटीव लिबर्टीच्या नावाखाली अक्षय कुमार सारख्या धडधाकट, देखण्या, दणकट व्यक्तीला लक्ष्मी सारखं सर्वसामान्य व्यक्तीचं पात्र करायला घेऊ शकतात तर त्याच लिबर्टीच्या नावाखाली त्यांनी स्त्रियांवर घातल्या जाणाऱ्या बुरसट बंधनांविषयी बोलण्याचं स्वातंत्र्य घ्यायला काहीच हरकत नव्हती. दुसरा हरकत घेण्याचा मुद्दा म्हणजे जेव्हा सोनम कपूरचं पात्र लक्ष्मीला पॅड विकण्यासाठी मदत करू लागतं तेव्हा ती त्याला एक वाक्य बोलते ज्याचा मतितार्थ आहे, ‘एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजू शकते’. मुळात मुद्दा हाच आहे की, इथंच आपला समाज आणि खासकरून पुरुष मार खातात. आपल्या संपूर्ण चर्चेचा उद्देशच हा असायला हवा की, स्त्रीकडे केवळ स्त्री म्हणून न बघता एक माणूस म्हणून बघणं आणि तिच्या समस्यांना समजून घेऊन, त्याविषयी उघडपणे बोलणं आणि त्यांच्याकडे संवेदनशील नजरेनं बघणं कसं गरजेचं आहे. तरच आपण प्रगत झालो असं म्हणता येईल ना? नुसतं स्वस्तात पॅड बनवणाऱ्या मशीनचा शोध लावला म्हणून ती व्यक्ती ग्रेट आहे असं म्हणून कसं चालेल? त्या व्यक्तीची जी संवेदना आहे, ती आपल्यात आहे की नाही हे बघायला नको का? शिवाय पाळीविषयी ज्या जुनाट, बुरसटलेल्या कल्पना आपण उराशी बाळगून असतो, त्याचाही विचार व्हायला हवा. नाही का?

असं नाहीये की, या चित्रपटासंबंधी सर्वच काही नकारात्मक आहे. मुळात आधी लिहिल्याप्रमाणे अशा विषयाला हात घालणं आणि संवेदनशील दृष्टीकोनातून चित्रपट बनवणं आणि तेही व्यावसायिक चित्रपट बनवणं कौतुकास्पदच आहे. शिवाय चित्रपटातील काही प्रसंग छानच आहेत. उदाहरणार्थ, लक्ष्मीची पत्नी ५५ रुपयांचे पॅड घ्यायचं नाकारते पण ५१ रुपये देवाच्या प्रसादासाठी मागते. यातून लक्ष्मीला पडणारा प्रश्न एक प्रेक्षक म्हणून आपलाच प्रश्न होतो. शिवाय त्या प्रसंगातून स्त्रियांवर होणारे जुनाट संस्कारही दृष्टीस पडतात. एका प्रसंगामध्ये लक्ष्मी त्याने बनवलेल्या पॅडचा प्रयोग स्वतःवर करत असतो. तेव्हा त्याने जनावराचे रक्त पॅडवर पडत राहील अशी व्यवस्था केलेली असते. काही काळानंतर पॅडमधून रक्त बाहेर पडतं आणि लक्ष्मीच्या पँन्टवर पसरतं. सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात, चर्चा सुरु होते आणि लक्ष्मीला त्याची इतकी लाज वाटते की, तो नदीमध्ये उडी मारतो. नंतर लोक त्याला विकृत म्हणतात, वेडा म्हणू लागतात. त्याने नदीचं पाणी अपवित्र केलं असा आरोप करतात. त्याची पत्नी त्याला सोडून जाते. त्याला गावाबाहेर काढलं जातं. त्या संपूर्ण प्रसंगावरून आपलं मन एक प्रेक्षक म्हणून खिन्न होतं आणि आपल्याला अनेक प्रश्न भेडसावू लागतात. जेव्हा स्त्रियांबरोबर खरंच असं काही घडत असेल तेव्हा त्यांना किती लांच्छनास्पद परिस्थितीमधून जावं लागत असेल? त्या घराबाहेर पडणं का टाळत असतील? आणि या सर्वाला जवाबदार कोण? स्वतः ती स्त्री की स्वतःला प्रगत म्हणवून घेणारा आपला समाज? या व अशा काही सीन्समधून आपल्याला लक्ष्मीची त्याच्या पत्नीबद्दल वाटणारी काळजी दिसते, पाळीकडे बघण्याचा त्याचा संवेदनशील दृष्टीकोन दिसतो आणि एक प्रेक्षक म्हणून अनाहूतपणे आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते आणि त्यानं हातात घेतलेलं काम कसंही करून पूर्ण व्हायला हवं असंच वाटू लागतं. मुळात मुद्दा हा की, आपण पाळी या गोष्टीकडे घृणास्पद, नकारात्मक पद्धतीने न बघता किंवा पाळी आलेल्या स्त्रीची चेष्टा, तिच्याबद्दल गॉसिप न करता पाळी या प्रक्रियेबद्दल संवेदनशील बनायला पाहिजे आणि पाळीला अवास्तव महत्व न देता ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे या दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे. समाजाने घालून दिलेला पायंडा म्हणून “त्या” चार दिवसात तिला विश्रांती मिळणं गरजेचं आहे, असं गोड कारण द्यायचं आणि तिला घराबाहेर झोपायला सांगायचं, ते चार दिवस काही ठराविक कामांमध्ये आणि बाकी महिनाभर सगळ्या कामांमध्ये तिला राबवून घ्यायचं याला काय अर्थ आहे?

शेवटी काय? तर अशा प्रकारचे चित्रपट बनवण्याचं धाडस निर्माते / दिग्दर्शक करतायत हे कौतुकास्पद आहेच पण त्याहीपेक्षा गरज आहे ती म्हणजे एक समाज म्हणून आपण अशा प्रकारच्या विषयांकडे संवेदनशील नजरेनं बघणं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये ती संवेदना रुजवणं गरजेचं आहे तरच आपला समाज प्रगतीच्या मार्गावर आहे असं आपल्याला म्हणता येईल.

Comments are closed.