प्रॅक्टिकल आणि रॅशनल होत प्रेम ‘जबाबदारी’ घेतं, तेव्हा……. प्रणव सखदेव

आज विशी-पंचविशीत असलेल्या मुलामुलींच्या रिलेशनशिप्सबद्दलच्या कन्सेप्ट कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी पूर्णपणे नाहीच समजून घेता येत. मग म्हणावंच लागतं, लेट इट बी !

1,791

व्हॉट्सअ‍ॅप? आज काय प्लॅन? ईशानी काय म्हणतेय? तिला माझा ‘हाय’ सांग.

काल तू मला व्हॉट्सअ‍ॅपवर v4 karte असा मेसेज पाठवला. नंतर मी अर्धा तास v4 म्हणजे काय असेल, याचा ‘विचार’ करत डोकं खाजवत बसलो होतो. मग शेवटी माझी टय़ूब पेटली. ‘विचार करते’ असं म्हणायचं होतं तुला ! तेव्हाच ठरवलं, तुला इमेल करायचा. मुहूर्तही छान जमून आलाय, व्हॅलेण्टाइन्स डे!

सो पहिल्यांदा हॅपी व्हॅलेण्टाइन्स डे.
गंमत आहे ना, तसं आपल्या वयात आठ-दहा वर्षाचं अंतर. पण तरी मला तुमच्या म्हणजे आज विशी-पंचविशीत असलेल्या मुलांची भाषा, तुमचे फॅशन ट्रेण्ड्स आणि रिलेशनशिप्सबद्दलच्या कन्सेप्ट हे सगळं समजून घ्यावं लागतं. आणि  कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्या पूर्णपणे नाहीच समजून घेता येत. अशावेळी शांतपणे लेट इट बी म्हणत, त्या आहेत तशाच सोडून द्याव्या लागतात. किती झपाझप बदलतंय ना सगळं, सगळा आज उद्या आउटडेटेड होतोय. पिढय़ा ही संकल्पना पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. पूर्वी एखादी पिढी दहा-बारा वर्षाची असे. आता ती पाच किंवा तीन वर्षाची होऊ घातलीये. त्याचाच हा परिणाम म्हणायचा की आणखी काय, माहीत नाही.
खरं सांगतो, जेव्हा मला तू ‘तुला मुलगा नाही; मुलगी आवडते’ हे सांगितलं होतंस, तेव्हा कितीही नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसला होताच मला. मी तसं दाखवलं नाही किंवा तसं न दाखवण्याचा प्रयत्न केला; पण इतके दिवस आपल्या आजूबाजूला घडत असलेली ‘ती’ गोष्ट, थेट आपल्या बहिणीबाबत घडेल असा कधी विचारच केला नव्हता. शेवटी कल्पना करणं वेगळं आणि प्रत्यक्षात सामोरं जाणं वेगळं. त्यामुळे मी जरा गोंधळून गेलो होतो हे खरंच. पण जेव्हा तू सांगितलंस की, आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना माहितेय आणि सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे, तेव्हा मी काय करायला पाहिजे हे मला आपोआप समजलं !

मध्ये मी आपल्या रोहितला विचारलं, ‘‘काय रे हल्ली सोनाली दिसत नाही?’’ तर तो मोबाइलमधून डोकंवर काढून अगदी सहज म्हणाला, ‘अरे तिने मला डम्प केलं !’ आणि पुन्हा मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसला. मी विचारलं, ‘का? चांगले होतात की तुम्ही एकमेकांना.’ माझ्याकडे न पाहताच तो उत्तरला, ‘डोण्ट नो ! तिचं म्हणणं होतं आपण एकमेकांना कम्पॅटिबल नाहीयोत. तिला दुसरा कोणीतरी आवडायला लागला होता रे. आता काय करणार ! मग मीही म्हटलं, ओके. अच्छा.’ त्याचं हे उत्तर ऐकून पंचविशीत असताना मी किती बावळट होतो हे जाणवलं ! ब्रेकअप झालं की, आता आयुष्य संपलं वगैरे वाटायचं. पण तरी खूप ब्रेकअप्स पचवले बरं का आम्हीही ! पण तुमच्याएवढं प्रॅक्टिकली आणि रॅशनली नव्हतं पाहता येत आम्हाला रिलेशनशिप्सकडे.

आणि हो, तुला सांगायचं राहिलंच. परवा काकू आली होती, आर्याला घेऊन. माझं आणि आर्याचं छान जमतं म्हणून. काकू तणतणतच होती. मी आर्याकडे पाहिलं. तिचे डोळे सुजून लालेलाल झाले होते. तिचा एरवीचा गोड, हसरा चेहरा आज पार कोमेजून गेला होता. त्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. काकू म्हणाली, ‘तूच समजाव बाबा आता हिला.’ तशी आर्या चिडून म्हणाली, ‘आई तू माझं पर्सनल लाइफ असं चव्हाटय़ावर का मांडतेस?’’ प्रकरण गंभीर आणि नाजूक दिसत होतं. मी म्हणालो, ‘आर्या तुझ्या आईने तुझ्याबद्दल माझ्याशी बोलू नये असं तुला वाटत असेल तर असू दे. नो इश्यूज.’ मग आर्या जरा नरमली. पण काकू चिडली होती. ती म्हणाली, ‘कसली पर्सनल स्पेस-बिस. काय करून बसलीय ते सांग आधी !’ मी म्हटलं, ‘काकू तू शांत हो.’ काकू काकुळतीला येऊन म्हणाली, ‘अरे तुला मुलगी झाली की कळेल! मी तिची आई आहे रे. कशी शांत बसू?’ मी प्रश्नार्थक नजरेने आर्याकडे पाहिलं.

काकू आता रडू लागली होती. तोच आर्या म्हणाली, ‘आई, मी तुला स्पष्टपणे जे झालं, आणि मी जे केलं, ते येऊन सांगितलं. एवढंही म्हणाले की, मला नाही कळलं तेव्हा. पण त्यावर उपाय म्हणून लगेच आयपील घेतली मी. हाच तर बेटर ऑप्शन होता ना ! मी काय पोट वाढायची वाट पाहायला हवी होती का?’

खरं सांगू, तेव्हा मला आर्याचं खूप कौतुक करावंसं वाटलं. किती मॅच्युअर डिसिजन घेतला तिने. हे कबूल की, आर्या आणि तिच्या मित्राने काळजी घ्यायला हवी होती. त्याबद्दल तिच्याशी खासकरून तिच्या मित्राशी वेगळ्यानं बोलायला हवं होतं. पण तिने घडून गेल्या गोष्टीची जबाबदारी घेतली आणि लगेच पाऊल उचललं. काकू तिच्याकडे पाहून म्हणाली, ‘बघ बघ, कशी बोलतेय ते? आम्ही एवढं स्वातंत्र्य दिलं त्याची फळं भोगतोय !’ मला काकूला सांगायचं होतं की, तू स्वातंत्र्य दिलंस, त्यामुळेच तिने हा डिसिजन घेतला! एवढं सोपं नाहीये ते. पण मला दोन्ही बाजूंना सांभाळणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी काकूला शांत करत म्हटलं, ‘‘मान्य की आर्या चुकली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने तुला जे झालं ते येऊन सांगितलं. लपवाछपवी नाही केली.’ आणि आर्यालाही ‘काळजी घे, आयपिल हे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, उपाय नव्हे,’ अशी ताकीदही दिली.

जाता जाता थोडं आमच्या पिढीबद्दल.
आमच्या पिढीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे सांगू? आम्हाला अजून टीनएजमध्येच राहायचंय. तिशी-पिस्तशीत आलो तरी. तू आम्हा लोकांची फेसबुक किंवा इन्स्टा अकाउण्ट्स पाहिली की सहज समजेल तुला. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की, शिक्षण वगैरे झालं की नोकरीधंदा करायचा नि मग लग्न वगैरे. पण आम्हाला आमचं टीनएज प्रोलाँग करायचंय. शिकत राहायचंय, फिरायचंय. आणि म्हणूनच कदाचित आम्ही रिलेशनशिप्समधल्या कमिटमेंटलाही घाबरत असू. आमच्या रिलेशनशिप्सही प्रोलाँग झालेल्या, ना धड इकडच्या ना तिकडच्या अशा अधल्यामधल्याच. हँग-इन पोजिशनमधल्या. हारु की मुराकामी या जपानी लेखकाचं एक कोट आहे –Only the dead stay seventeen forever. . हे वाक्य त्यानं आमच्यासाठीच लिहिलं असावं असं वाटतं.
तुमच्या पिढीचं काय होतंय, माहीत नाही. पण तुमचं विश्व अगदीच वेगळं असणार. लेट्स सी अ‍ॅण्ड होप फॉर द बेस्ट. तोवर बाय. बोलत राहू.
सवडीने रिप्लाय कर.
तुझा

 

माहितीचा स्त्रोत : http://www.lokmat.com/oxygen/practical-and-rational-love-responsibility-when/

Comments are closed.