बलात्काराची सुरुवात मेंदूपासून होते…

1 2,586

वाढते बलात्कार आणि त्यातही अल्पवयीन मुला-मुलींवर होणारे बलात्कार ही निश्चितच गंभीर बाब आहे. 2012 ते 2014 या काळात अल्पवयीन मुला-मुलींवरच्या बलात्कारात प्रचंड वाढ झाली आहे. 2014 साली देशात अशा बलात्काराचे 89423 गुन्हे नोंदवले गेले. न नोंदवलेले अजूनही अनेक गुन्हे घडले असणार हे नक्की.

अल्पवयीन मुला-मुलींवरच्या सामूहिक बलात्काराच्या घटनाही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला एक निकाल महत्त्वाचा आहे. लहान मुलावर बलात्कार केलेल्या एका ब्रिटिश नागरिकाची याचिका रद्द करताना मद्रास उच्च न्यायालयाने अशा गुन्हेगारांना नपुंसक (castrate) करावे असं मत नोंदवलं आहे. कोर्ट फक्त हातावर हात ठेऊन बघत बसू शकत नाही. शिक्षेचं भय वाटेल अशाच शिक्षा बालकांवरच्या बलात्कारासारख्या गुन्ह्यांना दिल्या पाहिजेत असं स्पष्ट मत न्यायाधीश किरुबाकरन यांनी मांडलं.

मात्र आतापर्यंत अनेक संस्था, संघटना, वकील मित्र मैत्रिणींनी हे मांडलं आहे की कडक शिक्षा, फाशीची शिक्षा अशा गोष्टींनी बलात्कार थांबत नाहीत. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभर या विषयावर वादळ उठलं मात्र त्यानंतरही बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत. उलट त्यातली क्रूरता वाढतानाच दिसतीये.

या निर्णयावर अनेक मतं मतांतरं होत आहेत. शिक्षेची भीती नाही, अनेक गुन्हेगार पुराव्यांअभावी सुटतात, वेळेत शिक्षा न दिल्याने पुन्हा पुन्हा बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करतात हे खरं असलं तरी जबरी, कडक शिक्षेमुळे असे गुन्हे कमी होतील असा विश्वास ठेवणंही चुकीचं ठरू शकतं. खास करून लहान मुलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यात निम्म्याहून अधिक वेळा गुन्हेगार मुलाच्या ओळखीतला किंवा विश्वासातला असतो. तेव्हा बलात्काराच्या गुन्ह्याचा विचार सर्वंकषपणे करायला पाहिजे. केवळ शिक्षेची भीती हे उद्दिष्ट ठेवून चालेल का मानसिकतेत बदल करणं गरजेचं आहे?

सर्वच नात्यांकडे केवळ लैंगिक, सेक्शुअल दृष्टीकोनातून पाहणं, सेक्स हे कंपल्शन बनणं आणि कुणाचंही शरीर केवळ उपभोगाची वस्तू आहे, कुणाकडेही पाहिलं तरी सेक्सचा विचार मनात येणं या धोक्याच्या घंटा आहेत. बलात्काराची कृती मेंदूपासून सुरू होते. त्यामुळे बदलही मेंदूपासूनच सुरू व्हायला पाहिजेत. आरोपीला नपुंसक करून किंवा त्याचा जीव घेऊन समाजाचा स्त्रीच्या किंवा लहान बालकांच्या किंवा कोणाही व्यक्तीच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलता येणार आहे?

तुमचं मत नक्की कळवा.

Image courtesy – Getty Images – Protests in Bangalore file photo

1 Comment
  1. रवि भवरे says

    बरोबर आहे शिक्षा देऊन काहीच होणार नाही, कारण शिक्षा कोणाकोणाला देणार? काही द्यायचं असेल तर ज्ञान द्या. त्यांच्या अज्ञानीपणामुळेच तो असले वाईट काम करत आहे. असले वाईट काम करून पश्चाताप करून ही काहीच होणार नाही. वासनेला कसं नियंत्रित करायचं ह्या बद्दल ज्ञान दिलं पाहिजे. हे ज्ञान देण्यासाठी लाजायची वगैरे काहीच गरज नाही. लाज तर वाईट काम करण्याच्या आगोदर यायला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.