बॉईज डोंट क्राय_ निहार सप्रे

0 1,967

“..No one can do a thing about feelings, they exist and there’s no way to censor them. We can reproach ourselves for some action, for a remark, but not for a feeling, quite simply because we have no control at all over it.” ― Milan Kundera, from his book “Identity”

अमेरिकेच्या हम्बोल्ट, नेब्रास्का इथं ब्रॅन्डन टीना या ट्रान्स-पुरुषाचा त्याच्याच मित्रांनी डिसेंबर ३१, १९९३ रोजी बलात्कार केला आणि त्यानंतर त्याची निर्घृण हत्या केली. त्याचा गुन्हा केवळ एवढाच होता की तो एक ट्रान्स-पुरुष होता आणि त्याच्यावर बलात्कार केलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या विरोधात त्याने पोलिसांच्यात कम्प्लेंट केली होती. बलात्कारानंतर ब्रॅन्डननं जेव्हा पोलिसांच्यात कम्प्लेंट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या sexual orientation वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फक्त पोलिसांनीच त्याच्या कम्प्लेंटकडं दुर्लक्ष केलं नाही तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील त्याच्याबरोबर पक्षपात केला. त्याच्याबरोबर झालेल्या सर्व घटनांमधून एक महत्वाची गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे कोणत्याही व्यवस्थेमध्ये, एखाद्या ‘विशिष्ट’ (इतरांपेक्षा वेगळ्या) व्यक्तीबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो आणि त्या भेदभावापोटी त्या व्यक्तीला किती निर्घृण परिणामांना सामोरं जावं लागतं.  १९९९ साली याच ब्रॅन्डन टीनाच्या जीवनावर आधारीत एक सिनेमा किम्बर्ली अॅन पिअर्स या समलैंगिक महिला दिग्दर्शिकेनं काढला ज्याचं नाव आहे “बॉईज डोंट क्राय”.

या सिनेमाविषयी लिहिण्याअगोदर एक महत्वाच्या विषयावर लिहिणं योग्य ठरेल आणि तो विषय म्हणजे “ट्रान्स-जेन्डर व्यक्ती” म्हणजे नेमकं काय? जेव्हा एखादी व्यक्ती लैंगिक/शारीरिक दृष्ट्या स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येते परंतु त्या व्यक्तीला भावनिक किंवा मानसिक दृष्ट्या आपण विरोधी लिंगाचे आहोत असं वाटत असतं तेव्हा त्या व्यक्तीला ट्रान्स-जेन्डर म्हणतात.

“बॉईज डोंट क्राय” या सिनेमाची कथा आहे ब्रॅन्डन टीना या ट्रान्स-पुरुषाची. चित्रपटाची सुरवात होते अमेरिकेच्या लिंकन नावाच्या एका छोट्याशा गाव वजा शहरात २१ वर्षांचा ब्रॅन्डन (हिलरी स्वँक) आणि त्याचा एक गे मित्र एका पार्टीला जाण्याची तयारी करत आहेत या प्रसंगापासून. या पहिल्या प्रसंगामध्येच आपल्याला लक्षात येतं की ब्रॅन्डन हा शारीरिक दृष्ट्या खरं म्हणजे मुलगा नसून मुलगी आहे आणि ती स्वतःला एक मुलगा आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. ती स्वतःची छाती आरशामध्ये चेक करते, लिंगाचा उभार दिसावा यासाठी पँट मध्ये कापसाचे बोळे कोंबते वगैरे. पार्टीमध्ये ब्रॅन्डन एका मुलीला भेटतो आणि अगदी सहजपणे मुलगा असल्याप्रमाणं तिच्याबरोबर वावरतो, तिला किस करतो. त्याच्या अशा वागण्यामुळं आपल्या मनात त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं आणि सिनेमा पुढे कसा सरकणार याबद्दल उत्सुकता निर्माण होते. पुढे ब्रॅन्डन आणि त्याच्या मित्राचं काही कारणास्तव भांडण होतं आणि त्याला घरातून बाहेर पडावं लागतं. पुढं कुठं जाणार याचा विचार करत एका बार मध्ये विमनस्क अवस्थेत बसलेला असतानाच त्याची भेट होते त्याच बार मध्ये काम करणाऱ्या कँडस या मुलीशी. कँडसच्या माध्यमातून ब्रॅन्डन तिच्याच दोन मित्रांना, टॉम आणि जॉन यांना भेटतो आणि तिथून सुरु होतो मुलीच्या शरीरात अडकलेल्या पण “मर्द” बनू पाहणाऱ्या ब्रॅन्डनच्या इच्छेचा प्रवास.

इथं एक गोष्ट प्रकर्षानं मांडावी वाटते ती म्हणजे, जवळपास सर्वच समाजांमध्ये जेव्हा “मुलगे” पौगंडावस्थेतून पार होतात तेव्हा ओघानंच त्यांच्यावर मर्द बनण्यासाठी आजूबाजूच्या लोकांकडून दडपण येऊ लागतं. मर्द म्हणजे प्रोटेक्ट करणारा, मैदानी खेळ खेळणारा, लढवैय्या अशा अनेक साचेबध्द प्रतिमांमध्ये मुलग्यांना अडकवलं जातं आणि जी मुलं त्यामध्ये बसत नाहीत त्यांना त्रास दिला जातो, वेगळं पाडलं जातं. चित्रपटातील टॉम आणि जॉन अशीच दोन पात्रं आहेत जे एका अत्यंत जुनाट, पारंपारिक विचारसरणीतून आलेले तथाकथित ‘पुरुष’ आहेत आणि मुळात स्त्री शरीरात जन्मलेल्या परंतु स्वतःच्या सेक्शुअल आयडेंटीटी बद्दल गोंधळलेल्या ब्रॅन्डनला त्यांच्या पुरुषत्वाबद्दल एक प्रकारचं आकर्षण आहे. तो त्यांच्यासारखं वागण्याचा सतत प्रयत्न करतो, खोटं बोलतो, मुलींना इम्प्रेस करण्यासाठी त्यांना भेटी देण्यासाठी चोऱ्या करतो पण या सर्व गोष्टींमधून त्याचा गोंधळ मात्र दूर होत नाही. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसं अनेक प्रसंगांमधून  स्वतःला पुरुषी साचेबध्द प्रतिमेमध्ये बसवू इच्छिणारा आणि त्यासाठी तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणारा ब्रॅन्डन दिसत राहतो. ब्रॅन्डनचं काम करताना “हिलरी स्वँक” या अभिनेत्रीनं एखाद्या तरुण मुलाच्या छोट्या छोट्या सवयी, त्याचे हावभाव अत्यंत अप्रतीम पद्धतीनं समोर आणले आहेत आणि ते करताना ब्रॅन्डनमधल्या टीनाचं भावविश्व देखील सुंदर पद्धतीनं समोर आणण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाली आहे. वास्तविक आयुष्यात ब्रॅन्डनला टाईम लॅप्समध्ये दिसणारं ट्रॅफिक, आउट ऑफ फोकस मध्ये दिसणारे रस्त्यावरील चमकदार दिवे, प्रवास या सगळ्या सिम्बॉलिक माध्यमांमधून दिग्दर्शिकेनं टीनाला स्वप्नवत वाटणारं आणि ब्रॅन्डन म्हणून तिचं पुढं सरकणारं आयुष्य अतिशय सुंदर पद्धतीनं दाखवलंय.

चित्रपटाच्या मध्यंतराअगोदर ब्रॅन्डन लीना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तोपर्यंत त्याने कुणालाही सांगितलेलं नसतं की शरीराने तो मुलगी आहे. तो लीनाच्या घरी रहात असतो, कधी कधी तो कँडसच्या घरी रहात असतो. टॉम आणि जॉन बरोबर पार्ट्यांना जात असतो, त्यांच्याबरोबर मुलींविषयी गप्पा मारत असतो आणि त्या दोघांनीही त्याचा आपला मित्र म्हणून स्वीकार केलेला असतो. एका सीन मध्ये लीनाबरोबर सेक्स करताना, ब्रॅन्डन तिला कळणार नाही अशा प्रकारे तिच्याबरोबर समागम करतो पण लीनाला ब्रॅन्डनच्या छातीची झलक दिसते आणि तिला त्याच्याबद्दल शंका येते पण त्याच्या प्रेमात बुडालेली लीना त्याकडं दुर्लक्ष करते. मुळात तिला त्याचा स्वभाव आवडलेला असतो त्यामुळं ती त्याच्या शरीरावर नाही तर त्याच्या स्वभावावर प्रेम करत असते. यातून जाणवणारी एक महत्वाची गोष्ट इथं मांडावीशी वाटते. कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाला भिन्नलिंगी किंवा समलिंगी व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे. ते नैसर्गिक आहे. परंतु प्रेमाची व्याख्या करताना मात्र दोन व्यक्तींमध्ये भावनिक पातळीवर होणारा बदल लक्षात न घेता स्त्री, पुरुष किंवा एखाद्या ट्रान्स-जेन्डर व्यक्तीला आपला समाज साचेबध्द प्रतिमेमध्ये का टाकतो? म्हणजे स्त्रीनं केवळ पुरुषाच्या आणि पुरुषानं केवळ स्त्रीच्या प्रेमात पडायला हवं हा अट्टाहास का? एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या पेक्षा भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल, किंवा समलिंगी व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण न वाटता केवळ भावनिक आकर्षण वाटू शकत नाही का? आपलं प्रेम सिध्द करण्यासाठी, एकमेकांवरचा हक्क दाखवण्यासाठी, आपण एकमेकांसाठी आहोत आणि एकत्र रहात आहोत हे सिध्द करण्यासाठी एकमेकांबरोबर समागम करणं, या गोष्टीलाच आपल्या समाजात इतकं जास्त महत्व का दिलं जातं?

ब्रॅन्डन आणि लीना एकमेकांच्या प्रेमात असताना आणि सर्व काही सुरळीत होईल याची आपण अपेक्षा करत असतानाच सिनेमाची कथा वेगळ्याच वळणावर येते. एका चेक घोटाळ्याच्या केस मध्ये ब्रॅन्डनला पोलीस पकडतात आणि तुरुंगात टाकतात. शरीरानं मुलगी असल्यानं त्याला स्त्रियांच्या वॉर्डमध्ये टाकलं जातं. ब्रॅन्डनला पोलिसांनी पकडलंय हे लीनाला जेव्हा कळतं तेव्हा ती त्याला भेटायला तुरुंगात जाते आणि तिथे त्याला स्त्रियांच्या वॉर्डमध्ये बघून तिला आश्चर्य वाटतं. पण ब्रॅन्डन तिथंही खोटं बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतो. तो मुलगी नाही असं सांगून लीना त्याची जमानत देते पण ही गोष्ट फक्त लीना किंवा पोलिसांपुरती मर्यादित राहिलेली नसते. ब्रॅन्डन मुलगी आहे आणि तो आपल्याशी खोटं बोलला याचा राग येऊन टॉम आणि जॉन त्याच्यावर अत्याचार करतात, सर्वांसमोर त्याला नग्न करून त्याचा अपमान करतात एवढंच नाही तर त्याला घराबाहेर काढतात. आता पुढे काय या द्विधा मनःस्थितीमध्ये रस्त्यावरून जात असताना टॉम आणि जॉन ब्रॅन्डनचं अपहरण करतात आणि त्याच्यावर बलात्कार करतात. आणि पोलिसांच्यात खबर न देण्याबाबत त्याला धमकी देतात. पण ब्रॅन्डन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करतो. तिथेही पोलीस अधिकारी त्याच्या लैंगिक कलावर  (सेक्शुअल ओरीएनटेशन) बोट ठेवत त्याच्या ताक्ररीकडं दुर्लक्ष करतात व टॉम आणि जॉनला अटक करत नाहीत. ब्रॅन्डनने आपल्या विरोधात कम्प्लेंट केली याचा राग येऊन टॉम आणि जॉन त्याची सर्वांदेखत निर्घृण हत्या करतात. आणि पुन्हा स्वप्नवत वाटणाऱ्या रस्त्यांवरच्या दिव्यांच्या शॉट वर चित्रपट संपतो.

ब्रॅन्डन बरोबर घडलेल्या सत्य घटनांमधून अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रॅन्डन सारख्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या लैंगिक कलाबद्दल गोंधळ का निर्माण झाला असावा? लैंगिकतेला ‘ब्लॅक अँड व्हाईट’ स्वरूपात पाहणाऱ्या समाजाने स्वतःला हा प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे टॉम आणि जॉन सारख्या किंवा ब्रॅन्डन मुलगी असून मुलासारखं वागतीये म्हणून त्याच्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासारख्या पुरुषांमध्ये पुरुषी अहंकार कुठून येतो? तो नैसर्गिक आहे का? नक्कीच नाही. कारण तो पुरुषप्रधान समाजरचनेनं पुरुषांना दिलेल्या अधिकारांमधून आलेला आहे. आपल्याकडं अगदी सहजपणे म्हंटलं जातं की, मुलीच त्यांच्यावर होणाऱ्या बलात्काराला किंवा अत्याचारांना कारणीभूत असतात परंतु ब्रॅन्डनबरोबर झालेल्या अनेक घटनांतून अगदी साफ दिसतं की स्त्रिया किंवा ट्रान्स-जेन्डर व्यक्तींवर केले जाणारे अत्याचार, त्यांच्या सोबत केला जाणारा भेदभाव, बलात्कार किंवा हिंसा या स्वतःची सत्ता गाजवण्यासाठी किंवा आपल्यापेक्षा वेगळा लिंगभाव (जेन्डर) असणाऱ्या व्यक्तीला कमी लेखाण्यासाठी वापरली जाणारी, साचेबध्द प्रतिमांमध्ये अडकलेल्या पुरुषांची हत्यारं आहेत. ती हत्यारं वापरण्याची मुभादेखील आपला समाजच त्यांना देत असतो. जोपर्यंत आपण एक समाज म्हणून या सर्व प्रश्नांचा तर्कसंगत, आणि बुद्धीला पटेल अशा स्वरूपात विचार करत नाही तोपर्यंत एक निकोप, सर्वांना सुरक्षित वाटेल असा समाज निर्माण होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.