महिलांच्या मंदिर किंवा गाभारा प्रवेशाच्या हक्कासाठीची लढाई योग्य की अयोग्य? – ले. प्राजक्ता धुमाळ
महिलांच्या मंदिर किंवा गाभारा प्रवेशाच्या हक्कासाठीची लढाई योग्य की अयोग्य? वेबसाईटवरील या प्रश्नावर ३८१ व्यक्तींनी आपलं मत नोंदवलं. यापैकी ५७ % लोकांना ही लढाई योग्य आहे असं वाटतं. तर ३७% लोकांना ही लढाई योग्य नाही असं वाटतं. या प्रश्नाच्या निमित्ताने थोडं समजून घेऊया.
सध्या गाजत असलेली महिलांची मंदिर प्रवेशाच्या हक्काची लढाई आपण सर्व जाणून असालच! यावर समाजाच्या विविध घटकांतून विविध अंगी चर्चा, मतं याचा उहापोह झाला. तृप्ती देसाई यांच्या एकूण लढ्याबद्दल टिप्पणी न करता आपण फक्त मुद्दा समजून घेण्यावर भर देणार आहोत. समाजात दुष्काळासारखा ज्वलंत प्रश्न असताना मंदिर प्रवेशासारखा मुद्दा उचलून धरण्याची गरज नव्हती असाही एक सूर यामध्ये आढळला. दुष्काळच नाही तर महिलांच्या बाबतीतलेही इतर अनेक प्रश्न आहेत, पण त्यामुळे मंदिर प्रवेशाचा प्रश्न दुय्यम ठरत नाही. भारतीय राज्यघटनेनेच स्त्री-पुरुषांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं देशात असं कोणतंही सार्वजनिक ठिकाण असू नये, ज्याठिकाणी स्त्रियांना किंवा पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी असेल. या अर्थाने महिलांची मंदिर प्रवेशासाठीची लढाई ही समानतेच्या हक्कासाठीची लढाई आहे आणि म्हणूनच ती योग्य आहे.
स्त्रियांना मासिक पाळी येते, म्हणून त्यांना अपवित्र मानले जाते. हा समज समाजात कित्येक वर्षांपासून प्रचलित आहे. या गैरसमजाच्या आधारे देवाला विटाळ होऊ नये म्हणून महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेश वर्षानुवर्षांपासून नाकारला गेला आहे. खरं तर स्त्रियांना मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे आणि त्यात वाईट, घाण, अपवित्र असे काहीही नाही. स्त्रीला मासिक पाळी येते, म्हणूनच नवा जीव निर्माण होत असतो. मग मासिक पाळीमुळे स्त्री अपवित्र कशी होईल? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारावा. २०१६ च्या सालातही आपण अशा अशास्त्रीय विचारांना चिकटून राहत असू तर आपण प्रगतीच्या दिशेने नाही तर अधोगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे मात्र नक्की! अर्थात ही वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यासाठी आपण स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे.
मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करायला महिलांना बंदी का? हा प्रश्न महिलांनीही स्वतःला विचारावा, त्यावर विचार करावा. ‘मंदिर प्रवेश’ हा ‘स्त्री-पुरुष समानते’चं एक साधन आहे पण त्याबरोबरच अंधश्रद्धा, धार्मिक जाचक रूढी, परंपरा यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा स्त्री-पुरुषांना माहित असला पाहिजे, उपलब्ध असला पाहिजे!
Image Courtesy: http://timesofindia.indiatimes.com
स्त्रियांना धार्मिक स्थळी प्रवेश मिळायला हवा, हे स्त्रि-पुरुष समानतेसाठी ठीक आहे.
पण तिथे प्रवेश करून काय साध्य होणार आहे???
उलट माझ्या मते स्त्रियांनी जर या देव,धर्म यांसारख्या गोष्टींतुन लक्ष काढले तर यांची दुकानदारी बंद होईल.
आपल्या मताशी सहमतच आहोत. समानतेच्या लढयासोबतच अंधश्रद्धा, श्रद्धांचे बाजारीकरण आणि देवा-धर्माच्या, जातीच्या माध्यमातून पोसल्या जाणाऱ्या पितृसत्तेलाही विरोध करायला हवा.