लैंगिक शोषणाच्या तक्रारीमुळे ठाण्यातील वृद्धेवर घर गमाविण्याची वेळ 

जयेश शिरसाट

0 828

 

खासगी सुरक्षारक्षकांकडून सुरू असलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी करणाऱ्या वृद्धेवर ठाण्यातील उच्चभ्रू वसाहतीतले घर गमावण्याची वेळ आली आहे. या तक्रारींमुळे कामात व्यत्यय येतो, अडथळे निर्माण होतात आणि बदनामी होते, असा ठपका ठेवत संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेने सभासदत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ‘कारणे दाखवा’ नोटीस धाडत संस्थेने वृद्धेकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

दुसरीकडे वृद्धेच्या तक्रारीवर सुरक्षारक्षकांसह संस्था पदाधिकाऱ्यांविरोधात लैंगिक शोषणाचा (३५४ अ अन्वये) गुन्हा नोंदवणाऱ्या कासारवडवली पोलिसांनी आठ महिन्यांनंतरही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तपास पूर्ण झालेला नाही, असे या प्रकरणाच्या तपास अधिकारी फौजदार रुपाली रत्ने सांगतात. तक्रारदार वृद्धा निवृत्त हवाईसुंदरी असून एकल माता आहेत. घोडबंदर परिसरातील उच्चभ्रू इमारतीत २००४ पासून त्या वास्तव्यास आहेत. कामाच्या स्वरूपामुळे रात्री-अपरात्री घरी येणे ही त्यांच्यासाठी नित्याची बाब. इमारतीत आल्यानंतर खासगी सुरक्षारक्षकांकडून वाट अडवणे, गाणी म्हणणे, डोळा मारणे, अश्लील टिप्पणी करणे, अश्लील कृती (फ्लॅशिंग) असे अनेक अनुभव घेतले आणि प्रत्येक घटनेनंतर गृहनिर्माण संस्थेकडे तक्रार केली. संस्थेकडून कारवाई होत नसल्याने त्यांना पोलीस ठाणे गाठावे लागले. संस्था पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून एकदा तक्रार मागे घेतली. महिला सभासदांची समितीही तयार केली गेली. या समितीने आतापर्यंत एकच बैठक घेतली. त्यातही ६२ वर्ष वय असूनही लैंगिक शोषणाचे आरोप कसे काय करू शकता, असा प्रश्न विचारला गेला. तक्रार मागे घेतल्यानंतर शोषण आणखी वाढले. अखेर या वर्षी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गुन्हा नोंद होताच गृहनिर्माण संस्थेने पुढल्या दोन महिन्यांत सभासदत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या. सभासद झाल्यापासून वृद्धेने एकूण ४७ तक्रारी केल्या. ज्या खोटय़ा, बिनबुडाच्या आहेत. सातत्याने खोटय़ा तक्रारी करून संस्थेच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यांच्या या कृतीमुळे सुरक्षारक्षक इमारतीत काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अन्य सभासदांची सुरक्षा वाऱ्यावर येऊ शकते, असे आरोप करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस संस्थेने वृद्धेला धाडली.  संस्थेच्या सचिवांना विचारले असता ते म्हणाले, हा अंतर्गत विषय असल्याने तपशील देता येणार नाहीत. मात्र सभासदत्व रद्द करावे अशी परिस्थिती निर्माण झाली. कायदेशीर प्रक्रियेनुसार सभासदाला नोटीस देण्यात आली आहे.  अद्याप त्यांचे सभासदत्व रद्द करण्याविषयी संस्थेने निर्णय घेतलेला नाही. तसेच तसा प्रस्तावही उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवलेला नाही.  नोटिशीला उत्तर देता यावे यासाठी केलेल्या प्रत्येक तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती असलेले दप्तर तपासण्याची आणि इमारतीतील सीसीटीव्ही चित्रण पाहू देण्याची विनंती वृद्धेने केली. ती संस्थेने अमान्य केल्याने वृद्धेने उपनिबंधक कार्यालयातही तक्रारी केल्या.

सुरक्षारक्षकाला बढती

ज्या सुरक्षारक्षकाविरोधात वृद्धेने सर्वाधिक तक्रारी केल्या, त्याला संस्थेने बढती देत संकुलाचा व्यवस्थापक केले आहे. वृद्धेने सुरुवातीच्या काळातच संस्थेकडे महिला सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली होती.

पूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील दुवा वापरा : https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-crime-news-157-1798281/

ही बातमी वाचल्यावर आम्हाला प्रश्न पडलाय की,  “६२ वर्ष वय असूनही लैंगिक शोषणाचे आरोप कसे काय करू शकता” , असा प्रश्न महिला सभासदांची समिती कसा विचारु शकते?

तुम्हाला काय वाटतं ? वयाचा अन लैंगिक शोषणाचा काही संबंध आहे का? लैंगिक शोषण हे फक्त कमी वयाच्या महिलांवरच होते का? जेष्ठ महिलांना अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागत नाही का?

खाली कमेंट मध्ये आपलं मत नक्की नोंदवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.