शिवी – राजन गवस

शेताच्या बांधावरून भांडण चाललं असेल तर तिथल्या शिव्या वेगळ्या, वाटण्या चालल्या तर तिथल्या शिव्या वेगळ्या, बायका-बायकांचं भांडण- वेगळ्या शिव्या, सासू-सुनेचं भांडण- वेगळ्या शिव्या, नळावरचं भांडण -अस्सल शिव्या. असं शिव्यांचं बदलतं जग, बदलते स्तर.

1,045

मध्यंतरी ३-४ वर्षे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्य़ातील मित्रमत्रिणींच्या सहकार्याने मराठीतील शिव्या गोळा करण्याचा उद्योग करत होतो. माणसानं पहिली शिवी कोणती दिली असेल? माणूस शिवी का देतो? कोणत्या क्षणी माणूस शिवीचा वापर करतो? त्या वेळची त्याची मन:स्थिती, शिवी दिल्यानंतरची मन:स्थिती असल्या शंभर गोष्टी होत्या त्या वेळी मनात, त्यामुळे जोरकस सुरू होता शिव्यांचा शोध!

हे शोधकाम एकदमच कठीण. तुम्हाला येणाऱ्या शिव्या सांगा, अशी सुरुवात करून सामग्री जमा होईल असा हा शोध प्रकल्प नव्हता. आता आठवतील तेवढय़ा शिव्या सांगा म्हटलं तर आठ-दहा शिव्यांच्या पलीकडे मजलच जायची नाही कुणाची. आठवून आठवून बघितलं तर एक-दुसऱ्या शिवीची भर पडायची. त्यामुळे शिव्या शोधण्यासाठी मोहीम काढून काही हाती लागण्याची शक्यता कमी. फक्त मांजरासारखं ‘कव’ घालून बसायला लागायचं. कुठं भांडण सुरू होतं आणि कधी शिव्यांचा भडिमार सुरू होतो. त्यात पुन्हा भांडणं टेप करण्याची तेव्हा सोय नव्हती. आतासारखे चांगले मोबाइलही उपलब्ध नव्हते. त्यामुळे सगळा भर स्मरणशक्तीवर. चांगल्या पाच-पंचवीस शिव्या सापडायच्या; पण कागदावर उतरेपर्यंत आठ-दहाच शिल्लक राहायच्या. पुन्हा संधीच्या शोधात. मग महाविद्यालयीन पोरांची मदत घ्यायची. त्यांच्या त्यांच्या गावातल्या शिव्या गोळा करा म्हटलं, तर पोरं त्याच त्याच शिव्या घेऊन यायची. मग त्यांना पुन्हा भांडणाच्या ठिकाणी कसं जायचं, शिव्या कशा ध्यानात ठेवायच्या, कशा उतरून काढायच्या, असलं सगळं शिकवावं लागायचं. त्यात पुन्हा भांडणं कोणत्या ठिकाणी होतात त्याला महत्त्व अधिक. कारण भांडणाच्या ठिकाणावरून शिव्यांच्या वापराबाबतचे वैविध्य आकाराला येतं असं आपलं अनुभवांती मत!

शेताच्या बांधावरून भांडण चाललं असेल तर तिथल्या शिव्या वेगळ्या, वाटण्या चालल्या तर तिथल्या शिव्या वेगळ्या, बायका-बायकांचं भांडण- वेगळ्या शिव्या, सासू-सुनेचं भांडण- वेगळ्या शिव्या, नळावरचं भांडण -अस्सल शिव्या. असं शिव्यांचं बदलतं जग, बदलते स्तर. त्यात पुन्हा धंद्यातल्या शिव्या वेगळ्या, धर्मातल्या, जातीजातींतल्या, पोटजातींतल्या शिव्या वेगळ्या. वयानुसार शिव्या बदलत जातात. प्रदेशानुसार नवे रूप धारण करतात. शिव्यांत अवजारांचा वापर, प्राण्यांचा वापर, गाढव, घोडे, कुत्रा, डुक्कर तर याबाबतीत अधिक बदनाम. शिवीत जात-पात-धर्माचा वापर, निसर्गातील झाडंझुडपं, दगड-धोंडे, नद्या, डोंगर यांचा वापर असं सगळं भन्नाट काय काय जमा होत होतं. त्यातून जाती-पोटजातींतील, धर्माधर्मातील ताण, प्रेम, संस्कार, असं सगळं गोळा होत चाललं होतं. बरेच लोक, बऱ्याच समूहातल्या शिव्या, त्यातील स्तर, अंत:स्तर, पोत, पदर शोधत, साठवत चाललो असताना भलते भलते लोक भेटायचे. आयुष्यात मी कधी शिवी उच्चारलीच नाही, असं म्हणणारे होते, तर शिवीशिवाय पाणीच न पिणारेही होते. शिवी खुलेपणाने स्वीकारणारे, शिवी नाकारणारे असे कैक भेटत गेले. अशात एक गृहस्थ भेटले. म्हणाले, ‘‘आमच्या महाविद्यालयात पोरी बोलताना शिव्यांचा सर्रास वापर करतात. अगदी बेधडक! काय एक एक शिवी उच्चारतात पोरी. माझ्या तर अंगावर काटाच येतो.’’ काही तरी विपरीत घडतंय, असं त्याच्या सांगण्याचं तात्पर्य होतं. म्हणजे शिव्या फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आणि ही मक्तेदारी आता पोरी संपुष्टात आणत आहेत, असंही त्याच्या बोलण्यातून सूचित होत होतं. मग त्याला आमच्या गावातल्या बनाकाकूचा किस्सा सांगितला. बनाकाकू अजूनही तिट्टय़ावर उभं राहून गावाला ऐकू जाईल अशा आवाजात शिव्या देत असते. तिला शिव्या द्यायला काहीही कारण लागत नाही. काळवेळ तर अजिबात नाही. कधी कधी माध्यान्ह रात्रीला तिचा शिव्यांचा सपाटा सुरू होतो तो दिवस उगवायलाच बंद. ती कोणाला शिव्या देते हे कोणालाही माहीत नाही. जाणारे-येणारे, आसपास राहणारे तिच्या शिव्या ऐकून न ऐकल्यासारखे करत असतात. तू शिव्या का देतेस, असं कोणीच तिला विचारत नाहीत. फक्त अमावस्या की पौर्णिमा? एवढाच प्रश्न एकमेकांत कुजबुजतात. बनाकाकूच्या काही शिव्या वानगीदाखल आमच्या मित्राला ऐकवल्या. तर तो टाळा पगळून (आ वासून) माझ्याकडं बघायलाच लागला. अशा शिव्या बाईच्या तोंडी? असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर तरळत होता. मग त्याला आमच्या गावातल्या बायका भांडताना यापेक्षा भन्नाट शिव्या कशा वापरतात, शिव्या कशा भाषेचे सौंदर्य वाढवतात, भाषा अस्सल फक्त शिवीतच कशी सापडते असे तपशील पुरवून त्याच्या ज्ञानात भर घालण्याचा सहेतुक प्रयत्न सुरू केला आणि त्याला सांगितलं, या सगळ्या शिव्यांची निर्मिती पुरुषांनी बाईला गुलाम बनवण्यासाठी केलेली आहे, अगदी जाणीवपूर्वक. तर तो एकदम चवताळून माझ्या अंगावर आला. मग त्याच्या ज्ञानात अधिक भर घालण्याची हुक्की आली. म्हटलं, ‘‘बाबा रे, आपल्या शिव्या गोळा कर.’’

माझ्याकडे जमा असलेल्या शिव्यांच्या संग्रहात एकूण सहाशे शिव्या फक्त ‘आईला’ केंद्रभागी ठेवून अस्तित्वात आल्या आहेत. आईचं सगळं शरीरच फक्त शिवीसाठी उपलब्ध आहे, अशी शंका यावी अशा शिव्या. ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्या सगळ्या अवयवांचा वापर शिवीत. सहज उच्चारली जाते शिवी; पण यात आपण आपल्याच आईचा पराकोटीचा अपमान करतोय एवढी साधी जाणीवही आपल्याला होत नाही. इतके सराईत बथ्थड होऊन आपण शिव्या वापरतो. यात आपण चुकतोय, असा अपराधी भाव मनात तयार होण्याऐवजी अशी शिवी देऊन आपण किती पुरुषार्थ गाजवला असाच आपला तोरा. याला काय म्हणायचं? हे सगळं इतकं अंगवळणी पडलंय की, आईवरून दिली जाणारी एकेक शिवी आईचाच लचका तोडणारी असते. तरी आपल्याला काहीच वाटत नाही. कारण हे सारं आपल्या भाषेत मुरलेलं, पसरलेलं. आईइतक्याच शिव्या बहीण, बायको, मामी, मावशी, काकू, आत्या, आजी, पणजी या सगळ्या नात्यातल्या बायकांना केंद्रभागी ठेवून. प्रत्येक शिवी काळजाला घरं पाडणारी, जिवाचा तिळपापड करणारी, तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी!

शिवीचा हेतू सरळ. समोरच्याचा भडका उडवला पाहिजे, त्याला जास्तीत जास्त अपमानित केलं पाहिजे असा कोणताही; पण यात आपण आपल्याच पवित्र नात्याची विटंबना करतोय असं मात्र कोणालाच वाटत नाही. इतकं कोडगं बनलय प्रत्येक मन. अशा मनात बाईला गुलाम बनवण्यासाठी पुरुषानेच घडवलेल्या भाषेकडे जाणीवपूर्वक बघितले पाहिजे. स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्याकडे जोमाने वाढत आहे. स्त्रीहक्काबाबत सारे जणच सजग झाले आहेत. महिलांचे सबलीकरण हा शब्द परवलीचा बनलेला आहे. स्त्री समानतेबाबत वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळी आंदोलने अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. या साऱ्यांनीच स्त्री आणि भाषा हा प्रश्न आता ऐरणीवर घेतला पाहिजे. भाषा स्त्रीला गुलाम म्हणून वाढवत व विकसित करत असते. या भाषेतील प्रत्येक शब्द स्त्रीचे दुय्यमत्व अधोरेखित करण्यासाठी सरसावलेला असतो. मुलीला वाढवत असताना दुय्यमपणाची भावना निर्माण करण्यासाठी भाषेचा चलाखीने वापर केला जात असतो. स्त्रीने कुठल्याही घरगुती व्यवहारात, निर्णयप्रक्रियेत भाग घेऊ नये याचे संदेशन करणारी भाषा सर्वत्र प्रचलित असते. स्त्रीने पुरुषसत्ताक भाषेला नकार दिल्याशिवाय ती पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त होईल असे आज तरी दिसत नाही. कारण परंपरागत चालत आलेली भाषा ही वर्तनव्यवहारावर, विचारप्रक्रियेवर कब्जा गाजवत असते. भाषेतूनच समाजातील कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकसित होत असते. व्यक्तीच्या मनातील पराकोटीचा राग, द्वेष व्यक्त करण्यासाठी शिवी असेल तर बाईचे बाईपण तिच्यावर लादण्यासाठी भाषा घडवत आणण्याचे काम पुरुषसत्ताक व्यवस्थेने आजतागायत केलेले आहे. हजारो वर्षांच्या या बांधकामाला भगदाड पाडण्याचे काम आता स्त्रीलाच करावे लागेल. भाषिक व्यवहाराचे स्त्रीवादी वाचन व आकलन यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. स्त्री समतेची लढाई पुरुषसत्ताक भाषेला नकार देण्यातून अधिक टोकदार बनणार आहे. यातूनच नव्या भाषेची मागणी मूलगामी बनत जाऊन समानतेची भाषा निर्माण करणाऱ्या नव्या वाटा निर्माण होत जातील.

दलित, शोषित समाजाच्या जगण्याबाबत, त्यांच्याविषयी वापरल्या जाणाऱ्या भाषेबाबत आपण खूपच सजगपणे विचार करून कायदेकानू बनवत आलो. दलित समाजाबाबत अनुद्गार काढल्यास, जातीचा उल्लेख करून अपमानित केल्यास शिक्षा व्हावी आदी गोष्टींसाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची निर्मिती झाली. त्यातून त्या समाजास आत्मभान प्राप्त झाले. शब्द उच्चाराबाबत, शिवी उच्चाराबाबत, जात उल्लेखाबाबत सर्वजण सजग झाले. कोणाचाही जातीय उल्लेख करताना समाजातील सामान्यातील सामान्य माणूसही आज सजग बनला असल्याचे वर्तमान आहे. मात्र दलित, शोषित वर्गापेक्षाही अनेकदा अतिशय भयावह जीवन जगणाऱ्या आणि समाजात ५० टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रीबाबत मात्र भाषिक पातळीवर आपण काहीच पाऊल उचलले नाही. त्यामुळे स्त्रीच्या उल्लेखाच्या शिव्या, या शिव्यांचा सरसकट होणारा उच्चार याचा विचार आपण गंभीरपणे केला नाही. समाजाचा निकोप आणि निर्मळ विचार करणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा स्त्रीला ‘अ‍ॅट्रॉसिटी’ अधिकार मिळाला पाहिजे, अशी मागणी करणे नितांत गरजेचे होते. स्त्रीविषयक कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कार्यालयीन ठिकाणी स्त्रीचा छळ, स्त्रीची अवहेलना याबाबत विचार करत राहिलो; पण भाषिक व्यवहारातील स्त्रीच्या अपमानित जगाचा आपण फारसा वेध घेतला नाही. काही बायकांसमोरसुद्धा एखादा शिक्षित, उच्चपदस्थ, राजकारणी इत्यादी इत्यादी पुरुष ‘च्या ७७७’ अशा शिवीचा उच्चार करतो तेव्हा तो सर्व स्त्री जातीचा अपमानच करत असतो.

स्त्रीला जर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ अधिकार असता तर स्त्रीविषयक शिवी भाषिक व्यवहारातून हद्दपार झाली असती आणि भाषा निर्मळ झाली असती. भाषा निर्मळ झाली की जीवनव्यवहारही आपोआपच निर्मळ होत जातो. निर्मळ जीवनव्यवहारात स्त्रीचे दुय्यमत्व नष्ट होऊन समानतेची वाट अधिक सुखकर होईल; पण विचार कोण करणार आणि मनावर कोण घेणार?

ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्या सगळ्या अवयवांचा वापर असतो शिवीत. सहज उच्चारली जाते शिवी; पण यात आपण आपल्याच आईचा पराकोटीचा अपमान करतोय एवढी साधी जाणीवही आपल्याला होत नाही. इतके सराईत बथ्थड होऊन आपण शिव्या वापरतो. यात आपण चुकतोय, असा अपराधी भाव मनात तयार होण्याऐवजी अशी शिवी देऊन आपण किती पुरुषार्थ गाजवला असाच आपला तोरा. याला काय म्हणायचं? हे सगळं इतकं अंगवळणी पडलंय की, आईवरून दिली जाणारी एकेक शिवी आईचाच लचका तोडणारी असते. तरी आपल्याला काहीच वाटत नाही. कारण हे सारं आपल्या भाषेत मुरलेलं, पसरलेलं. आई इतक्याच शिव्या बहीण, बायको, मामी, मावशी, काकू, आत्या, आजी, पणजी या सगळ्या नात्यातल्या बायकांना केंद्रभागी ठेवूनच असतात. प्रत्येक शिवी काळजाला घरं पाडणारी, जिवाचा तिळपापड करणारी, तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी.

लेखाचा  दुवा :  https://www.loksatta.com/chaturang-news/suttadguttad-article-about-author-rajan-gavas-5-1858705/

Comments are closed.