संहिता

1,768

तुझ्या वंशवृक्षावरील गूढ गाणी मला एकदा समजून सांग.

अहिल्येची शिला झाली… इतकी तृप्ती तिला कशाने लाभली?

प्रकाशाची गाठ सुटताना इंद्राच्या शरीराला फुटलेले डोळे

कसे चमकले? आणि धर्माला सहन करनारया पांचालीचा योग;

पतिव्रता गांधारीच्या जाणत्या डोळ्यांना उमगलेली भीती, बांधलेली;

सीता-लक्ष्मणामध्ये विरलेले रामायण, त्यांनाही न उमगलेले;

तुझ्या वंशवृक्षावरील ही गूढ गाणी मला एकदा समजून सांग;

प्रकाश पाहून आंधळे बनण्याचीही आता माझी तयारी आहे.

माझ्या डोळ्यावर केस पसरून तो प्रकाश लपवू नको.

हा ध्यास अजून माझा आहे; हे एवढेच माझे आहे.

रामायण तुझे आहे; आणि महाभारतही तुझेच आहे.

हे एवढेच माझे आहे; वळवळनाऱ्या वासनेवरची.

प्रकाशाची विषारी फणा मला एकदा पहिलीच पाहिजे…

अहिल्याच्या शीलाला पाय लावणाऱ्या प्रत्येक रामाचा दगड होण्यापूर्वी.

-विंदा करंदीकर

संहिता म्हणजे साठवलेले, एकत्र केलेले. संसारातील सहचारीणीच्या संदर्भातील अनुभव ‘संहिता’. या अनुभवातून स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे स्वरूप शोधण्याचा करंदीकरांचा प्रयत्न आहे. मानवी जीवनातील स्त्रीचा इतिहास हा पुष्कळदा मानला जातो तसा बाळबोध सोपा नसून गुंतागुंतीचा आहे, आणि म्हणूनच “तुझ्या वंशवृक्षावरील गूढ गाणी म्हणजे मला एकदा समजून सांग” असे करंदीकर म्हणतात. या गूढ गाण्यांचे स्वरूप म्हणजे स्त्रीत्वाच्या सत्यस्वरूपाचे दर्शन. या सत्याचे दर्शन कदाचित परंपरेने मानलेल्या मूल्यकल्पना उधळून टाकील. पण तरीही ते दर्शन घ्यायचे आहे ही जाणीव “प्रकाशाची विषारी फणा” या प्रतीकातून व्यक्त होते. स्त्रीचे सहजस्वाभाविक असे वासनात्मक जीवन लपवून ठेवून तिच्यावर देवतापण लादण्याचा पारंपारिक प्रयत्न करंदीकरांना स्त्रीचे सत्य स्वरूप समजून घेण्याच्या आड येईल असे वाटते. शारीरिक वासनेची झेप किती अनावर असते हे स्त्री सहजपणे जाणते. गांधारीने आपले डोळे कायमचे बांधून घेण्याचे व्रत हे कदाचित उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पहिले तर आपली निष्ठा आंधळ्या नवऱ्यावर राहू शकणार नाही या भीतीतून निर्माण झाले असण्याची शक्यता करंदीकर सुचवतात. हीच पतिव्रता गांधारीच्या जाणत्या डोळ्यांना उमगलेली भीती. अहिल्या आणि इंद्र, सीता आणि लक्ष्मण, गांधारीने स्वीकारलेले आंधळेपण या प्रतीकांतून स्त्रीच्या वासनेचे खरे स्वरूप, त्यावर गोडगोड उदात्त कल्पनांची झूल न घालता, शोधण्याचा करंदीकरांनी प्रयत्न केला आहे.

Comments are closed.