हिंसामुक्त जीवन हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार…

881

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवसाच्या निमित्ताने…  

आज २५ नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय हिंसाचार विरोधी दिवस. १९६० मध्ये याच दिवशी ‘डोमिनिकन रिपब्लीक’ या कॅरिबियन देशातील ‘मिराबल’ या मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन बहिणींची राफेल त्रजिललो या अधिकाऱ्याच्या आदेशावरून हत्या करण्यात आली. १९८१ पासून या तीन महिलांचा स्मृतिदिन – २५ नोव्हेंबर हा दिवस ‘हिंसा विरोधी दिवस’ मानला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसारही हा दिवस, ‘आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवस’ म्हणून घोषित केला. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर (मानव अधिकार दिवस) हे १६ दिवस जगभरात विविध ठिकाणी लोक एकत्र येऊन  स्त्रियांवरील हिंसा निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवितात तसेच जनजागृती करतात.

महिला त्यांच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक हिंसा सहन करत असतात.  समाजात मारामारी केली किंवा रक्त पाहिलं तरच त्याला हिंसा म्हटले जाते. परंतु, स्त्रियांवरील हिंसा ही फक्त मारहाणीपुरती मर्यादित नसून त्याचे अनेक प्रकार आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार… मुलीचा गर्भात मृत्यू…जेवणात केस सापडला म्हणून बायकोला मारहाण… बायकोवर संशय… बायकोला घराबाहेर पाडण्यासाठी बंधन…कॉलेजमधील मुलांकडून छेडछाड सहन करायला लागल्यामुळे कॉलेज सोडायला लागणे…खाजगीत काढले फोटो फेसबुकवर व्हायरल होणे …    उच्चशिक्षित असूनही लग्नानंतर करिअरच्या संधी नाकारणं…

यांसारखे एक ना अनेक हिंसाचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. आधुनिक काळात फोन, इंटरनेट यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हिंसा केली जाते. पितृसत्ताक पद्धतीने स्त्रियांचे श्रम, प्रजनन आणि लैंगिकतेचा वापर व नियंत्रण करण्यासाठी हिंसेचा वापर केला आहे. प्रत्येक स्त्रीला एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र असण्याचा, मोकळं असण्याचा आणि स्वतःच्या मर्जीने, भीती आणि हिंसामुक्त जगण्याचा अधिकार आहे. आज हिंसाचारविरोधी दिवसाच्या निमित्ताने स्त्रियांवरील हिंसाचार, त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, भेदभाव निर्मूलनासाठी आणि पुरुषप्रधान व्यवस्थेतून येणारी मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करूया. आपण सगळे मिळून प्रतिज्ञा घेऊया…

” आम्ही आज भेदभाव, शोषण आणि छेडछाड रोखण्याचा संकल्प करतो.  समाजातील जातीयता, आर्थिक विषमता आणि पुरुषसत्ताक व्यवस्था आम्हाला माणूसपणापासून दूर नेते. म्हणूनच जातीयता, आर्थिक विषमता आणि पुरुषसत्ताक व्यवस्था तोडण्याचा आम्ही आज संकल्प करतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती लिंग, धर्म, जात, रंग आणि रूपाने वेगवेगळी आहे, या विविधतेचा आम्ही आदर करतो. जात, धर्म, लिंग, राष्ट्रीयत्व याच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला  सुरक्षित वाटावे यासाठी मी प्रयत्नशील असेन. आजपासून माझ्या कोणत्याही कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक नुकसान पोहोचणार नाही याची मी काळजी घेईन. मी प्रत्येक व्यक्तीचा आदर आणि सन्मान करेन. मी प्रतिज्ञा करते/करतो की, मी कधीच कोणाचंही शोषण किंवा छेडछाड करणार नाही. मी नेहमीच पीडित किंवा शोषित व्यक्तीची मदत करण्यासाठी प्रयत्नशील असेन तसेच संवेदनशील समाजाच्या निर्मितीसाठी, अहिंसा, सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन.”

(ही प्रतिज्ञा ‘प्रतिक कांबळे’ या आयसोचसोबत जोडल्या गेलेल्या युवकाने लिहिली आहे.)

चित्र साभार: http://www.pcw.gov.ph

Comments are closed.