क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
स्वतंत्र व्यक्तिमत्व, पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, प्रतिभावंत शिक्षणतज्ञ, नामवंत कवयित्री, उत्तम संघटक, नेता, प्रभावी वक्त्या, विचारवंत, समाज सुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने डॉ. आशिष तांबे यांची कविता खास वेबसाईटच्या वाचकांसाठी…
सावित्रीमाईस कृतज्ञतापूर्वक…
पेटण्याचा निखारा दे
तुफानी वादळात आई
तू मायेचा किनारा दे
माझ्या स्त्रित्वास पुन्हा
पेटण्याचा निखारा दे
एक काळ असा होता
स्त्री शूद्रात फरक नव्हता
चौकट मला आखलेली
चूल मुलात रमलेली
शिक्षणाचा तर गंधच नव्हता
पदराआड मुखडा होता
जगण्याची इच्छा असूनही
सतीच्या प्रथेनुसार
देत होते आहुती
त्यातूनही जगलेच तर
केशवपनाच्या रुढीने
जगत होते जगणे
विद्रूप जळालेले…
मेल्याहून मेलेले…
देवदासी जरठकुमारी
एक काळ असा होता
हा काळ बदलण्याचं बळ
नव्हतं रामाच्या सीते
नव्हतं कृष्णेच्या राधेत
नव्हतं सत्यवानाच्या सावित्रीत
ते बळ होतं आई
फक्त तुझ्यात!
तू जगवलंस
लढायला शिकवलंस
बा ज्योतिबाच्या साथीनं
अक्षरांना शस्त्र करुन दिलंस
शस्त्रांना धैर्य मिळवून दिलंस
खचणार्या शूद्रांना स्त्रियांना
विद्येचा पाठ दिलास…
विद्येसोबत मति आली
मतिसोबत निती आली
नितीसोबत गति आली
गतिसोबत वित्त आले
वात्सल्यास आई
खरा अर्थ दिलास तू
तुझ्या उरातल्या त्या
युगंतर वत्सलधारा दे
माझ्या स्त्रित्वास पुन्हा
पेटण्याचा निखारा दे
एक काळ तसा होता
एक काळ असा आहे
ग्लोबलायझेशनचा
आज मी जगले तर जगते
किंवा मारली जाते भ्रूणातच
एक वीत पोटासाठी
मी विकते…
साडेतीन हात शरीर
दोन घासाच्या भुकेसाठी
पत्नीला मुलीला सुनेला विकणारे
युधिष्ठीर आजही आहेत गं
उपभोगापलीकडे मी असते?
माझ्या जगण्याचा विमा निघतो
पण अब्रूची भरपाई
कशातच नाही
माझं पातिव्रत्य केवळ
पुरुषप्रधानतेचं हत्यार
धर्मस्य तत्वं निहीतं मुहायां
महाजनो ये गतः स पन्थाः
कुंपण शेत खातं
लढायचं कुणाविरुध्द
मेख असते
जळगावात वासनाकांड होतं
कधी कोठेवाडी उध्वस्त होतं
कुठे खैरलांजी जळून निघतं
आम्ही फक्त स्त्री मुक्तिचे
नारे देत राहतो
कडव्या परंपरांचे
गोड तळवे चाटत राहतो
राठोड महासंचालक होतो
रुचिका न्याय मागत राहते
इंद्र राजरोस ऊब घेतो
अहिल्येची चिता जळत राहते
आम्ही एकतर
एसीच्या गार वार्यात
स्लीपवेल गादीवर
सोफिस्टिकेटेड झोप घेतो
नाहीतर हतबलता
उराशी घट्ट धरुन
गुडघे टेकवतो
विधेयक कित्येक येतात
पैसा दाबून मंजूर होतात
33 टक्के आरक्षणाचं घोंगड
तसच भिजत राहतं
कायदे हजार होतात
पळवाटा शेकडो निघतात
कारण न्यायदाती
‘अहिल्या’ नसते
न्यायदाते रामशास्त्री असतात
पण विसरु नका
माझ्यातल्या मानिनीला
रागिणीची धार आहे
जेवढी फुलपाकळी मी
तेवढाच अंगार आहे
पुरे मुखवटे अबलेचे
मला माझा चेहरा दे
माझ्या स्त्रित्वास पुन्हा
पेटण्याचा निखारा दे
तू अक्षरांना शस्त्र करुन दिलेस
तसा मला तस्लिमाच्या
वेदनेचा आक्रोश दे
हरिणीच्या मातृत्वाने
कान्होने संतत्व साधले
तशा बहिणाईच्या ओठातील
कालातीत ओव्या दे
दगडकाठ्यांनी हजरत
प्राणांतिक जशी लढली
तसे झलकारीच्या बाहूंमधले
स्वामिनीनिष्ठ बळ दे
महामानवाचा संसार जिने
उपाशी पोटी धीराने केला
ते आई रमाईचे
धीरोदात्त काळीज दे
कणखर आणि झुंजार
अहिल्येची दृष्टी दे
बहुजनांच्या छत्रपतीचे
खरे गुरुत्व जिचे आहे
त्या युगंधर जिजाऊचे
तेजस्वी राष्ट्रसंस्कार दे
माझ्या पेशीपेशीतला
बुध्द बुध्द जागू दे
माझ्या आचार विचारांना
गौतमीची महामायेची कूस दे
आणि त्यागास मानदंड
एक व्रतस्थ यशोधरा दे
माझ्या स्त्रित्वास पुन्हा
पेटण्याचा निखारा दे
— डॉ आशिष तांबे
संदर्भ: वॉट्सअप वर व्हायरल झालेली पोस्ट