कोणाची ‘रक्षा’ आणि कशाचे ‘बंधन’ ? – मिलिंद चव्हाण

1,414

 

रक्षाबंधन विषयीच्या या चर्चेतून भाऊ-बहिणीचे नातेच असता कामा नये असे सुचवण्याचा अजिबात उद्देश नाही. विरोध नात्यांना नसून नात्यांमधील विषमतेला, उतरंडीला आहे. नाती नसतील तर आयुष्याला अर्थच राहणार नाही. मात्र, केवळ जन्माने मिळालेल्या लिंगावरून कोणालातरी सत्ता-संपत्तीचा उपभोग घेता येणार आणि कोणालातरी ‘त्यागमूर्ती’ बनवले जाऊन दुय्यम दर्जाचे परावलंबी आयुष्य जगावे लागणार, ही विषमता झाली. ती संपवल्याशिवाय स्त्रियांचा माणूसपणाच्या दिशेने होणारा प्रवास गतिमान होणार नाही.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधावी आणि संकटकाळी त्याने तिचे ‘रक्षण’ करावे यासाठीचे ते ‘बंधन’ असते, असे मानले जाते. बहिण भावाला ‘ओवाळते’ आणि भाऊ तिला काहीतरी ‘ओवाळणी’ घालतो. वर्षानुवर्षे – नव्हे पिढ्यानपिढ्या – हे सगळे चालत आले आहे आणि आजच्या समानतेच्या आणि संगणकाच्या युगातही सर्व स्तरांमध्ये हा सण साजरा होतो! यामागे ‘स्त्री ही रक्षण करण्याची वस्तू’ ही मानसिकता आहे, हे उघडच आहे. ‘लहान वयात पिता, तरुणपणी पती आणि म्हातारपणी पुत्र, स्त्रीचे रक्षण करतो’ या अर्थाच्या श्लोकात ‘बंधू’चा उल्लेख नाही. पण, स्त्रीने पुरुषाला राखी बांधून ‘माझे रक्षण कर’ असे सांगण्याचा सण पिता, पती आणि पुत्र यांच्यासाठी नसतो, ही मात्र गंमतच आहे. अर्थात काही प्रसंगी त्यांना ‘ओवाळले’ जातेच! शिवाय, ‘चांगला (!) नवरा मिळावा’, ‘सात जन्मी (?) तोच मिळावा’ म्हणून व्रतवैकल्ये असतातच !

एकूणातच, बाईचे आयुष्य कसे पुरुषकेंद्री असते, याचे हे प्रतिबिंब आहे. ‘चांगली बायको मिळावी’ यासाठी पुरुषांनी करायची कोणतीही व्रतवैकल्ये नाहीत! नव्याने लग्न झालेला तरुण तशाच तरुण मुलांच्या बरोबरीने धोतर नेसून, टोपी घालून (नाकात नथ वगैरे घालण्याचा प्रश्नच नाही!), स्वत:च्या हाताने विणलेल्या रुमालाने झाकलेले पूजेचे तबक घेऊन ‘सात जन्मी हीच बायको मिळावी’ म्हणून कुठल्यातरी वृक्षाची पूजा करायला निघाल्याचे चित्र डोळ्यासमोर आणणेही किती कठीण आहे! थोडक्यात, रक्षाबंधन हा बाईला ‘दुबळी’ ठरवणाऱ्या सामाजिक रचनेचा एक भाग आहे.

स्त्री चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कमला भसीन यांच्या मते बहिण भावापेक्षा मोठी असली आणि तिनेच त्याचे रक्षण केले असेल किंवा करत असेल तरीही राखी मात्र तिनेच भावाला बांधली पाहिजे! बहिण भावाला म्हणाली की ‘तुझं नाक वाहत होतं तेव्हापासून मी तुझं रक्षण करते आहे’; तरीही भाऊ तिला राखी बांधणार नाही!! उलट बहिणीनेच ती त्याला बांधावी म्हणून आई-वडील दबाव आणतील. धाकट्या भावाच्या पालनपोषणात बहिणीने कितीही महत्त्वाचा वाटा उचललेला असला तरी तो ‘पुरुष’ असल्यामुळे तिचे ‘रक्षण’ करणार असे मानून तिनेच त्याला राखी बांधणे अपेक्षित असणार! त्यातून तिचे स्थान त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहे, असेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सूचित केले जाते! कमलाताईंचे हे म्हणणे अंतर्मुख करायला लावणारे आहे. बहिणीने बहिणीला आणि भावाने भावाला राखी बांधायची नसते कारण ‘पुरुषाने बाईचे रक्षण करायचे असते’, असे मानले गेले आहे !!

यावर उपाय काय? भाऊ आणि बहिण यांनी एकमेकांना (हवे असल्यास, बहिणीने बहिणीला, भावाने भावाला) राखी बांधावी अन्यथा कोणीच कोणाला राखी बांधू नये. गोडधोड खाऊन, गरज पडेल तेव्हा एकमेकांवर बिनशर्त प्रेम करत एकमेकांना पाठिंबा देण्याचा, संपत्तीसह दोघांनाही समान हक्क आहेत हे समजून घेण्याचा, एकमेकांच्या मदतीला येण्याचा संकल्प मात्र जरूर करावा!

 

2 Comments
  1. गोपी says

    खूप चांगले विचार आहेत । मी तुमच्याशी सहमत आहे

    1. I सोच says

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

Comments are closed.