खरी गोष्ट.. परोमिता व्होरा

0 1,123

प्रेम, समागम आणि कामेच्छा या मुद्द्यांभोवती माझं काम असल्यामुळे संमती आणि नकार यांसारख्या विषयांवरील अनेक जाहीर चर्चांमध्ये मी सहभागी होत असते. काही दिवसांपूर्वी एका चर्चेत ‘नकार’ मिळाल्यावर लोक कसे व्यक्त होतात यावर बोलणं चालू होतं. तेंव्हा त्या चर्चेत अनेकदा ‘खरंखुरं नातं’ (a real relationship) ही संकल्पना समोर आली. थोडक्यात मुद्दा असा होता की, ‘त्याने रागवायचं काही कारण नव्हतं. त्यांच्यात काही खरंखुरं नातं नव्हतं. येऊन-जाऊन ‘वॉट्स अप’ वरची ओळख त्यांची.’

एक प्रश्न इथे उभा राहतो तो म्हणजे, खरंखुरं नातं असतं तरी काय? खरं नातं म्हणजे लग्न? की फिल्मी पद्धतीने ‘आय लव यू’ म्हणणं किंवा ‘तू माझी मैत्रीण/ मित्र / पार्ट टाईम प्रियकर होशील का’ म्हणणं? की जेंव्हा तुम्ही तुमच्या ‘घोषित’ जोडीदारासोबत फोन सेक्स करता तेंव्हा ते खरं नातं असतं आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत तेच करता तेंव्हा खोटं असतं? एखादी सहज म्हणून वाढंत गेलेली प्रणय चेष्टा (फ्लर्टींग) खरं नातं असू शकतं का? पत्र, इमेल्स यांच्यामार्फत चालणारा प्रेम संवाद नातं असतं का? ते खरं असतं का? (‘तुम्हारी अमृता’ या नाटकाच्या यशावरून तरी असं वाटतं की ते खरंच असतं.)

एखाद्या दिलदार, समविचारी परंतु अनोळखी व्यक्तीसोबत तुमच्या गहिऱ्या वासना आणि आतापर्यंत सर्व जगापासून लपवून ठेवलेल्या शरमेच्या गोष्टी सांगत, चांदण्यांच्या प्रकाशात रस्ताभर रात्र तुडवण्याबद्द्ल काय? किंवा FWB, NSA, ONS (Friends With Benefits, No Strings Attached, One Night Stand) सारख्या शॉर्ट फॉर्म्स रुपी संकल्पनांच्या आडोशाने ‘सहज’ म्हणून केल्या जाणाऱ्या लैंगिक संबंधांचे काय? यांचा समावेश खऱ्या नातेसंबंधांमध्ये होतो का? हे सर्व उलट-सुलट प्रश्न इथेच थांबवायला हरकत नाही. कारण उत्तरं उघड आहेत. ही सर्व नातीच तर आहेत ज्यात माणसं कामयुक्त प्रेमसंबंधातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने एकमेकांशी जोडली जातात. ही देवाणघेवाण वास्तवात घडते त्यामुळे ती खरीच असते. ही सर्व नाती सारखीच आहेत का? तर अगदीच नाही. या नात्यांचे रूप, त्यांना दिला जाणारा अर्थ, त्यातील अपेक्षा किंवा या नात्यांना आपापल्या आयुष्यात दिलं जाणारं स्थान यानुसार बराच फरक आहे. मग आपण जेंव्हा असं एखादं नातं खरं आहे किंवा खोटं आहे असं म्हणतो तेंव्हा खरंतर आपल्याला काय म्हणायचं असतं?

जेंव्हा आपण ‘खरं नातं’ हा शब्द वापरतो तेंव्हा आपण त्याच्या ‘खरे’ पणाबद्दल बोलतच नसतो. आपण बोलत असतो एका उतरंडीबद्दल. आपण म्हणत असतो; एक विशिष्ठ प्रकारचं नातंच – जे की ‘सामान्य’ नात्यासारखं दिसतं, पितृप्रधान व्यवस्थेने आखून दिलेल्या ‘लग्न झालेलं जोडपं’ च्या व्याख्ये बरहुकूम दिसतं (मग ते समलिंगी असू दे अथवा विषमलिंगी), जे समाजाची मान्यता आणि व्यवस्थेतील फायदे मिळवण्यासाठी लायक असतं, खरं नातं असतं. बाकी सर्व नाती, म्हणजे जी ‘खरी’ नाहीत ती अमान्य, अनामिक राहू शकतात, एक प्रकारच्या संदिग्धतेच्या गर्तेत गटांगळ्या खात. नाकारलं जाण्यातील हिंसेसाठी अगदी सहज उपलब्ध. अस्वीकारातील आणि अदृष्य ठेवलं जाण्यातील ही जी हिंसा आहे ती नातेसंबंधांची एक प्रकारची संपूर्ण जात व्यवस्थाच तयार करते. त्यातून आपण ठरवतो की आपलं या ‘खऱ्या’ नसलेल्या नातेसंबंधाशी काही देणंघेणं नाही. आणि खरंतर या नातेसंबंधांनीच आपल्या सर्व भावनिक जीवनाचा तानाबाना विणलेला असतो.

या वेगळ्या वाटणाऱ्या नाते संबंधांचं आपण काय देणं लागतो? थोडं अवघड वाटेल पण खरं तर खूप सोप्प आहे. एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या जीवनातील नात्यांचं ‘महत्व आणि बांधिलकी’ च्या अनुषंगाने एक वर्गीकरण केलेलं असतं आणि असं करू नये म्हणणं हा एक निव्वळ फॅसिस्ट विचार होईल. अर्थात असं न करणं आपण स्वतः ठरवलं असेल तर ते निराळं. परंतु एक समाज म्हणून प्रत्येक नातेसंबंधाचं अस्तित्व मान्य करणं आणि त्याला किमान एक आदर देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण समाज म्हणून हे देणं लागतो. इथे ‘हो’ किंवा ‘नाही’ रुपी द्वंद्व अपुरं आहे, कारण हे द्वंद्व खऱ्या आणि खोट्या, संमत आणि असंमत या कल्पनांवर आधारित आहे. या पलीकडे जाताना, ‘हो’ किंवा ‘नाही’ मधील अधिक व्यामिश्र प्रदेशांबद्दल आपलं मत बनवताना, अनेकविध शक्यता आणि बहुनिवड या गोष्टींचा स्वीकार आवश्यक आहे. नाकारलं जाताना किंवा नकार देताना ‘संमती’ या मुल्याप्रती आदरयुक्त असण्यात, सर्हुदय व अहिंसक होण्यात याच गोष्टींची आपल्याला मदत होईल.

संमती आणि हिंसेला जोवर आपण केवळ जहरी मर्दानगीच्या चौकटीतच पाहत राहू तोवर हे मुद्दे अधिकाधिक जटील आणि किचकट होत राहतील. माणसांच्या विविध कामेच्छा आणि संबंधांना अनामिक आणि अवैध ठरवून त्यांना साशंक, भयग्रस्त, शरमिंदं आणि क्षुब्ध बनवत पितृसत्ता आपल्या सर्वांनाच घायाळ करत आली आहे. जिव्हाळ्याच्या नात्यांतील हिंसेची ही संस्कृती, जिथे आपला नित्य निवास राहिला आहे, ती बदलणं गरजेचं आहे.

स्वैर रुपांतर – अच्युत बोरगावकर

संदर्भ : मुंबई मिरर. १ जून २०१८

https://mumbaimirror.indiatimes.com/opinion/columnists/paromita-vohra/the-real-thing/articleshow/64407431.cms

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.