एका प्रेमाची एक गोष्ट …

2 1,438

अडीच महिन्यानंतर तो तिला प्रपोज करायला पाचशे किलोमीटरचं अंतर पार करून आला. त्यावेळी तिला जरा धाकधूक होती. कारण तो अजून काहीतरी सांगणार होता. तसेच काही अंदाज मनात बांधले असले तरी त्याचं आधी एका मुलीवर प्रेम होतं हे ऐकून ती काही क्षण स्तब्ध झाली. ते प्रेम नव्हतं, आकर्षण होतं आणि आता त्यातलं काहीच नाहीये. हे संपून पुरेसा काळ मध्ये गेलाय, असं स्पष्टीकरणही त्याने दिलं. हे कसं सांगावं हे त्यालाही इतके दिवस कळत नव्हतं. कारण तिला गमावण्याची भीती वाटत होती. तिनं एक महिन्याचा वेळ घेऊन होकार कळवला, तिच्या स्टाईलनं! त्यालाही तिच्या मनातील शंका-कुशंका संपून मोकळेपणाने घेतलेला निर्णय हवा असतो. दोघांकडूनही प्रेमाचा अनुभव तितकाच तरल… खरा असावा एवढंच तिला मनापासून वाटायचं. तिला त्याचं तिच्यावरचं प्रेम, ओढ आणि लग्नाची घाई हे सगळंच कळत होतं. प्रत्येकाच्या बाबतीत पहिल्या प्रेमाचा अनुभवच आयुष्य असेल असं नाही होऊ शकतं. शेवटी भावना खरी असणं आणि ती मनापासून जगणं महत्वाचं असं वाटून त्याला संधी दिली.

नंतर काही महिन्यांनी एकत्र प्रवास करत असताना तिकीट काढण्याच्या वेळेस तो त्याच्या पाकिटातलं काहीतरी लपवतोय असं वाटलं. हे लक्षात येऊन तिनं पाकिट पाहिलं. त्यात ‘त्या’ मुलीचा फोटो होता. काहीच न बोलता तिनं ते पाकिट फोटोसहित परत केलं. दुसऱ्याच क्षणी त्यानं तो फोटो फेकून देण्यासाठी खिडकीजवळ हात नेला. तेव्हा तिनं थांबवलं त्याला. कारण अशा प्रकारे फोटो फेकून देणं म्हणजे तिला ‘तिचा’ अपमान वाटत होता. तिच्याबरोबर घालवलेल्या चांगल्या क्षणांचा अपमान वाटत होता. तरीही तिच्या मनावर एक ओरखडा उमटणं साहजिक होतं. तो आपल्याला फसवतोय, खोटं बोलतोय की काय असं तिला वाटलं. तिथं ती त्याच्याशी काहीच बोलली नाही. नंतर त्यानं अनेक फोन, मेसेजेस केले. तिनं प्रतिसाद नाही दिला. तिलाही त्याच्याशी अबोला धरल्याचा त्रास होत होता. पण स्वतःच्या मतांशी ठाम असणंही महत्वाचं होतं. काही दिवसांच्या दुराव्यानंतर तिनं भेटून बोलण्याच्या त्याच्या प्रस्तावाला होकार दिला. इतक्या दिवसांनी भेटताना योगायोगानं दोघांनीही एकमेकांसाठी एकसारखीच भेट आणली… मोगऱ्याचा गजरा! अर्थात त्यानं घडलेल्या गोष्टीचा निर्वाळा दिला. तो फोटो पाकिटात कसा ठेवला, ते जाणीवपूर्वक नव्हतं असं सारं सांगितलंही. पण एक ओरखडा तिच्या मनावर राहिला. ‘हा कधीतरी आपलाही फोटो असाच फेकून देईल का?’ असं वाटून गेलं. त्यानं मागूनही, नकळत्या क्षणी फोटोसाठी ओढाओढी होऊनही तिचा फोटो तिनं त्याला कधीच दिला नाही.

2 Comments
 1. vinayak khairnar says

  खुपच सुंदर उपक्रम सुरु केला आहे त्यासाठी तुमच्या सर्व टिमचे अभिनंदन . काळाच्या गरजेनुसार टाकलेले हे पाऊल आम्हा तरुणांसाठी मार्गदर्शकची भूमिका यशास्वीपणे पूर्ण करत आहे.
  या उपक्रममुळे सेक्स सारख्या नाजुक विशयबबताचे गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
  पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद

  1. I सोच says

   तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहोत. यासोबतच तुमचे अनुभव आम्हाला लिहून पाठवा. आम्हाला ते समजून घ्यायला आणि ते इथे प्रसिद्ध करायला नक्कीच आवडतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.