आता मात्र मला  “हरकत आहे”…

0 983

मी विसळत होते उष्टी भांडी…

जेव्हा तू बोलत होतास,

परिसंवादात ‘स्त्री’ च्या श्रमप्रतिष्ठेवर..

कुण्या एकीच्या तरी कष्टाची होईल किंमत म्हणून म्हंटल,

“हरकत नाही”

मला रडवत होता तुझा अबोला,

जेव्हा प्रकाशित होतं होत

‘स्त्री-पुरुष संवादावर’तुझं पुस्तक..

कुणा एका नात्यात तरी बोलका होईल वाद म्हणून म्हंटल,

“हरकत नाही”

मला वेध लागले होते शृंगाराचे,

जेव्हा तू देत होतास बौद्धिक

‘स्त्रीच्या भावनांची’व्हावी कदर…

कुण्यातरी ‘ती’च्या तरी नजरेला मिळेल होकार म्हणून म्हंटल,

“हरकत नाही”

धूळ खात होत्या माझ्या पदव्या,

जेव्हा तू अभिमानाने वाचली बातमी

‘अर्थशास्त्रातल्या स्त्री’च्या योगदानाची..

एकीच्यातरी प्रमाणपत्राला मिळेल रोजगार म्हणून म्हंटल,

“हरकत नाही”

मी घेतंच होते गोळ्यांवर गोळ्या,

जेव्हा तू आग्रही राहिलास,

तुझ्या बहिणीने दोघींवरच थांबावं…

त्यांच्या तरी वाट्याला येऊ नये माझ्या कळा म्हणून म्हंटल,

“हरकत नाही”

मी घरात होत गेले बंदिस्त,

जेव्हा तू झगडत राहिलास

‘स्त्री मुक्ती’साठी…

एखादी तरी होईल भोगण्यातून मोकळी म्हणून म्हंटल,

“हरकत नाही”

एकदा बिचकून पाहिलं शेजारच्या घरातल्या कोपऱ्यात,

तर ती ही काढतच होती उष्टी…

तीच्याही हाकेला नव्हती साद…

तीच ही राहून गेलं होतं लाजणं…

तिची ही अधुरी होती स्वप्नं…

तिचे ही होतंच होते गर्भपात…

ती ही तितकीच होती जखडलेली…

हादरले मी..

अन धावतच जाऊन पाहिलं प्रत्येक शहराच्या चौकात,

तर तो ही म्हणत होता ,

हवी स्री-श्रमाला प्रतिष्ठा…

हवी स्त्रीपुरुषात निखळ मैत्री…

हवी स्त्री भावनांची कदर…

हवी अग्रस्थानी स्त्री…

हवी स्त्रीला निर्णयशक्ती…

हवी स्त्री मुक्तच…

सगळीकडे ‘फक्त’ तोच बोलत होता..

तो फक्त ‘बोलतच’ होता…

आता मात्र मला  “हरकत आहे”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.