“आता बास झालं!” – रोझ मॅक्गोवन    

1,310

हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप झाले आणि त्याच्या विरोधात हॉलिवूडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याचबरोबर यादरम्यान चालविल्या गेलेल्या #metoo अभियानाला देखील प्रतिसाद अनेकांनी प्रतिसाद दिला. लैंगिक शोषणाविरुद्ध जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हार्वे वेन्स्टाइन विरुद्ध लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर अभिनेत्री रोझ मॅक्गोवनने  पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तिचे मत व्यक्त केले. तिने शुक्रवारी सकाळी डेट्रॉईट येथील महिला अधिवेशनात केलेल्या भाषणात ती बोलत होती. “आपण सगळे मीटूज आहोत” असं म्हणत तिने भाषण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने केलेले भाषण आपल्या वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

“#MeToo  या अभियानाला तुम्ही ताकतीने, मोठ्या प्रमाणात अतिशय चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापसून आभार ! मी गेल्या २० वर्षांपासून गप्प होते. मला अनेकदा  लाजिरवाणी वागणूक मिळाली. मला त्रास दिला गेला. माझ्यावर अत्याचार केले गेले.  मी अगदी तुमच्यासारखीच आहे कारण पडद्यामागे जे काही घडतं ते आपल्या समाजात देखील घडत असतं आणि ते सहजासहजी थांबत नाही.

आपण सगळे मुक्त आहोत, सशक्त आहोत. आपण सगळे मिळून एक मोठा सामूहिक आवाज आहोत. ही एकप्रकारची ‘रोझ’सेना आहे. आपण एकमेकांच्या आयुष्यात ‘रोझ’ (गुलाब) बनून आहोत. रोझ म्हणजे मी नाही बरं का ! खरंखुरं फूल. आपल्याकडे काटे आहेत. काट्यांसोबत न्याय मिळतो आणि त्यासोबत त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात.

आता खुल झालं ! आपल्याला वगळलेलं आपण खपवून घ्यायचं नाही. आपण स्वतःला आणखी दुखावून घ्यायचं नाही. आता एकत्र येण्याची, जागं होण्याची, धाडस एकवटण्याची वेळ आली आहे. आता लैंगिक शोषण करणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या लोकांना संपवण्याची वेळ आली आहे.

सध्या चालत असलेली समीकरणं बदलण्याची वेळ आली आहे. आपण सगळे ही समीकरणं बदलावीत म्हणून खूप वाट बघत आहोत, परंतु आता आपल्याला वाट बघावी लागणार नाही. मला विश्वास आहे ! माझ्या बहिणी, समविचारी, आपले भाऊ, आपण सगळे कोणी एक राष्ट्र, देश नाही तर आपण सगळे स्त्रियांचा एक ग्रह आहोत आणि आपण सगळे आपली स्वतःची गर्जना ऐकू शकाल.

माझ्यासकट सगळे ज्यांना कमीपणाची वागणूक दिली गेली, अनेकदा विनाकारण शरमेनं मान खाली घालावी लागली आणि यामुळे उदासीनतेला सामोरं जावं लागलं त्या सगळ्यांना आवाज उठवायला मदत व्हावी असा माझा प्रयत्न आहे. आता बास. आपण आणखी सहन करायचं नाही. बोला, समोरच्याला लाजवा, मांडा. माझ्याबरोबर सामील व्हा. आपण सगळे एकत्र येऊ यात. आपल्यासाठी, आपल्या  भगिनींसाठी आणि या ग्रहासाठी, पृथ्वीमातेसाठी काय योग्य आहे ते करू यात. या प्रयत्नात आपण सर्वांनी सामील व्हा.

अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या मला रोजच्यारोज प्रेरणा देतात. त्याच प्रेरणेतून मी जर तुमच्यासाठी काही करू शकत असेन तर मी माझ्या सर्व शक्तीनिशी काहीतरी करेन.

हॉलीवुड काहीतरी वेगळंच जग आहे असं वरवर जरी दिसत असलं तरी ते तसं नाहीये. ही तुमच्या मनाला संदेश देणारी एकप्रकारची यंत्रणा आहे. हा तुम्हाला बघण्यासाठी दिलेला एकप्रकरचा आरसाच आहे. तुम्ही स्त्री म्हणून असे आहात, तुम्ही पुरुष म्हणून असे आहात आणि तुम्ही मुलगा, मुलगी, समलिंगी, भिन्नलिंगी आणि ट्रान्सजेंडर म्हणून असे आहात. असं यातून तुमच्या मनावर बिंबवलं जातं.

इथे आल्याबद्दल सर्वांचे आभार ! माझ्या आयुष्यातील  अतिशय अवघड काळात माझ्या पंखांना बळ दिल्याबद्दल धन्यवाद ! सगळीकडेच छेडछाड करणाऱ्या या राक्षसांना सामोरं जावं लागतं. मला माहित आहे, की मी एकटी नाही. कारण मी आणि लहानशा गावातली ती मुलगी जिच्यावर फुटबॉल संघानं बलात्कार केला होता; आमच्या दोघींमध्ये खरंतर काहीच फरक नाही.

सगळीकडे तीच परिस्थिती आहे आणि ती बदलली पाहिजे कारण यात आपण लाज वाटून घेण्यासारखे काहीच नाही. खरंतर चूक त्यांची आहे त्यामुळे लाज त्यांना वाटायला पाहिजे. आपण पवित्र आहोत, सशक्त आहोत, धाडसी आहोत आणि आपण ताकतीने लढू !

आपण बोलू शकतो, आपण आवाज उठवू शकतो, आपण मोर्चा काढू शकतो. आपण इथेच आहोत आणि आपण कुठेही जाणार नाही.

माझे नाव रोझ मॅक्गोवन आहे, मी धाडसी आहे आणि आपण वेगळे नाही.  धन्यवाद ! ”

नोट: अभिनेत्री रोझ मॅक्गोवनचे भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Comments are closed.