गर्भपात – आमच्या शरीरावर आमचा हक्क

गरोदर राहणं ही एक चांगली, आनंददायी भावना आहे. मात्र नको असताना दिवस गेले तर मात्र गरोदरपण ही नकोशी आणि ताणाची भावना असते. अनेकदा गर्भनिरोधक न वापरल्यामुळे किंवा निकामी ठरल्यामुळे दिवस जातात. किंवा बलात्कार, जबरदस्तीमुळेही दिवस जातात. अशा वेळी गरोदरपण नक्कीच नकोसं असतं. अनेक बाळंतपणं झालेल्या स्त्रीला किंवा जिला मूल नकोच आहे अशा स्त्रीलाही मनाविरुद्ध दिवस गेले तर ते मूल वाढवायचं का नाही हे ठरवण्याचा अधिकार असणं गरजेचं आहे. गर्भपाताचा निर्णय कधीच अगदी सहज घेतला जात नाही. त्यामागे विचार असतोच आणि अगतिकताही असते. सर्व समाजांमध्ये अगदी पुरातन काळापासून स्त्रीने जिवाला धोका असतानाही गर्भपात करून घेण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. गर्भपात करता येणे, सर्व स्त्रियांना गर्भपाताची सुरक्षित सेवा मिळणे आणि त्यासंबंधी समाजात जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण होणं आवश्यक आहे.

गर्भपात म्हणजे काय?

गर्भधारणेच्या पहिल्या 28 आठवड्यात गर्भ गर्भाशयातून बाहेर पडला तर त्याला गर्भपात असं म्हणतात. गर्भपाताचे दोन प्रकार आहेत. काही वेळा गर्भ आपोआप पडून जातो त्याला नैसर्गिक गर्भपात असं म्हणतात. मात्र काही वेळा स्त्रीला मूल नको असेल किंवा तिच्या किंवा जन्माला येणाऱ्या बाळाच्या प्रकृतीला गंभीर धोका असेल तर कृत्रिमरित्या गर्भपात केला जातो. त्याच्या मुख्य पद्धती पुढीलप्रमाणे

  • क्युरेटिंग (Dilation and Curetting)
  • शोषण पद्धत (Manual Vacuum Aspiration or Electronic Vacuum Aspiration)
  • गोळ्यांचा वापर करून (Medical Abortion)

भारतामध्ये 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे. आईच्या जिवास धोका असल्यास, गर्भामध्ये गंभीर व्यंग असल्यास, बलात्कारातून गर्भ राहिला असल्यास किंवा गर्भनिरोधक निकामी ठरल्याने गर्भ राहिला असल्यास गर्भपात करण्यास परवानगी आहे. पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यात तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो.

गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्या. गर्भपात करणारी डॉक्टर प्रशिक्षित आहे का याची माहिती करून घ्या. जिथे गर्भपात करणार तो दवाखाना, जागा साफ व निर्जंतुक आहे ना याची खात्री करणं आवश्यक आहे. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घ्या.

सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षित गर्भपाताची सेवा मोफत दिली जाते. त्याची मागणी करा.

गर्भपात केल्यानंतर काही काळजी घेणं गरजेचं आहे.

  • किमान दोन आठवडे लैंगिक संबंध ठेऊ नका
  • न चुकता दोन तीन आठवड्यांनी तपासणी करून घ्या.
  • गर्भपातानंतर चार ते सहा आठवड्यात पाळी सुरू होईल. पण सहा आठवड्यानंतरही पाळी आली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • भरपूर पाणी प्या, पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय फळं, ताक असे पदार्थ खा.
  • पोटातील वेदना आणि रक्तस्राव कमी करण्यासाठी पोटाच्या खालच्या भागात हळूवारपणे आणि वारंवार मसाज करा.
  • दुखत असल्यास पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवा.

खालील लक्षणं गंभीर आहेत. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • अति रक्तस्राव
  • जास्त ताप
  • पोटात वेदना
  • बेशुद्धपणाचा झटका, चक्कर येणे
  • योनीमार्गातून वाईट वासाचा स्राव

हे कायम लक्षात ठेवा

  • गर्भपात हे पाप नाही. भारतात काही परिस्थितीत 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायद्याने मान्य आहे.
  • मात्र सततचे गर्भपात बाईच्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाची पद्धत म्हणून गर्भपात करत राहणं योग्य नाही.
  • 18 वर्षांवरील स्त्री स्वतःच्या संमतीने गर्भपात करून घेऊ शकते. पालक अथवा नवऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नसते. अल्पवयीन मुली किंवा मतिमंद असणाऱ्या मुलींना गर्भपातासाठी पालकांच्या परवानगीची आवश्यकता असते.
  • गर्भपातानंतर एक आठवड्याच्या आत तांबी बसवू नका. तुमच्या संमतीशिवाय तांबी बसवण्याचा डॉक्टरांना अधिकार नाही.
  • गर्भपाताबद्दल गुप्तता राखणे आणि गोपनीयता राखणे हा तुमचा अधिकार आहे.

Image – Karen Haydock,
 In Our Hands, Tathapi Publication

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

20 Responses

  1. Sushil says:

    Majya gril frnd pregnent haye tr mala te bal padayche haye pls hhelp me

    • I सोच says:

      पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या मैत्रिणीला दिवस गेले असतील आणि तिची इच्छा व संमती असेल तरच गर्भपात करता येतो. तुम्हाला हा निर्णय परस्पर घेता येत नाही. तिची गर्भपात करून घेण्याची तयारी असेल आणि तुम्ही तिला याबाबत पाठिंबा देत असाल तर चांगली गोष्ट आहे. तिला तुमच्या आधाराची गरज असू शकते. तशी गरज असेल तर तिला नक्की मदत करा. मात्र तिच्या मर्जीविरोधात गर्भपाताचा निर्णय घेऊ नका.
      ती 18 वर्षांहून मोठी असेल म्हणजे सज्ञान असेल तर ती तिच्या जबाबदारीवर गर्भपात करून घेऊ शकेल. गर्भपात करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भपात करून घेतला पाहिजे. नोंदणीकृत सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात गर्भपाताची सेवा मिळते. सोबत कोणी तरी मोठी (सज्ञान) व्यक्ती असणं गरजेचं आहे. तुमची मदत नक्कीच होऊ शकेल.
      जर एकच महिना पाळी चुकली असेल तर गर्भपात करणं सुरक्षित आहे. जितक्या जास्त लवकर गर्भपात करता येईल तितका चांगला. जास्त दिवस गेले तर त्यानंतर त्यातली गुंतागुंत वाढू शकते. पहिल्या महिन्यात किंवा दोन महिन्यात गर्भपात करणं जास्त जिकिरीचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मदतीनेच हा निर्णय घेणं श्रेयस्कर आहे.
      तुम्ही कुठे राहता हे सांगितलंत तर तिथल्या काही डॉक्टरांचे किंवा सुरक्षित दवाखान्यांचे नंबर तुम्हाला पाठवता येतील. पुढे एक पत्ता दिला आहे, तिथे फोन करून चौकशी करून घ्या. ही संस्था सुरक्षित गर्भपाताची सेवा देते आणि तिथे तुमची ओळख उघड होणार नाही. त्यामुळे न संकोचता फोनवर चौकशी करा. खरं तेच सांगा. मुलीचं वय, किती दिवस झाले आहेत या गोष्टी खऱ्या सांगा. तुम्ही पुण्यात राहत असाल, तर या ठिकाणी गर्भपाताची सेवा मिळू शकेल. नाही तर तुमच्या भागामध्ये कुठे अशी सेवा मिळेल त्याची माहिती तुम्हाला इथे मिळेल.

      Family Planning Association of India,
      Pune Branch, 101,
      Western Court, 1082/1,
      Ganeshkhind Road, Opposite E-Square Cinema,
      Shivajinagar, Pune 411 016
      Tel. No. : 020-65601453 to 65601457

      गर्भपातानंतरही तुमच्या मैत्रिणीला मानसिक आधाराची गरज असेल. तेव्हा तिची साथ सोडू नका. आणि यापुढे लैंगिक संबंध ठेवणार असाल तर कंडोमचा वापर करूनच संबंध ठेवा. तेवढी जबाबदारी तुम्ही उचलाल अशी खात्री आहे.

  2. Abhay says:

    Mi mazay girlfriend la piriyads yenaychay 1divas agodar sex kela ahe ani mi condom cha vapar kela ahe
    Ti pregnent asel ka pn 7_8 divas zale ajun tila piriyads ale nahi pls help me

    • मित्रा,
      प्लीज डोन्ट पॅनिक. सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करा.
      (स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम काळ ओळखण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ हा लेख वाचा.)

      मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

      नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

      पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत.

  3. Prem says:

    सर माझी मैत्रीण एक महिन्याची प्रेग्नंट होती पण तिने टॅब्लेट खाल्ल्यावर 5 दिवस ब्लिडिंग झाली आहे पण कस कळेल की गर्भपात झाला

    • आधी ही गोष्ट आम्हाला कळत नाही की, तुमच्या मैत्रिणीने नक्की कुठली गोळी खाल्ली होती? जर ब्लिडिंग झाले, तर ते का झाले?

      न घाबरता दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. अन आधी स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा.

  4. Shreya says:

    2 divasapurvi maze Mr ani mazyat laingik sambandh ale tyaveli viry donda baher padle mazya potavr pn tisryanda ani chauthyanda thodas viry aat padl ani mazi palichi tarikh 2 athavde nantrchi ahe tr me pregnant rahu shkte ka

    • गर्भधारणा होण्याची दाट शक्यता आहे. कारण संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर पडले वा थोडे जरी योनीत पडले तरीही बाहेर पडलेले वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही वा आत गेलेल्या थोड्या वीर्याने गर्भधारणा होणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
      गर्भधारणा कशी होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://letstalksexuality.com/conception/
      गर्भ निरोधाकांविषयी माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.

      तुमची मासिक पाळीची तारीख उलटून गेली नाहिये, तेव्हा पाळीची वाट पहा जर पाळी वेळेवर आली तर काहीच काळजी नाही पण जर पाळी वेळेवर आली नाही तर मात्र सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.
      गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो.

  5. Rajan says:

    Mazi bayko pregnant hoti. Pn garbh kharab aslyamule Natural garbhapat zala. Ani pishvi saaf karun ghyavi lagli. 9 feb la pishvi saaf keli hoti. Ani dr bolle 3 mahine chance gheu nka. Pahila period 4 march la ala ani second period 6 april la ala. Tya nantar amhi 21 april la chance ghetla. Kahi problem nahi na doctor. Thank you.

    • तुम्ही डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटा, तपासणी करून तेच योग्य तो निर्णय देतील.

  6. तेजस says:

    माझ्या बायकोचा गरभपात केला १५ दिवस झाले. सगळे व्यवथित झाले. पिशविचे तोंड बंद झाले होते.अाता पुन्हा अंगावरुन जातेय पाळि अलि असेल काय.

    • गर्भपात कितव्या महिन्यात आणि कुठे आणि कोणत्या पद्धतीने केला हे आपण लिहिलेले नाही.
      गर्भपातानंतर पाळी चक्र सुरळित होऊन पाळी येण्यास किमान १-२ महिने, कधी कधी त्याहून अधिक काळ लागू शकतो. १५ दिवसांत रक्तस्राव होणं हे योग्य लक्षण नाही. जिथे गर्भपात केला आहे तिथे तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ असतील तर त्यांना किंवा इतर चांगल्या दवाखान्यात तपासणी करून घ्या.

      • mili says:

        सर माझ्या मिसेस ची पाळी १६ मे रोजी आली आणि आम्ही त्यांनंतर पाच दिवसानंतर आम्ही संभोग केला पुढील काही दिवस आम्ही संभोग केले आता तीची आतापर्यंत पाळी आली नाही माझ्या मिसेस ने म्हणून मी प्रेंग्नसी किट वापरून पाहिले तर त्यावर एक लाईन गडद तर एक फिकट लाईन दिसत आहे तर ती प्रेग्नेंट असु शकते का? व जर असेल तर आम्हाला थोडा मुलाचा विचार थांबवायचा आहे व कशा व कोणत्या पद्धतीने करावा कारण माझा पहिला मुलगा १½वर्षाचा आहे म्हणून आम्ही दोघेही हे cancle कसं करावं हे सांगा

        • गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन शक्य झाल्यास प्रेग्नसी किट पुन्हा वापरुन पहा किंवा डॉक्टरांना भेटा.
          जर मुल नको हव असेल तर तुम्ही गर्भनिरोधके का नाही वापरत? जर मुल नको हवे आहे तर तुम्हाला गर्भनिरोधकांचा वापर करावा लागेल, त्यातल्या त्यात निरोध हे उत्तम साधन आहे.

          अन सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी मूल राहिलं तरी गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

  7. प्रकाश` says:

    मासिक पाळीदरम्यान नवव्या/दहाव्या दिवशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. त्यामुळं पत्नी गरोदर राहू शकते काय?

    • जर निरोध न वापरता लैंगिक संबंध ठेवले गेले तर गर्भधारणेची शक्यता आहे. खरं तर हे त्या स्त्रीच्या मासिक पाळीचक्रावर अवलंबून असते. असो
      पुढची पाळी यायची वाट पहा. जर पाळी यायला उशीर झाला तर प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल.
      पुन्हा काही गरज वाटल्यास नक्की लिहा.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
      https://letstalksexuality.com/conception/
      https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

  8. सुरेंद्र says:

    माझ्या बायको 7 आठवडे झाले प्रेग्नंट आहे….. आम्हाला लगेच मुल नको आहे तर काय करावं लागेल..?…. किती खर्च येईल…?

    • खर्चाचा विचार नंंतर करा. आधी डॉक्टरांना भेटा. ते योग्य मार्गदर्शन करतील.

      पैसे किती लागतील हे खाजगी आहे कि सरकारी वा अजुन कुठे करणार त्यावर ठरेल. ससुन मध्ये तर मोफत आहे.
      मेडिकल अबॉरशन पिल्स ने 500 ते 1000 मधे पण काम होतं (डॉक्टरांच्या सल्ल्याने ही घ्यावी लागते).
      तसेच ग्रामीण व शहरी भागातही रेट मध्ये फरक पडतो. 3 महिन्याच्या आत असल्यास वा 3 महिने होऊन गेलेले असतील तर दरात फरक पडतो.

  9. Sneha waghere says:

    Sir
    Mi jevha pregnancy test kit vr check kel tevha ek line dark aani ek line khupch fiki aali hoti aani jevha sonography keli tr tyat samajal ki pregnancy nahi .
    sonography lavkar kelyamule report negative yeu shakto ka
    Aani achuk Result milnyasathi sonography kevha karavi

    • काही वेळेस प्रेग्नंसी किट मध्ये काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे टेस्ट चूकिचीही ठरु शकते. अशा वेळेस काही लोक वेगवेगळ्या कंपनीच्या प्रेग्नंसी टेस्ट करुन पडताळणी करतात.
      शेवटच्या पाळीनंतर 5 व्या ते 6 व्या आठवड्यामध्ये जर सोनोग्राफी केली असता गर्भधारणेचे अचूक निदान होऊ शकते.
      गरज वाटल्यास डॉक्टरांशी बोलणे कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap