मतिमंद मुलांच्या लैंगिकता शिक्षणासाठी पालक व शिक्षकांकरीता आनंदाची बातमी.

आम्हीही मोठे होतोय – मतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता आणि लैंगिकता संचाचे प्रकाशन

1,355
आम्हीही मोठे होतोयमतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता आणि लैंगिकता संच’ या तथापि ट्रस्ट निर्मित संवाद संसाधनाचे आज ७ नोव्हेंबर २०१९ रोजी श्री अतुल पेठे, प्रसिद्ध नाटककार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रकाशन झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या अपंग कल्याण विभागाच्या मा. आयुक्त प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होत्या तर यलो चित्रपटातील अभिनेत्री गौरी गाडगीळ यांची ही उपस्थिती होती.

मतिमंद मुलांसाठी ‘शरीर साक्षरता आणि लैंगिकता शिक्षण’ यावर संवाद साधण्यासाठी ‘आम्हीही मोठे होतोय’ हा चित्र संच आणि पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शिका हे संसाधन तथापिने नुकतेच तयार केले आहे. आपलं शरीर, भावना, स्व-प्रतिमा आणि आदर, वयात येताना होणारे बदल, खाजगीपणा, आरोग्य आणि सुरक्षितता अशा सर्व मुद्यांवर मतिमंद मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधणारा असा हा अनोखा चित्र संच आहे. त्याचेच प्रकाशन आज वरील पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात न्यू लीफ फौंडेशनच्या ‘गोल्डन ईगल’ या विशेष मुलांच्या जेंबे आणि नृत्य सादरीकरणाने झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘मतिमंद मुलांसोबत लैंगिकता संवाद- का आणि कसा?  हा एक परिसंवादही आयोजित केला होता.

परिसंवादात डॉ. सचिन नगरकर, प्रसिद्ध लैंगिकता तज्ज्ञ, स्वतः पालक असलेल्या डॉ. सुनीता कुलकर्णी, ज्या शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि मेधा टेंगशे, साधना विलेज या प्रौढ मतिमंद मुलांसाठीच्या निवासी संस्थेच्या प्रमुख यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाला उपस्थित मा. आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्वप्रथम तथापिच्या कामाचे कौतुक केले. मतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता आणि लैंगिकता शिक्षण ही खरंच महत्वाची गरज आहे आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून प्रयत्न होणं आवश्यक आहे हा मुद्दा त्यांनी मांडला.

अतुल पेठे यांनी आपल्या अध्यक्षीय व्याख्यानात लैंगिकतेच्या मुद्द्याला घेऊन अनेक महत्वाची मतं मांडली:

लैंगिकतेसारख्या नैसर्गिक गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टीकोन आजही आपल्या समाजात विकसित झालेला नाही. अभिनय क्षेत्रामध्ये देखील लैंगिकतेला कितीतरी चुकीच्या पद्धतीने दाखविले जाते याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या समाजामध्ये फार कमी लोकं आहेत जी याविषयी बोलतात, या मुद्याला घेऊन जनजागृती करत आहेत. तथापि संस्था मतिमंद मुलांच्या लैंगिकतेचा मुद्दा घेऊन काम करत आहे आणि याअंतर्गत मुलांसाठी संसाधन निर्माण केलं याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाला पुणे आणि जिल्ह्यातील अनेक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि विशेष मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच शहरातील आरोग्य आणि लैंगिकतेच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

हा संच हवा असल्यास इथे संपर्क करा.

  • +91  82370  24849
  • +91  73875  98645
  • tathapi@gmail.com

Comments are closed.