अमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी

महेशकुमार मुंजाळे

2,016
नुकत्याच जाहीर झालेल्या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या स्पर्धेत  सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट या विभागात “अमोलीनावाच्या माहितीपटाला पुरस्कार मिळाला

 चलना… नको भेंडी फाटतीय.. आरे बच्चू मोठा कधी व्हायचा तू? चल गप… तू काय रेग्युलर येत असतो का रे इकडं??….. येडा झाला काय बावळ्या, आपले शौकपाणी असले सार्वजनिक नस्तेत, जस्ट एक-दोन वेळा आलोय पोरांसोबत विंडो शॉपिंग करायला… भीती नाय वाटत का राव तुला?… वाटती ना, पण आता गर्दीये.. कुणी विचारलं तर सांगायचं चुकून आलो हिकडं, आम्ही तर दगडूशेठचा रस्ता शोधतोय….. हाहाहा, भारीय आयड्या… चल चल…. ती बघ तुला बोलवतीय… तिच्याकडं काय बघतो गैबान्या, रस्त्यावर सगळा रिटायर माल असतोय.. तिकडं बघ त्या बिल्डिंगमधी असतोय “कवळा माल’. चल जाऊ… नको नको पोलिस धाड टाक्त्यात इकडं आसं ऐकलंय मी. घरी कळलं तर लय मार खावा लागंल…. च्यायला सांगतोय ना काय नाय व्हत, चल तू गप.. आन कुणी ओळखीचं दिसलं तर?… मंग काय नाय. वळख नाय द्यायची, त्यो काय सांगत नसतो कुणाला. त्यालाबी भीती असती ना तू कुणाला सांगशील म्हणून. “तेरी भी चूप मेरी भी चूप’ म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणत्यात याला… हाहाहा, अनुभव बोलतोय भाऊंचा…

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यामध्ये गणपती दर्शन करता करता जर आपले पाय बुधवार पेठेकडे वळले असतील, मुंबई दर्शन करण्यासाठी गेला असाल आणि “मुंबईची नाइट लाइफ एक्स्प्लोर’ करताना आपली गाडी कामाठीपुऱ्याकडे वळली असेल, औरंगाबादेत चेलीपुरा भागाच्या गप्पा ऐकून उत्सुकता वाढली असेल, नाहीच काही तर “टिंडर’सारख्या ऑनलाइन डेटिंग साइटवर कुणा मुलीच्या प्रोफाइलखाली एखाद्या एजंटचा नंबर खुणावत असेल तर आपण घनघोर पापी आहात, असं मी नक्कीच म्हणणार नाही. ही मानवी वृत्ती आहे. गूढ गोष्टींची खोदाई करण्याची उत्सुकता हा आपल्या वृत्तीचा भाग आहे. अगदी लहानपणी पालकांनी “तो बाऊ आहे, हात नको लावू, चावेल’ असं सांगितलेलं असतानाही त्या बाऊसोबत खेळण्याची उत्सुकता असणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणेच आपण आहात. त्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये जाऊन तुम्ही फक्त उत्सुकता शमवत आहात की अजून काही करत आहात हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर नैतिक, अनैतिकतेचे निकष लावून जजमेंटल होणारा मी कोण? आणि झालो तरी तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे म्हणा.

माणसाने उत्सुक असावे, अगदी प्रत्येक गोष्टीमागे त्याने उत्सुक असावे म्हणजे विवेकबुद्धी प्रगत होते. आपण जर अशा “बदनाम गल्ल्यांना’ भेट देऊन आला असाल आणि तिथे असणाऱ्या मुली, महिला या व्यवसायात कशा आल्या? सुरुवात कशी झाली असेल नक्की? असे प्रश्न जर तुम्हाला पडले नसतील तर तुमची चौकस बुद्धी अजून तल्लख करण्याची गरज आहे.

असो, आपण प्रत्येक गोष्ट फार कॅज्युअल घेतो त्याचंच हे एक लक्षण म्हणूयात. आपल्याला ज्या गोष्टींवर प्रश्न पडत नाहीत ते प्रश्न जेव्हा इतर कुणाला पडतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात ती व्यक्ती जेव्हा आपले सर्वस्व पणाला लावते तेव्हा ती आपल्याप्रमाणे सामान्य राहत नाही असामान्य होते. इतिहासात स्वतःची काही ना काही नोंद करून ठेवते. अशाच काही व्यक्तींची नुकत्याच जाहीर झालेल्या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत नोंद झालीय. “बेस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्म’ म्हणजे सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट या विभागात “अमोली‘ नावाच्या माहितीपटाला पुरस्कार मिळाला. जास्मिन कौर रॉय आणि अविनाश रॉय या जोडीने हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. “हॉटस्टार’वर हा माहितीपट उपलब्ध आहे. हिंदीसाठी राजकुमार राव आणि इंग्रजीसाठी विद्या बालनने माहितीपटासाठी निवेदनाचे काम केले आहे.

पश्चिम बंगालच्या जलपायगुडीमधून २०१३ मध्ये गायब झालेल्या पंधरावर्षीय अमोलीचा शोध घेण्यासाठी निघालेली माहितीपटाची टीम तिच्यासारख्या अनेक अमोलींची आपबीती आपल्यासमोर मांडते. अशा मुलींना सोडवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना बोलतं करते. पोलिसांच्या धाडसत्राची दृश्ये दाखवते, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचं आयुष्यही उलगडते. “अपनो के बीच मे सेही कोई एक रेहता है जो ऐसे किसी की लाइफ स्पोइल कर देता है. तो वो मेरे तायाजी निकले थे, उनके घरसे ही मै सप्लाय हुई थी. मै चौदा साल की और बहोत दुबली-पतली थी. तो वो मुझे इंजेक्शन लगाते थे तो बाद में मुझे पता चला की वो इंजेक्शन मुझे ठीक करने के लिए नहीं मुझे बिगाडने के लिये थे, हार्मोन्सके इंजेक्शन जो रेहते है वो इंजेक्शन थे. चौदा साल की एज में मै ऐसी दिखती थी जैसे मै छब्बीस-सत्ताईस साल की औरत हूं.’ ही आहे नीलमची खरीखुरी गोष्ट. वयाच्या चौदाव्या वर्षी तिला तिच्या चुलत्याने एका बिझनेसमनला विकलं. त्या बिझनेसमनबद्दल सांगणारी नीलम काय म्हणतेय पाहा, “जानवरो के जैसे सेक्स करना उसको अच्छा लगता था. बांध देता था, दातों से काट देता था. मै चीखती चिल्लाती थी तो उसको मजा आता था. सिगारेट से प्रायव्हेट पार्ट पर जलाना हो, काटना हो या मारना हो जो भी चीजे वो करता था वो बहुत बुरी चीजे थी मेरे लाइफ की.’ ही अशी अंगावर शहारा आणणारी आपबीती सांगणारी नीलम सांगते की, काही वर्षांनी ती जेव्हा तिच्या घरी गेली या राक्षसाच्या तावडीतून सुटून तेव्हा तिला घरात तिचा स्वतःचा फोटो हार घातलेला पाहायला मिळाला. घरच्यांनी तिला स्वीकारलं नाही. मामाने तर तिला वेश्या वगैरे म्हणत शिव्या देऊन हाकलून लावलं.

हा खऱ्याखुऱ्या कथनाचा माहितीपट पाहिल्यानंतरही आपली सहनशक्ती शिल्लक असेल, संवेदना तग धरू शकत असतील आणि आपली वेश्याव्यवसाय, ह्युमन ट्राफिकिंग, चाइल्ड सेक्स अब्युज अशा गोष्टींबाबत अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता शमली नसेल तर आपण २०१४चा नागेश कुकुनूर दिग्दर्शित “लक्ष्मी’ हा चित्रपट पाहू शकता. खेडेगावात राहणाऱ्या चौदा वर्षांच्या लक्ष्मीला तिचा बाप काही कवडीमोल भावात विकून टाकतो. चिन्ना नावाचा एजंट तिला किडनॅप करून शहरात घेऊन जातो आणि वेश्याव्यवसाय करायला भाग पाडतो. यात लक्ष्मीने भोगलेल्या नरक यातना, त्यातून बाहेर पडण्यासाठीचे तिच्या प्रयत्नांचा मन हेलावून टाकणारा प्रवास यात पाहायला मिळेल. वेश्या व्यवसाय करणारे एजंट, राजकीय नेता आणि पोलिस यंत्रणा अशा सर्वांची मिलीभगत कशी या गुन्हेगारीला पोषक असते हे यात पाहता येईल. यूट्यूबवर उपलब्ध असणाऱ्या या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका सुप्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरने केली आहे. स्वतः नागेश कुकुनूर, सतीश कौशिक, शेफाली शहा, राम कपूर, गुल्फाम खान या सर्व अभिनेत्यांचा दमदार अभिनय या चित्रपटाला प्रखरपणे जिवंत करतो.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या सर्वात शेवटच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये ३११३ बाल तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यातील तब्बल ८६ टक्के म्हणजे २६८६ केसेस लहान मुलींच्या तस्करीच्या होत्या. ही नोंद झालेल्या तक्रारींची अधिकृत आकडेवारी आहे. आजवर नोंद न झालेली आकडेवारी तर विचारता सोय नाही.

या अशा लहान मुली पुरवणारे एजंट देशभरात प्रत्येक ठिकाणी आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. मुलीचा काका, मामा, शेजारचा असेच लोक शक्यतो या तस्करीमध्ये प्रामुख्याने आढळतात. बऱ्याच केसेसमध्ये सख्ख्या बापानेसुद्धा मुलीला अगदी हजार रुपयांसाठीही विकलेलं आहे. शाळेत जाता जाता मैत्रिणींसोबत एकमेकींना टाळ्या देत “आओ मीना सुपर सीना…’ म्हणत खेळ खेळण्याच्या, सागरगोटे खेळत एकमेकींना हरवण्याच्या, जमिनीवर गट आखून उड्या मारत फरशीच्या तुकड्याचे टिक्कस खेळण्याच्या वयात काही मुली आईबापापासून दूरवर कुठे तरी शहराच्या बदनाम गल्लीत कुणा बापापेक्षाही थोराड माणसाच्या शरीराची वासना भागवत आहेत याचा विचार करूनही मनात चर्र होतं, तर त्या कोवळ्या जिवांची काय अवस्था असेल? नीलम, पायल, लक्ष्मी अशी विविध नावं असणाऱ्या या अमोलींची कर्मकहाणी विविध दृक्श्राव्य माध्यमांद्वारे सातत्याने येत राहील तेव्हा या गंभीर समस्येवर कदाचित आपण प्रशासनाला, सुरक्षा यंत्रणांना प्रश्न विचारते होऊ. नाही तर “बेटी बचाव’च्या फ्लेक्समागे अशा “अमूल्य अमोलींची कवडीमोल’ भावात विक्री चालूच राहील.

लेख साभार :  दिव्य मराठी  https://divyamarathi.bhaskar.com/news/maheshkumar-munjale-writes-about-national-award-winning-amoli-movie-1566067240.html?ref=ht&fbclid=IwAR2msoy-ry-jshju250RT4QiCQ7s3oqxNi_PjgFlfVHr2gWklic0AmLOEzA

Comments are closed.