एक प्रामाणिक आवाहन… वाचकांसाठी…

0 1,118

आपल्या समाजात ‘सेक्स’ हा शब्द उच्चारल्यावरच खूप विचित्र नजरेने आपल्याकडे बघतात, जणू काहीतरी वाईट, घाण, अपवित्र  गोष्ट उच्चारली आहे. त्यामुळेच आपल्या समाजात आजही याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. म्हणून आपल्या सर्वासाठी तथापि संस्थेने लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलण्याची आणि त्याबद्ल असलेली शास्त्रीय माहिती जाणून घेण्याची एक सुरक्षित जागा ही वेबसाईटच्या स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. लैंगिकतेबद्दल शास्त्रीय माहिती मिळावी/समजावी, लैंगिकता म्हणजे काय? लैंगिक आरोग्य म्हणजे काय? काय काळजी घ्यावी?, लिंगभावाची व्यवस्था काय आहे? हे समजून घेण्यासाठी तसेच लैंगिकतेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा, स्त्रियांकडे समानतेने, आदराने बघण्याचा दृष्टीकोन तयार व्हावा हा वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच या विषयाबद्दलची बरीचशी माहिती ऑडीओ, व्हिडिओ, लेख, चित्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आज आपल्या या वेबसाईटला 1,387,099 इतके हिट्स आहेत. दोन अडीच वर्षांच्या या कालावधीतइतक्या मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोचून ही वेबसाईट लोकप्रिय झाली आहे.

आपल्या सर्वांच्या मनात लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न असतात ते विचारण्यासाठी वेबसाईट ही एक चांगली जागा आहे. अनेकजण आपल्या मनातील प्रश्न मोकळेपणाने विचारतात आणि आम्हीही त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला खूप उत्सुक असतो. परंतु मागच्या काही महिन्यात आमच्या असे लक्षात आले आहे की काहीजण प्रश्न विचारताना काल्पनिक स्थिती समोर ठेवून किंवा खोट्या कल्पना करून किवा स्वतःच्या निव्वळ लैंगिक मनोरंजनासाठी प्रश्न विचारतात. असे प्रश्न रुचीहीन भाषेत तर असतातच परंतु अनेकदा ते समोरच्याला अस्वस्थ करणारे किंवा कधी कधी अपमानित करणारे वाटतात. अनेकदा लैंगिक अवयवांसाठी शिव्यात वापरले जाणारे शब्द, टर्म्स वापरल्या जाताना दिसतात. त्यापेक्षाही अधिक म्हणजे प्रश्नांचा रोख हा स्त्रिया आणि मुलींच्या लैंगिकतेचा अपमान करणारा किंवा त्यांच्या लैंगिक अधिकारांचं हनन करणारा असतो. जी मूल्य घेऊन ही वेबसाईट चालवली जाते त्या मुल्यांचा उदा. समानता, विविधता, संमती आणि सुरक्षितता, अधिक्षेप करणारे प्रश्न असतात.

आपण स्त्रियांच्या शरीराकडे एक ‘उपभोग वस्तू‘, म्हणून बघतो की त्या ही एक माणूस आहेत या भावनेने आणि आदराने बघतो? तसे वागतो का?  हे आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे. आपण जाणूनबुजून अशा शब्दांचा वापर करतो आहोत का? आपण स्त्रीच्या लैंगिक अवयवांसाठी  शिव्यामधील शब्दांचा वापर टाळून इतर बोली भाषेतील शब्द जसं मायांग, बाळवाट अशा किवा शास्त्रीय शब्द जसं योनी, लिंग यांचा वापर करू शकलो तर उत्तम… आम्ही सर्व आपल्याला आवाहन करत आहोत की, अशा पद्धतीने कृपया प्रश्न विचारू नयेत. आपल्या सर्वांच्या खऱ्या, प्रामाणिक प्रश्नांना आम्ही उत्तर देणारच आहोत, देतंच आहोत.

मुख्यत: या वेबसाईटचा उद्देशच हा आहे की, या वेबसाईटचे जे वाचक आहेत, विशेषतः तरुण मुल-मुली, त्यांच्याशी लैगिकतेसंदर्भात कुल्याही विषयावर अतिशय मोकळेपणाने, वैज्ञानिक पद्धतीने आणि संवेदनशील पद्धतीने लैंगिकतेची जी मूल्य आपण मानतो, त्या मुल्यांचा आधार घेऊन संवाद साधणे. त्यामुळे आपल्या सर्वाना अशी विनंती आहे की, कृपया या वेबसाईटचा उपयोग अशा चुकीच्या कारणांसाठी न करता खरंच आपल्याला काही समस्या असेल किंवा आपल्याला काही शेअर करायचे किंवा मांडायचे असेल तर त्यासाठी करावा.

चित्र साभार – https://www.vectorstock.com/royalty-free-vector/sexuality-in-different-languages-vector-11436538

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.