बलात्कार आणि राजकीय, सामाजिक संदर्भ – प्राजक्ता धुमाळ

0 1,752

बलात्कार हा स्त्रियांवरील केवळ लैंगिक अत्याचार नाही तर त्याचे राजकीय, सामाजिक अर्थही असतात.

वेबसाईटवर मागील महिन्यात देण्यात आलेल्या या विधानावर २१६ व्यक्तींनी आपलं मत नोंदवलं आहे. यापैकी ७६% व्यक्ती या विधानाशी सहमत आहेत. म्हणजे बलात्कार हा स्त्रियांवरील केवळ लैंगिक अत्याचार नाही तर त्याचे राजकीय, सामाजिक अर्थही असतात, असं त्यांचं मत आहे. तर १३ % व्यक्ती या विधानाशी सहमत नाहीत.

वर्षानुवर्षे स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडत आहेत. त्यातही दिवसेंदिवस स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे, हे आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. अलीकडेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात घडलेली घटना सर्वजण जाणून असावेत. दिवसादेखील मुली, स्त्रिया सुरक्षित नाहीत अशी स्थिती समाजात आढळते.

इतर कुठल्याही हिंसाचारापेक्षा लैंगिक हिंसाचाराकडे समाज वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो हे खरं आहे. बलात्काराच्या घटनेवर (काही दिवस तरी) समाजातील विविध स्तरावरून तीव्र पडसाद उमटत असतात. पण हे ही लक्षात ठेवावं लागेल की स्त्री/मुलगी म्हणजे ‘घराची इज्जत’ अशा तथाकथित आणि पुरुषांच्या सोयीच्या संकल्पना समाजात पिढ्यानपिढ्या बिंबवल्या गेल्या आहेत. ऐतिहासिक युद्धं, लढाया आणि जातीय, धार्मिक दंगली यांवर एक दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येऊ शकतं की, अनेकदा शत्रूचा बदला घेण्यासाठी स्त्रियांना पळवून नेणे, बलात्कार करणे असे प्रकार केले जातात. म्हणजे पुरुषांनी स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करणं हे एका समूहाने दुसऱ्या समाजाला नामोहरम करण्याचं शस्त्र समजलं जातं. आजही स्त्रियांवर होणारे बलात्कार हे कधी जातीय-धार्मिक द्वेषातून, कधी ‘स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू’, अशा भोगवादी, तर कधी स्त्री दुय्यम आणि पुरुष वरचढ, मर्द अशा बुरसटलेल्या मानसिकतेतून होत असतात.

बलात्कार हा केवळ लैंगिक अत्याचार न राहता कोणत्या जाती-धर्मातल्या महिलेवर, कोणत्या जाती-धर्माच्या पुरुषाने/पुरुषांनी बलात्कार केला आहे, यानुसारही घटनेचे पडसाद उमटताना दिसतात. अनेक ठिकाणी राजकारण हेही जाती-धर्माचा (गैर) वापर करून केलं जाताना दिसतं. अर्थात बलात्काराच्या घटनेला सामाजिक, राजकीय,जातीय संदर्भही असतात.

पण हे समजून घ्यायला हवं की, जातीने, धर्माने अथवा व्यवसायाने भिन्न असणाऱ्या स्त्रीसाठी बलात्कार किंवा इतर कुठल्याही लैंगिक अत्याचाराचे परिणाम सारखेच असतात. उदा. शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार बहुतेक वेळेस अत्याचार म्हणून गणलेच जात नाहीत. विवाहांतर्गत लैंगिक अत्याचाराला कायदा आणि समाज आजही स्वीकारत नाही.

खरंतर कोणत्याही महिलेवर, मुलीवर झालेला बलात्कार हा अगोदर एक स्त्री प्रश्न आहे. त्यामुळं निव्वळ जाती-धर्माच्या आधारावर बलात्काराच्या कोणत्याही घटनेचं मोजमाप करणं चुकीचं आहे. कुठल्याही महिलेच्या बाबतीत बलात्कारासारख्या अत्याचाराची तीव्रता सारखीच असते. राजकीय, जातीय आणि इतर कोणतेही संदर्भ लावून बलात्काराचा प्रश्न ‘गंभीर’ होऊ नये, तर मुळातच बलात्कार हा स्त्रियांच्या मुलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा, एक ‘माणूस’ म्हणून स्त्रीचा अनादर करणारा या अर्थाने तो एक गंभीर प्रश्न आहेच!

अशा घटनांच्या निषेधार्थ आवाज उठवण्यासाठी एकत्र या… स्त्रिया आणि मुलींसाठी समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही काही कार्यक्रमांची आखणी करत आहोत. या प्रयत्नांत सामील होण्यासाठी युवकांनी ‘तथापि ट्रस्ट’ला जरूर संपर्क करावा…

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.