बलात्कार हा काही गंमतीचा विषय नाही – सोना मोहपात्रा

1,672

(काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका पॉप्युलर आणि श्रीमंत कलाकाराने ‘शुटींगवरून आल्यावर मला बलात्कार झालेल्या बाईसारखं वाटतं’ असं असंवेदनशील आणि सेक्सिस्ट वक्तव्य केलं याविषयी आपण कदाचित प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेलच. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर त्याच्या वडिलांनी माफी मागितली व त्याचा तसा उद्देश नव्हता इत्यादी स्पष्टीकरणं दिली. चित्रपट उद्योगाशी संबंधित एकही व्यक्ती पुढे येऊन या प्रकाराविषयी तोंड उघडायला तयार नसताना सोना मोहपात्रा या एका प्रसिद्ध भारतीय गायिकेने धाडसाने या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. मात्र, या निषेधानंतर तिला या माणसाच्या तथाकथित चाहत्यांकडून फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर अनेक अश्लील कमेंट्स आल्या. शिवाय बलात्काराच्या आणि काम न मिळू देण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या. या सगळ्यावर तिने फेसबुकवर तिची प्रतिक्रिया लिहिली होती ती वाचण्यासारखी आहे. तिच्या या २३ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रतिक्रियेचा स्वैर अनुवाद देत आहोत.)  

बिहारमधील मोतीहारी गावातील २१ वर्षीय युवतीवर अमानुष सामुहिक बलात्कार करून, तिच्या शरीरात  बंदुका आणि काठ्या घुसवण्यासारखे अमानुष अत्याचार करून आरोपी फरार झाले. याच दरम्यान छत्तीसगडमधील अशा पद्धतीने अत्याचार आणि खून झालेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सोनी सोरीने या सामाजिक कार्यकर्तीने ९ दिवस उपोषण केलं. यावर कोणत्याही टीव्हीवर अथवा चैनलवर बातम्या किंवा चर्चा दिसत नाहीत. कदाचित, या मुद्द्यांमध्ये ग्लॅमर कमी असेल नाही का?

एका लोकप्रिय अभिनेत्याने केलेल्या वक्तव्याचा मी जो निषेध केला, त्यावर माध्यमांनी गेल्या काही दिवसांत अनेकदा मला त्यांच्या चर्चांमध्ये मत व्यक्त करण्यासाठी बोलावलं. मी चर्चेसाठी एक महत्वाचा विषय त्यांच्यासमोर आणला असेल कदाचित, पण मी जाणं टाळलं.

मी कोणाच्यातरी वक्तव्याचा निषेध केला म्हणून गेल्या ४८ तासांमध्ये मला हजारो बलात्काराच्या धमक्या, नग्न अश्लील चित्रांचा महापूर, कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या आल्या. हे दुसरं तिसरं काहीही नसून समाजात मोठ्या जोमानं पसरणाऱ्या विषाचा एक संकेतच आहे. जेव्हा अशा नॅशनल आयकॉन समजल्या जाणाऱ्या माणसाला फक्त त्याचे चाहते आणि प्रेक्षकच नाही तर मित्र, मिडिया आणि इतर लोक कसेही वागण्याला, काहीही बरळायला, काहीही करायला प्रोत्साहन देतात तेव्हा अशाच प्रकारचे विष समाजामध्ये पसरणार. अशा आयकॉन्सला त्यांच्या चुकांबद्दल शिक्षा होत नाही किंवा ते आपल्या चुकांमधून काहीही शिकत नाहीत. उलट अशा लोकांना उगाचच उचलून घेतले जाते, त्यांची वाहवा होते, त्यांच्याभोवती चाहत्यांची गर्दी होती, त्यांचे टुकार, तिय्यम दर्जाचे सिनेमे करोडोची कमाई करतात आणि विशेष म्हणजे अशी लोकं चांगल्या चांगल्या गोष्टींचे ब्रँड अम्बॅसीडरही बनतात.

निराशाजनक आहे हे सगळं! पण तरीही मी हार मानणार नाही. आयुष्यात कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी मी स्वतःला तयार ठेवलं आहे. मी उभी राहणारच, अंगावरची धूळ झटकून, माझं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी!

शंभर कोटीहून अधिक लोकसंख्येच्या या देशात अनेक चांगले, सन्मानाला पात्र, कष्टाळू लोक असताना मी मूर्ख, धोकेबाज आणि ओंगळ लोकांना जिंकू देणार नाही. माझ्या सारख्यांना कोण कामावरून काढणार? सलमान खान?? एक ‘प्रतिभावान’ गुन्हेगार???’ मला नाही वाटत, मला काम करण्यापासून कोणी थांबवू शकेल. सन्मानाने रोजीरोटी कमावण्याचे आणि स्वतःचा विकास साधण्याचे शेकडो पर्याय माझ्याकडे आहेत. पण मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गाणं गाणार आहे. तोच काय पण इतर कोणीही ते थांबवू शकत नाही.

२१ वर्षाच्या त्या बलात्कार पीडीत मुलीच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या दुःखाची आणि सोनी सोरीच्या लढ्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण मला माहितेय, मी स्वतःला त्यांच्याशी, या मुद्यांशी जोडून घेऊ शकते, त्यासाठी काहीतरी करू शकते. आमची एकमेकींशी कुठेतरी नाळ जुळलेली आहे. बलात्कार हा काही मजेचा किंवा गंमतीचा विषय नाही.

Courtesy: – सोना मोहपात्राची फेसबुकवरील प्रतिक्रिया.

लिंक: https://www.facebook.com/sonatheartiste/posts/10153446180656486

स्वैर अनुवाद – अच्युत बोरगावकर आणि गौरी सुनंदा.

 

Comments are closed.