शरीर साक्षरता– माझ्या शरीरावर माझा हक्क

1,815

आपल्या शरीराशी मैत्री करणे आणि त्यातून आपल्या शरीराबद्दल साक्षर होणे म्हणजे शरीर साक्षरता. माहिती घेणे, कोशल्यं शिकणे आणि त्या माहिती आणि कौशल्याचा वापर करणे हे साक्षरतेची लक्षणं आहेत. म्हणूनच शरीर साक्षरतेमध्ये माहितीसोबतच शरीराविषयीची, आपल्या आरोग्याविषयीची लक्षणंदेखील समाविष्ट आहेत.

शरीराचं कार्य, शरीरातले विविध अवयव, संस्था आणि त्यांचं कार्य यासोबतच मनाचा आणि शरीराचा सहसंबंधदेखील समजून घ्यायला हवा. मुली आणि स्त्रियांच्या बाबत शरीर साक्षरतेचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे. तो म्हणजे लैंगिकतेबोबत आणि जननक्षमतेबोबत जागरुकता. आपलं पाळी चक्र, त्यातील विविध टप्पे, जननशक्षम काळ, गर्भधारणा किंवा गर्भनिरोधन, अशा सर्व गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आणि त्यातून आपल्या शरीराशी अधिकाधिक मैत्री करू शकतो. अधिक माहितीसाठी – लैंगिकता व जनन जागरुकता (फर्टिलिटी अवेअरनेस)

शरीर आणि मन

मन नक्की कुठे असतं? कुणी म्हणतं हृदयात तर कुणी म्हणतं डोक्यात. मन नक्की असतं काय?

आपले विचार, भावना आणि आपल्या कल्पना या सगळ्यांचं मिळून आपलं मन बनतं. या सगळ्या प्रक्रिया मेंदूत सुरू असतात. पण मन हे काही केवळ मेंदूमध्ये नसतं. जसं बासरीतून सूर निघतात. पण संगीत केवळ बासरीमध्ये नाही, तसंच.

मनाचा, मनातल्या विचारांचा आणि भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तसंच शरीरात घडणाऱ्या गोष्टींचा मनावर परिणाम होत असतो. मन आणि शरीर हे एकमेकांत अगदी घट्ट गुंतले आहेत.

लैंगिक भावना, विचार, कल्पना मनात येतात आणि शरीरामार्फत व्यक्त होतात. तसंच शरीराला झालेले स्पर्श, डोळ्याने पाहिलेली दृश्यं, कानांनी ऐकलेले आवाज या सगळ्यांमुळे मनात लैंगिक सुखाच्या भावना निर्माण होत असतात. लैंगिक आकर्षणामध्ये, लैंगिक संबंधांमध्ये शरीराचा आणि मनाचाही मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. आपल्या शरीराबद्दल आपण जितकं मोकळं होऊ, जितका सकारात्मक विचार करू, तितकं आपल्याला आपली लैंगिकता समजून घ्यायला मदत होईल.

Comments are closed.