शरीर साक्षरता ते लैंगिकता शिक्षण – असाही एक प्रवास

0 1,525

 

आपल्यापैकी अनेकांसाठी ‘शरीर साक्षरता’ हा शब्द, ही संकल्पना नवीन असेल. अनेकदा आपण लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षर असणं असं ऐकलं आहे. संगणक वापरता येणं म्हणजे संगणक साक्षरता हा शब्ददेखील प्रचलित झाला होता. तसंच आपण आपलं शरीर, मन शास्त्रीय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घेऊन त्यांची काळजी घेणं म्हणजेच शरीराबद्दल साक्षर असणं. या विचारांतूनच ‘शरीर साक्षरता’ संकल्पनेचा उदय झाला. अनेकदा लैंगिकता शिक्षण म्हटलं की नकारात्मक सूर ऐकायला येतो. नकोसा, घाण, मोकळेपणाने बोलण्याची गरजच नसलेला हा विषय शिक्षणाचा विषयच कसा होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अशा वेळी शरीर साक्षरता ही लैंगिकता शिक्षणाच्या पलीकडे नेणारी आणि एक मुलभूत संकल्पना ठरते. शरीर आणि मन यांच्यातील सहसंबंध समजून घेणं, आपल्या भावना ओळखून त्या सकारात्मक पध्दतीने हाताळणं, स्वतःला सुरक्षित, निरोगी, आनंदी ठेवायला शिकणं, अशा आणि संबंधित अनेक गोष्टी म्हणजे शरीर साक्षरता! शरीर साक्षरतेकडून लैंगिकता शिक्षणाकडे जाणारा प्रवास सुकर आणि सुखकर होतो. लैंगिकता शिक्षणाविषयीचा नकारात्मक सूर जाऊन हा शिकण्या-शिकवण्याचा विषय कसा हे उमजू लागतं.

सन २०११ मध्ये ‘शरीर साक्षरता : मुलांसाठी’ हा संच सामान्य मुलांसाठी तथापिने प्रकाशित केला. सामान्य मुला-मुलींसोबत सत्रं घेतली जाऊ लागली. किशोरावस्था हा अनेक शारीरिक, मानसिक बदल घडून येण्याचा, मनात अनेक प्रश्न,  नवनव्या भावना निर्माण होण्याचा काळ! हे सारं जसं सामान्य मुलांच्या बाबतीत घडतं, तसं अंध, मतिमंद, मूक-बधिर किंवा कोणत्याही कारणाने अपंग असणाऱ्या मुलां-मुलींच्या बाबतीतही घडत असतं. पण तुलनेने अपंग मुला-मुलींच्या किशोरवयातील बदलांकडे, एकूण लैंगिकतेकडे कुटूंबातून आणि समाजातूनही दुर्लक्ष होताना दिसतं. खरं तर या मुला-मुलींबरोबरही किशोरवयातील शारीरिक, मानसिक बदलांविषयी, लैंगिक भावनांविषयी त्यांना समजेल अशा माध्यमातून सकारात्मक पध्दतीने संवाद साधणं गरजेचं आहे. या विचारांतूनच मागील ४ वर्षांपासून ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता’ हा विषय तथापिने हाती घेतला. सुरूवातीला अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी आणि मागील २ वर्षांपासून मतिमंद मुला-मुलींच्या पालकांसोबत या विषयाला घेऊन काम सुरु आहे.

लहानाचं मोठं होत असताना शरीर विकसित होत असतं, तसं मनसुध्दा विकसित होत असतं. मुला-मुलींना कुणाशी तरी खूप गप्पा माराव्यात असं वाटतं, तर कधी कुणाशीच बोलू नये, अगदी शांत बसावंसं वाटतं. सतत बदलते मूड, कधी राग तर कधी आनंद, कधी कंटाळा तर कधी उत्साह असं चालूच असतं आणि ते साहजिकही आहे. असं या वयाच्या सगळ्यांच्या आणि मतिमंद मुला-मुलींच्या बाबतीतही होतं. हट्टीपणा करणं, कधी चिडचिड तर कधी मारामारी करणं, हळवेपणा वाढीस लागणं, भावना व्यक्त न करता येणं, अंतर्मुख होणं, अधीरपणा, उतावीळपणा असे भावनांचे आविष्कारही मुलांमध्ये वयात येताना ठळकपणे दिसू लागतात. पालक आणि शिक्षकांनी सांगितलेलं न ऐकणं आणि मित्र मंडळींच्या प्रभावाखाली येणं ही तर या वयाची वैशिष्टये आहेतच. कधी-कधी त्यांच्या लैंगिक भावना आक्रमक वर्तनातून व्यक्त होऊ लागतात. वयात येताना शरीरातील संप्रेरकांचा शरीराप्रमाणे मनावरही परिणाम होत असतो. मतिमंद मुलांनाही या वयात कुणीतरी आवडायला लागतं, ते शरीराच्या माध्यमातून तसं व्यक्त होतात किंवा बोलूनही दाखवतात. उदा. कुणाला कुणाचे डोळे, तर कुणाला कुणाचे केस आवडतात. मला तो आवडतो किंवा ती आवडते अशी वाक्यं मतिमंद मुलं-मुली सहजतेने म्हणतात, असं म्हणताना लाजणं ही भावनाही अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत असते. मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल असं भिन्नलिंगी आकर्षण वाटू लागतं. शाळेत ते एकमेकांच्या बाकावर जाऊन बसण्याचा, एकमेकांना काही वस्तू देण्याचा प्रयत्न करतात. तसंच मुली आवडत्या सरांना आणि मुलं आवडत्या बाईंना फूल देण्याचा, त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकदा पालकांना वाटतं, की साधा दातांना ब्रश कसा करायचा, हे पण कळत नाही ह्यांना आणि हे बरं कळतं?पण आपण लक्षात घेऊया, की कुणाबद्दल तरी शारीरिक आकर्षण वाटणं यात बुध्दीच्या समजण्याच्या क्षमतेचा नाही तर शरीरात घडून येणाऱ्या बदलांचा संबंध असतो. किशोरावस्थेत आल्यावर हे सारे बदल होणं, नैसर्गिक आहे. मतिमंद मुलं-मुलीही या बदलांना प्रतिसाद देणार… भावना व्यक्त करणार… हेदेखील अगदी नैसर्गिक, स्वाभाविक आहे. वयात आलेल्या मतिमंद मुला-मुलींच्या बाबतीत तो तिला किंवा ती त्याला आवडणं म्हणजे त्यांना त्या व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण वाटत असतं. याबद्दल चेष्टा-कुचेष्टा किंवा चिडवा-चिडवी न करता पालकांनी, शिक्षकांनी हे मोकळेपणाने स्वीकारणं गरजेचं आहे. कारण ते नैसर्गिकच आहे. अनेकदा पालक-शिक्षकांना याविषयी काळजी वाटते. कारण ते एकमेकांना आवडतात, एकमेकांकडे बघतात, यावरुन पुढे काही घडले तर? असा अर्थ आपल्या बुध्दीनुसार अनेकदा काढलेला असतो, जो त्यांच्या बुध्दीच्या आसपासही नसतो. मतिमंदांच्या लैंगिक अवयवांची वाढ ही सामान्य मुला- मुलींसारखीच असते, पण त्याबद्दलची समज येत नाही. सामान्य मुलं-मुली पुस्तकं वाचतील, सिनेमे पाहतील, मोठया मुला-मुलींशी काहीतरी चर्चा करतील, असे मतिमंद मुला-मुलींच्या बाबतीत होत नाही. त्यांना त्यांच्या भावना नीट (समाजमान्य पद्धतीत) व्यक्त करता येत नाहीत, कृतीतून नीट सांगता येत नाही, त्यामुळे त्यांच्या भावनांचा निचरा होत नाही. यात त्यांची मानसिक घुसमट होते, मनावरचा ताण वाढतो. यातूनच कधी कधी समाजाच्या साचेबध्द अपेक्षांविरूध्द, संकेतांविरुध्द वर्तन घडतं. यात भावनांची दखल घेणं अधिक गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मुळात आपण स्त्री आहोत किंवा पुरुष आहोत म्हणजे काय, यातून येणारी सामाजिक बंधनं कोणती आहेत, ती कशी पाळायची, समाजात वावरताना काय योग्य, काय अयोग्य हे समजणं आणि समजावणं मतिमंद व्यक्तींच्या बाबतीत सोपं नसतं. म्हणूनच मतिमंद मुला-मुलींचं वयात येणं हा पालकांसाठी वेगळा अनुभव असणार आहेच.

‘मतिमंदत्व आणि लैंगिकता’ याविषयीचं काम तथापिनं हाती घेतलं, तेव्हा मतिमंद मुलांच्या अनुषंगाने लिहिलेली अनेक पुस्तकं वाचताना लक्षात आलं, की या मुला-मुलींचं वयात येणं, लैंगिक भावना या विषयांचा अंतर्भाव राहून गेलेला असतो किंवा अनेकदा तो मतिमंदांच्या लैंगिक समस्या या नावाने केलेला असतो. खरं तर समस्या ही वर्षानुवर्षे आपण लैंगिकतेबद्दलचा जो नकारात्मक दृष्टीकोन बाळगत आहोत, त्या दृष्टीकोनात आहे. मतिमंद मुला-मुलींचे जे वर्तन लैंगिक समस्या या नावाने अधोरेखित केलं जातं, ते खरं तर वयात येताना होणाऱ्या नैसर्गिक बदलांना दिलेला प्रतिसाद असतो. अर्थात तो प्रतिसाद समाजमान्य संकेतांच्या चौकटीत बसणारा असेलच असं नाही, म्हणजेच समस्या इथं जाणवू शकते की मुला-मुलींच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतींना पालकांनी कसा प्रतिसाद द्यायचा आहे? त्यासाठी नॉर्मल मुला-मुलींप्रमाणे या मुला-मुलींच्या लैंगिकतेचा सहज सकारात्मक स्वीकार करणं, शास्त्रीय आणि सकारात्मक संवाद होणं.. घडवून आणणं.. गरजेचं तर आहेच पण शक्यही आहे. अगदी सहज नसलं तरी पायरी-पायरीनं पुढं जाता येईलच की!

वयात येताना होणारे बदल तितकेच सहज आणि नैसर्गिक आहेत मतिमंदांसाठीही..

या बदलांनुरूप त्यांचं वागणं-बोलणं म्हणजे लैंगिक समस्या नक्कीच नाही..!

– प्राजक्ता धुमाळ, तथापि ट्रस्ट, पुणे

संदर्भ – वरील लेख तथापि ट्रस्टच्या ‘हितगुज’ (अंक पहिला, जून-जुलै २०१७) या मतिमंद मुला-मुलींच्या पालक-शिक्षकांसाठी प्रकाशित करण्यात येणाऱ्या द्वैमासिकातून संपादित करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.