…तर चांगला माणूस उगवणार कसा?

#BoisLockerRoom

1,841

#BoysLockerRoom नक्की काय प्रकरण आहे? 

काही अल्पवयीन सर्व साधारण 15 ते 19 या वयोगटातले दक्षिण दिल्लीतल्या उच्चवर्गीय कुटुंबांतील व उच्चभ्रू शाळांमध्ये शिकलेल्या मुलांनी त्यांच्याच शाळांमध्ये शिकलेल्या मैत्रिणींबद्दल अश्लील संभाषण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम ग्रुप बनवला. तिथे त्यांच्याबद्दल नको-नको ते बोलले, त्यांचे आक्षेपार्ह फोटो टाकले, काही छेडछाड केलेले सुद्धा, आणि अगदी त्यांच्यावर बलात्कार करायची अनेकांनी इच्छाही व्यक्त केली.

फक्त मुला-मुलांच्या या ग्रुपमध्ये काही जणांनी हॅकिंगद्वारे प्रवेश मिळवला आणि या ग्रुपचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला.  इन्स्टाग्रामच नव्हे तर आता ट्विटर, फेसबुकवरही प्रतिक्रियांचा पूर आला आणि ट्रेड झालं #BoysLockerRoom , #BoisLockerRoom . जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर सुरू असलेला हा ट्रेंड तुम्ही पाहिलाच असेल. मूळ लेखाची लिंक 

मुलं असं कशामुळे वागली असतील?

आपल्याच वर्गातल्या एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्कार करूयात, असं या मुलांना वाटूच कसं शकतं?.. त्यामुळेच समाजमाध्यमांवर भर(व)लेल्या न्यायालयांमध्ये या मुलांना दोषी ठरवून, लगेच शिक्षाही सुनावण्यात आली. पण या प्रकरणातल्या मुलांना दोषी ठरवताना ती असं कशामुळे वागली, त्यांना हा विचार सुचला कुठून, हे न शोधता जर फक्त त्या मुलांना शिक्षा दिली किंवा झाली तर त्यानं कदाचित चुकीच्या वागण्याला शिक्षा केल्याचं समाधान मिळेल, पण अशा वर्तनाला, विचारांना पायबंद बसेल का?

मुलांचं वर्तन हे सुरुवातीला अनुकरण असतं. त्यांचे पालक, आजूबाजूचे लोक कसे वागतात, काय बोलतात, यावरून त्यांच्या वागण्याची शैली ठरत असते. त्यात आता भर पडली आहे ती ‘डिजिटल’ माध्यमांची, या माध्यमांवरील बातम्या, करमणूक, माहिती हे सगळं मुलांची मनं स्पंजप्रमाणे शोषून घेत असतात. साहजिकच स्त्रियांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन, स्त्रीदेहाबद्दलचे विचार, ‘सेक्स’बाबतच्या त्यांच्या कल्पना घडवण्यात, त्याला आकार देण्यात हे सगळे घटक जबाबदार असतात. मोबाइलच्या माध्यमातून जग जवळ आलंय आणि माहितीचा महास्रोत एका क्लिकवर आलाय, हे म्हणताना, या माहितीच्या धबधब्याला गाळणी लावणं जरुरीचं असतं, हे मात्र विसरलं जातं. पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मनात स्त्रीदेहाविषयी, कामक्रीडेविषयी जे कुतूहल असतं ते नैसर्गिकच आहे, पण त्याला योग्य वळण मिळालं नाही तर मात्र ‘लॉकर रूम’सारख्या विकृती निर्माण होऊ शकतात. मूळ लेखाची लिंक 

मुलीच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाचा विचार करावाच लागेल :

जागतिक पातळीवर मानवी शारीरिक बदलांकडे पाहिले, तर पौगंडावस्थेत येण्याचे वय गेल्या काही दशकांत खूप कमी झाले आहे. अगदी १३ व्या-१४ व्या वर्षांत मुलींमध्ये हे बदल घडून येताना दिसतात. मुलांमध्येही असेच दिसते. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणण्याचा काळ कधीच मागे पडला. शालेय जीवनापासूनच मुला-मुलींमध्ये होणारे अनेक प्रकारचे शारीरिक-मानसिक बदल त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीत खूप फरक करणारे असतात. पण हे लक्षात येण्याएवढी सवड ना पालकांना असते, ना शिक्षकांना. ‘लैंगिकता’ या शब्दाभोवती भारतीय समाजात जे विकृत वलय निर्माण झाले आहे, त्याबद्दल स्पष्टपणे बोलण्याची ‘हिंमत’च कोणी करत नाही. कशात लक्ष लागत नाही, काहीतरी वेगळेच करावेसे वाटते, आजूबाजूचे सगळेच आपल्याकडे संशयाने पाहताहेत अशी भावना निर्माण होते, आपल्याप्रमाणेच आपल्याबरोबरच्या मित्रांना/ मैत्रिणींनाही वाटत असेल का याबद्दल कमालीचे कुतूहल तयार होते.. हे सारे आजवरच्या शेकडो पिढय़ांनी अनुभवले आहे. भारतीयांच्या ‘दमन’- म्हणजे भावना दाबून टाकण्याच्या प्रवृत्तीने या कशाहीबद्दल जाहीर वाच्यता करण्यास प्रतिबंध होता, तो समाजमाध्यमांतील मुक्ततेमुळे गळून पडला.

दिल्लीतल्या ज्या मुलांच्या मनात असे काही आले, ते कायद्याच्या चौकटीत सज्ञान नाहीत. ज्या मुलींबद्दल ते अश्लाघ्यपणे बोलत होते, त्याही कायद्याने वयात आलेल्या नाहीत. अशांना पोलीस कोठडीत नेऊन, नंतर त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा देणे ही व्यवस्था अशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपयोगी ठरेल की नाही, हा खरा प्रश्न आहे. मुलांना एखाद्या मुलीबद्दल काही बोलायचेच असेल, तर त्या मुलीच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाचा विचार करावाच लागेल, ही भावना रुजवणे हे समाजविकासासाठी फारच मूलभूत आणि महत्त्वाचे. मूळ लेखाची लिंक 

लैंगिकता म्हणजे केवळ पुनरुत्पादन नाही, तर स्वत:च्या आणि इतरांच्या शरीराबद्दलची उत्सुकता, स्वप्रतिमा, इतर व्यक्तींबद्दल वाटणारे आकर्षण. हे लैंगिकतेचे इतर पैलू आहेत; पण मानवी लैंगिकता एवढ्यावर थांबत नाही, कारण त्यामध्ये नैतिकता व सामाजिक मूल्येही असतात. बरेचदा सामाजिक नियम व्यक्तीच्या लैंगिकतेला वळण देण्याचे काम करत असतात. मानवी लैंगिकतेला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि राजकीय पैलू आहेत, हे समजून घ्यायला हवेत आणि मुलांपर्यंत पोहोचवायला हवेत.

मुलांशी संवाद साधताना…

या वयात मुलांवर जास्त बंधनेही लादता कामा नयेत आणि मित्रत्त्वाच्या नात्याने अति सैल सोडूनही चालत नाही. दोन्हीमध्ये समतोल असावा, तरच मुले जाणीवपूर्वक निर्णय घेतील. मुलांकडे लक्ष देताना पालक आपल्यावर ‘वॉच’ ठेवत आहे आणि संशयाने पाहत आहेत असेही त्यांना वाटता कामा नये. असे पालकत्त्व ही आजच्या काळाची गरज आहे.

भावना आणि कृती यामध्ये फरक आहे. पालकांना मुलांची भावना स्वीकारायची आहे. शालेय वयात उत्सुकता, आकर्षण वाटू शकते, ते नाकारण्यात अर्थ नाही; पण त्यावर आधारित कृतीची मोठी किंमत चुकवावी लागते. किंमत ही शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि राजकीय असते. सहभागी व्यक्तींची संमती हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कायद्याने ठरवलेले वय नसेल, तर अशी संमती ग्राह्य धरली जात नाही. मोबाइल देणे नाकारणे हा एकमेव मार्ग नाही. मुले यासाठी वेगळे मार्ग शोधतील. मुळातच शालेय वयात मोबाइलची खरेच गरज आहे का? असल्यास त्यामध्ये इंटरनेट गरजेचे आहे का? इंटरनेट गरजेचे असले, तरी त्याची जबाबदारी मुलांना समजली आहे ना? याची खात्री आवश्यक आहे. ही खात्री पालकांनी करून घेणे आवश्यक आहे.

ही गरज प्रत्येक मुलानुसार वेगळी असू शकते; परंतु व्यक्तीचा निरोगी भावनिक विकास झाला नसेल, तर केवळ निर्बंध लादून फार उपयोग होत नाही. मुलांशी होणारा संवाद ही एक वेळेची कृती नसून, प्रत्येक वयाच्या टप्प्यावर संवाद घडणे आवश्यक आहे. काही वेळा पालकांना संवाद साधताना संकोच वाटतो, अशा वेळी काही तज्ज्ञांची मदत घेता येऊ शकते. संवादाने प्रश्न कमी होतात, तर दुर्लक्ष केल्याने ते वाढतात. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मन:स्वास्थ्यासाठी तसेच समाजस्वास्थ्यासाठी संवादाला पर्याय नाही. मूळ लेखाची लिंक 

सामाजिककरणाची ही कडू फळं :

मुद्दा फक्त त्या ग्रुपमधील अल्पवयीन मुलांचा किंवा इतर पुरुषांच्या अशा ग्रुप्समध्ये असण्याचा किंवा नसण्याचा नाही तर यानिमित्ताने पुरुषत्व, लैंगिक अत्याचाराच्या संकल्पना, संमती, पितृसत्तेत पुरुषांकडे येणारी सत्ता आणि ती सत्ता प्रस्थापित करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली धडपड, यातूनच जन्माला येणारी बाईच्या शरीरावरची मालकी आणि या मालकीतूनच केलं जाणारं तिचं वस्तूकरण असे अनेक मुद्दे येतात.

सीमोन दी बोव्हुवार म्हणतात की, ‘स्त्री जन्माला येत नाही तर ती घडवली जाते.’ तसाच पुरुषही जन्मत नाही तर तो घडवला जातो.’ तो घडवला जातो तो आपल्या सामाजिककरणातून.

बॉइज लॉकर रूममधल्या मुलांनी आपल्याला आरसा दाखवलाय. आपण सगळे करत असलेल्या सामाजिककरणाची ही कडू फळं आहेत. त्यांची बीजं वेळीच तपासून चांगली जोपासना करण्याची जबाबदारी समाज म्हणून आपण घेत नसू तर पुढचा काळ भयंकर आहे. आपल्यालाच आपला प्रत्येक विचार, प्रत्येक कृती आणि प्रत्येक शब्द विवेकाच्या फुटपट्टीवर तपासून घ्यावा लागेल. पितृसत्तेचा आणि मर्दानगीचा विखारी विचार पेरणं थांबवलं नाही, तर चांगला माणूस उगवणार कसा? कबीर म्हणतो तसं, “बोये पेड बबूल का, आम कहाँ से पाये?” मूळ लेखाची लिंक

निरनिराळ्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या माहितीच्या आधारे वरील लेख संपादित केलेला आहे. मूळ लेखाच्या लिंक दिलेल्या आहेतच. जिज्ञासूंनी त्या जरुर वाचाव्यात
1 Comment
  1. Sanjay says

    आपल्या देशातील महिला/मुली सुरक्षित नाहीत असं म्हटलं जातं. ते खरंच आहे. पण मुलांना इंटरनेटच्या व समाजमाध्यमांच्या माध्यमातून चुकीची माहिती अगदी सहजपणे आणि खूप मोठ्या प्रमाणावर मिळते . योग्य माहितीचे स्रोत खूप कमी आणि असलेच तरी ते सहजी भेटत नाहीत. मुलांना घरच्यांशी याविषयी स्पष्टपणे बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची वैचारिक जडण घडण चुकीच्या पद्धतीने होते. जे इंटवरनेटवर आपण पाहतो तेच आणि तसंच खऱ्या जगातही असतं, असाच त्यांचा समज होतो. मग आपण जे करत आहोत ते योग्यच आहे असाच त्यांना विश्वास असतो. त्यांच्या एका चुकीच्या कृतीने एका मुलीचं आयुष्य उध्वस्त होतं पण त्यांचं स्वतःचं आयुष्य देखील उध्वस्त होतं. मग अश्या वेळी आपण असं म्हणू शकतो का की – “या देशातील मुलंसुद्धा सुरक्षित नाहीत!” ? त्यांच्या हातून काही चुकीचं कृत्य घडण्याआधीच त्यांना योग्य ती मदत मिळायला हवी.

    मला वाटतं की मुलंसुद्धा खूप असुरक्षित आहेत. त्यांना योग्य मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. योग्य आणि मुक्त सुसंवाद खूप गरजेचा आहे. लहान वयात चुकीची माहिती डोक्यात घेऊन मोठेपणी विकृत पुरुष बनण्याआधी त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे. जर या देशाची भावी पिढी चुकीच्या मार्गाने जात असेल तर देशसुद्धा असुरक्षित आहे.
    धन्यवाद!

Comments are closed.