स्तनांना इस्त्री करणे – वाचून आश्चर्य वाटेल. मात्र एकविसाव्या शतकातलं हेही एक वास्तव आहे. या प्रथेत वयात येणाऱ्या मुलींच्या स्तनांना गरम वस्तूने, सहसा दगड किंवा लाकडी काठीने, दाबतात. यामुळे मुलींच्या स्तनांची वाढ थांबते आणि छाती सपाट राहाते. मुलीचं शरीर भरलं नाही तर तिच्याकडे पुरुष आकर्षित होणार नाहीत आणि ती पुरुषी नजरांपासून लपून राहील, या धारणेतून असं केलं जातं.
या अनिष्ट प्रथेचं मूळ पश्चिम आफ्रिकेत आहे. मात्र युरोपातल्या काही देशातही ही प्रथा पोचली आहे, अगदी ब्रिटनमध्येसुद्धा. त्यामुळे वयात येऊ घातलेल्या मुली या अनिष्ट प्रथेला बळी पडू नये, यासाठी शालेय अभ्यासक्रमात याविषयाची माहिती देणं अनिवार्य करण्याचा निर्णय ब्रिटनच्या नॅशनल एज्युकेशन युनियनने घेतला आहे.
‘रडायचीही परवानगी नाही’
‘किनाया’ (नाव बदललं आहे) ब्रिटनमध्ये राहते. तिचे वाडवडील पश्चिम आफ्रिकेत राहात होते. सध्या ती ब्रिटनमध्ये राहात असली तरी तिलाही या प्रकाराचा सामना करावा लागला, तोही वयाच्या दहाव्या वर्षी! ती सांगते, तिच्या आईने तिला सांगितलं, “तू तुझ्या स्तनांना इस्त्री करून छाती सपाट केली नाहीस तर पुरुष तुझ्याकडे सेक्स करण्यासाठी येतील.”
“कितीही काळ लोटला, तरी लहानपणी भोगलेल्या त्या वेदना विसरता येत नाहीत, तुम्हाला रडताही येत नाही. कारण तुम्ही रडलात तर तो तुमच्या कुटुंबाचा अपमान समजला जातो. तुम्ही रडताय म्हणजे तुम्ही कमजोर आहात,” किनाया सांगते.
ती आता मोठी झाली आहे आणि तिलाही मुली आहेत. तिची मोठी मुलगी जेव्हा दहा वर्षांची झाली तेव्हा तिचेही स्तन सपाट करण्याचा सल्ला किनायाच्या आईने दिला होता. “मी सरळ सांगितलं, अजिबात नाही. मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाही. मी जे सहन केलं ते माझ्या मुलींना सहन नाही करू देणार.” किनाया आता आपल्या घरच्यांबरोबर राहात नाही. पण तिला भीती आहे की तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या घरचे तिच्या मुलींवर जबरदस्ती करून हे अघोरी कृत्य करू शकतात.
एकट्या ब्रिटनमध्ये जवळपास एक हजार मुली या अनिष्ट प्रथेला बळी पडल्या असाव्यात, असा अंदाज आहे.
शाळेत असताना आपले स्तन, आपलं शरीर आपल्या वर्गमैत्रिणींपेक्षा वेगळं दिसतं असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा स्तन सपाट करणं सामान्य गोष्ट नाही, हे लक्षात आल्याचं ब्रिटनमधल्या एका महिलेने बीबीसीच्या व्हिक्टोरिया डर्बशायर या कार्यक्रमात सांगितलं. याचा तिला खूप त्रास झाल्याचंही तिने सांगितलं.
सिमॉन नावाच्या एका महिलेने व्हिक्टोरिया डेबशायर कार्यक्रमात सांगितलं की ती 13 वर्षांची असताना तिच्या आईला ती समलिंगी असल्याचं कळलं आणि तिने आपल्या मुलीच्या स्तनांना सपाट करायला सुरुवात केली.
इतर अनेक मुलींप्रमाणेच तिलाही तिची आई छातीवर अतिशय घट्ट पट्टा बांधायला लावायची. जेणेकरून तिचे स्तन अधिकाधिक दाबले जातील. पण यामुळे बरेचदा तिला श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा.
काही वर्षांनंतर बळजबरीनं तिचं लग्न लावण्यात आलं. तिला बाळही झाले. मात्र त्यानंतर या अनिष्ट प्रथेमुळे जे कायमस्वरूपी नुकसान झाले, त्याची खरी झळ पोहचायला सुरुवात झाली.
ती सांगते, “जेव्हा बाळाला दूध पाजण्याची वेळ आली तेव्हा मला खूप त्रास सहन करावा लागला आतमध्ये गाठ असल्यासारखं वाटायचं. वाटायचं, जणू आतल्या काही नसा तुटल्या आहेत.”
स्तन सपाटीकरणाला शिक्षा करणारं विशेष, असं सेक्शन किंवा कलम नाही. पण हा बालशोषणाचाच प्रकार आहे, असं ब्रिटनचं गृहखातं म्हणतं. मारहाण किंवा शारीरिक छळ याविरोधात जे कलम आहे, त्या अंतर्गतच याप्रकरणी खटला चालवला जावा असं गृहखात्याचं म्हणणं आहे.
अँजी मॅरियट या माजी स्त्रीरोगविषयक नर्स आहेत. त्या सध्या ब्रिटिश चेशायर पोलिसांसाठी सेफगार्डिंग लेक्चरर म्हणून काम करतात. त्या म्हणतात ब्रेस्ट आयनिंगसारखे प्रकार नोंदवलेच जात नाहीत, त्यामुळे ब्रिटनमध्ये या गुन्ह्याची नेमकी व्याप्ती किती, याचा अंदाज बांधता येत नाही. त्या याला ‘संवेदनशील गुप्त गुन्हा’ म्हणतात. असा गुन्हा ज्याबदद्ल ‘समाजात आपण एकटे पाडले जाऊ’ या भीतीमुळे स्त्रिया बोलायला कचरतात. त्या म्हणतात, “असे प्रकार घडतात, हे मला आता कळालं. कारण त्याविषयी आता लोकं माझ्याकडे बोलत आहेत. आपल्याबरोबर जे घडलं, त्याविषयी आपण पहिल्यांदाच मोकळेपणाने बोललो आणि याची आपल्याला लाज वाटत असल्याचं अनेकींनी सांगितलं.”
सिमॉनच्या शरीरावर त्या अत्याचाराच्या खुणा आजही आहेत आणि या गुन्ह्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अशी तिची इच्छा आहे. ती म्हणते, “गैरवर्तन हा या गुन्ह्यासाठी फारच सौम्य शब्द आहे. यात खूप वेदना होतात. तुमचं माणूस असणच हिरावून घेतलं जातं.”
पूर्ण लेख वाचण्यासाठी लेखाचा दुवा साभार : BBC Marathi https://www.bbc.com/marathi/international-47726079
Comments are closed.