‘लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ

1,002

तथापिची नवीन निर्मिती: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या ‘महिलांच्या लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ

लैंगिक छळाची कोणतीही घटना जगण्याचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा किंवा कोणताही व्यवसाय करण्याच्या हक्कांचं उल्लंघन करते. प्रत्येकासाठी कामाचं ठिकाण सुरक्षित आणि निकोप असणं, त्याठिकाणी एकमेकांचा आदर, प्रतिष्ठा राखणं आवश्यक आहे. आज अनेक स्त्रिया संघर्ष करुन शिक्षण, नोकरी आणि करीअर असा प्रवास करत आहेत. लैंगिक छळाची वाच्यता केल्यास नोकरी सोडावी लागेल, टीकेला तोंड द्यावं लागेल किंवा बदनामी होईल इत्यादी कारणांमुळे अशा अत्याचारांबाबत गुप्तता पाळली जाते. नोकरी पासून वंचित रहावं लागेल याची भीती किंवा ताण असल्यामुळे स्त्रिया तक्रार करताना दिसत नाहीत.

१९९९ साली ‘विशाखा गाईडलाईन’ देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक खाजगी किंवा सरकारी कार्यालयात ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ची स्थापना अनिवार्य करण्यात आली. तब्बल १४ वर्षे उलटूनही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आल्या नाहीत. दरम्यानच्या काळात अनेक लैंगिक छळाच्या केसेस समोर येतच होत्या. “कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध प्रतिबंध, संरक्षण आणि तक्रार निवारण कायदा, २०१३” अस्तित्वात आला.

या कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरुद्ध समिती स्थापन करणं अनिवार्य करण्यात आलं. तरीही आजवर अनेक ठिकाणी अशा समित्या झालेल्या दिसत नाही. काही तुरळक ठिकाणी ‘अंतर्गत तक्रार निवारण समित्या’ स्थापन करण्यात आल्या, मात्र कायद्यातील नियमानुसार अशा समित्यांमध्ये अनेक त्रुटी दिसून येतात. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होताना दिसतं तरीही त्याकडे एक समस्या म्हणून पाहिले जात नाही. त्याचं उच्चाटन करण्याकडे मालकांचा/आस्थापनांचा कल दिसत नाही. कर्मचारी, मित्रमंडळी, सहकारी, प्रशासक, आस्थापक आणि सरकार या सर्वांनीच कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे.

पुस्तिका आणि व्हिडीओमध्ये समितीची स्थापना, तिचे कामकाज या महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. सर्व प्रकारच्या आस्थापना, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, मॉल, व्यायामशाळा, पोहण्य़ाचे तलाव, मनोरंजनाची ठिकाणं म्हणजेच अशी ठिकाणं जिथे १० पेक्षा जास्त स्त्री किंवा पुरुष काम करतात यांना अंतर्गत तक्रार निवारण समितीची(कॅश: कमिटी अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट) स्थापना करण्यासाठी ही पुस्तिका आणि व्हिडीओमध्ये उपयोग होऊ शकतो. अंतर्गत तक्रार निवारण समितीमध्ये कार्यरत असणारे कार्यकर्ते आणि संस्थांनाही याचा उपयोग होऊ शकेल. महिलांना कामाच्या ठिकाणी भितीमुक्त वातावरण मिळावं तसंच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला बळी न पडता सुरक्षित आणि निकोप वातावरणात तिनं काम करावं यासाठी हा सारा खटाटोप.

देणगी मूल्य:- रुपये १००/- (पुस्तिका आणि व्हिडीओ CD)

तथापि ट्रस्टच्या कार्यालयात पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुस्तक वाचून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

अधिक माहितीसाठी : तथापि ट्रस्ट, तिसरा मजला, रेणूप्रकाश अपार्टमेंट, ८१७, सदाशिव पेठ, पुणे-३० संपर्क क्रमांक: ०२०-२४४३११०६/२४४३००५७ ईमेल: tathapi@gmail.com

वेबसाईट: www.tathapi.org

Comments are closed.