I Soch
सध्या कॉलेजमध्ये आणि बाहेरही घडत असणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी हिंसक व शोषण करणाऱ्या नातेसंबंधात अडकत आहेत तसंच मुली, छेडछाड वं लैंगिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे तातडीने या वयोगटातील मुला-मुलींशी संवाद वाढवण्याची गरज आहे. त्यांच्या स्वतःच्या व इतरांविषयी असणाऱ्या लैंगिकतेविषयी समजुती व दृष्टीकोण समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे व कोणावरती दोषारोप नं करता लैंगिकतेबद्दल सकारात्मक आणि निकोप संदेश पसरवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून, पुणे आणि परिसरातील ३० महाविद्यालयांमधून १६ ते २४ वयोगटातील मुला-मुलींबरोबर “आय सोच” हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाला National Foundation for India या संस्थेचे अर्थसहाय्य लाभले आहे. “आय सोच” प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे तरुण, कॉलेज वयीन मुलामुलींशी लैंगिकता या विषयासंबंधात एकत्र येऊन चर्चा करणे, त्यांचा दृष्टीकोण समजून घेणे, त्यांच्या शंका-कुशंकांना वाट मोकळी करून देणे व लैंगिकतेविषयी सकारात्मक संदेश पसरवून एक निकोप समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे. हे सर्व करताना एक मुख्य गोष्ट ध्यानात घेतली गेली आहे आणि ती म्हणजे लैंगिकते संबंधात चर्चेत येणारे सर्व मुद्दे जरी गंभीर असले तरी ते मूळ मुद्द्यापासून दूर नं जाता रंजक व गमतीशीर पद्धतीने मांडले जातात. मोबाईल व इंटरनेट या माध्यमांचा वापर करणे हा या प्रकल्पाचा एक मुख्य भाग आहे. प्रत्येक महाविद्यालयात तयार केलेल्या ४-५ मुला-मुलींच्या मुख्य गटांमार्फत मोबाईल व इंटरनेट च्या माध्यमातून सतत लैंगिकतेसंबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाते उदाहरणार्थ लिंगभाव, सकारात्मक लैंगिक दृष्टीकोण, निकोप परस्पर संबंध, हिंसा इत्यादी. मुला-मुलींसोबत केल्या जाणाऱ्या चर्चांसोबत, लैंगिकतेविशयी सकारात्मक संदेश पोचवण्याकरीता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध ध्वनीचित्र फितींची निर्मिती करणे हा देखील या प्रकल्पाचा मुख्य भाग आहे.