बाल लैंगिकता- संजीवनी कुलकर्णी

1,794

मूल वाढताना स्वत:च्या शरीरासोबतच आसपासचं जगही समजून घेतं. आपलं स्वत:चं असणं बालकाला जसं जाणवतं, तसंच आपलं मुलगापण किंवा मुलगीपणही कळतं. हीच लैंगिकतेच्या आकलनाची सुरवात. या आकलनाची अनेक वलयं आहेत, आणि ती हळूहळू उकलतात. आपल्या  काय जाणवतं, त्याचा समाज कल्पनेत अर्थ काय, आपल्या मनाची अपेक्षा काय ही लैंगिकतेची जाणीव वयासोबतीनं वाढत जाते आणि आसपासच्या परिस्थितीच्या बर्‍या-वाईट सांस्कृतिक रचनांवर पोसली जाते. काही मुलं प्रश्न विचारत नाहीत, याचा अर्थ ती अलैंगिक असतात, असं नसतं. सांगायचं कारण, अचानक एखाद्या घटनेत मुला-मुलींचं लैंगिक भान समोर येतं आणि पालक दचकतात.

मनाची आणि शरीराची जाणीव हा वाढीचा साहजिक टप्पाच आहे. त्यामध्ये प्रथम कुतुहल असतं, नंतर सुखसंवेदना असते, त्याची ओढही असते. अनावर असुरक्षिततेशी लढण्याची एक युक्ती बालकांना स्व-इंद्रियांशी खेळण्यात गवसते. मात्र लैंगिक म्हणावं अश्या आकर्षणाचा भाग सुरवातीच्या टप्प्यात अजिबात नसतो. डॉक्टर-डॉक्टर, घर-घर या खेळांमध्ये बालकांच्या कुतुहल कल्पना स्वत:च्या पलीकडे अभिव्यक्त होतात. सात-आठ वर्षांच्या मुलांना लैंगिकतेशी जोडलेल्या सामाजिक संकल्पनाही काहीशा समजू लागतात. आजच्या काळात तर इंटरनेटवर काय वाट्टेल त्या म्हणजे लहान मुलांनीच नाही तर कुणीही पाहू नये अशा फिल्मांचा सुकाळ माजलेला आहे. ते तंत्रज्ञान अति बालवयांपासून हाताशी असलं तर बाल मनोव्यापारांवर त्याचा परिणाम होणारच.

आठ वर्षांच्या मुलानं माझा आणि मैत्रिणीचा ब्रेक-अप झालाय म्हणून मी डीप्रेशनमध्ये आहे असं सांगितल्यानं कुणी पालक थक्क झाले असतील. आठ वर्षांच्या मुलांचा ‘प्रेमभंग’ वगैरे कधीच होत नाही. हुशार आणि चुणचुणीत पणानं मोठ्यांना आश्चर्याच्या गर्तेत फेकणं, काही वेळा मुद्दाम अडचणीत टाकणारे प्रश्न आणि उत्तरं देणं हे लक्ष वेधून घेण्याच्या आवडीतून आलेलं वयसुलभ वर्तन आहे.

अकरा-बाराव्या वर्षांशी अस्वस्थ ताणलेल्या शरीरपणाची, मोकळ सैलावण्याची आणि चित्र-विचित्र आकर्षणांची मना शरीरात पहाट होऊ लागते. त्याचा अर्थ कळायला, बरं-वाईट उमजायला आणि निर्णय क्षमता पूर्ण रुपानं उमलायला पुढे बराच काळ लागतो.

 

Comments are closed.