जोडीदाराची निवड आणि अपेक्षा

8,095

आपला जोडीदार कसा असावा, दिसायला आणि वागायला कसा असावा यासंबंधी आपल्या काही कल्पना असतात. काही वेळा कल्पना स्पष्ट असतात तर काही वेळा जराशा धूसर. आपल्या मनात असणारा किंवा असणारी व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून मिळेल असंच नाही.

अनेक वेळा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. अनेक समाजांमध्ये आजही पालकच आपल्या मुला-मुलींसाठी जोडीदार निवडतात. यामध्ये अनेकदा त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पसंतीचा विचार केला जात नाही. मात्र सुखी सहजीवनासाठी आपण आपल्या जोडीदाराबाबत जागरुक असणं आणि आपली पसंती नेमकी कशासाठी आणि कुणाला हेही ठामपणे मांडलं पाहिजे. पाहून होणाऱ्या लग्नांमध्ये अनेकदा लग्नाआधी मुलाचा स्वभाव कसा आहे, त्याची मतं कशी आहेत हे ओळखण्यासाठी पुरेसा वेळ नसतो तरीही ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.

जोडीदार निवडताना आपल्या पुढील आयुष्याकडून काय अपेक्षा आहेत ते स्पष्ट असले पाहिजे. तसेच लग्न ठरविताना पैशांप्रमाणेच इतर काही गोष्टीही महत्वाच्या असतात. स्वतःचा स्वभाव कसा आहे? कोणत्या परिस्थितीत आपण वाढलो आहोत, मुलाचा स्वभाव कसा आहे, त्याचे जोडीदाराबद्दल काय विचार आहेत, ह्या सारख्या अनेक गोष्टींचा लग्न करताना विचार करायला हवा. एखादीला नोकरी करण्याची इच्छा आहे. तिला जोडीदार शोधताना ह्या गोष्टीवर ठाम राहावे लागेल. आणि तिची ही अपेक्षा पूर्ण होईल अश्या मुलाशीच लग्न करावं लागेल. मग इथे मुलगा गरीब आहे का श्रीमंत हा मुद्दा कमी महत्वाचा आहे.

त्याचप्रमाणे आपले विचार जुळतात का तेही तपासून बघणे गरजेचे आहे. जसे की लग्नानंतर त्याच्या पत्नी कडून काय अपेक्षा आहेत आणि आपण त्या पूर्ण करू शकतो का तसेच आपल्या पतीकडून काय अपेक्षा आहेत आणि हा मुलगा त्या पूर्ण करू शकतो का? आपल्या मतांचा आदर करणे व एक व्यक्ती म्हणून आपलेही काही अधिकार आहेत ह्याची जाणीव असणे, अश्या विचारांच्या मुलाबरोबर तुम्ही जास्त आनंदी राहू शकता.

जोडीदाराविषयी जास्त समजून घेण्यासाठी विविध परिस्थितीत त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या प्रतिक्रिया आहेत हे जाणून घ्या. उदा. हॉटेलमध्ये, दुकानात, प्रवासामध्ये हा व्यक्ती कसा वागतो, तो इतर कर्मचाऱ्यांना आदराने वागवतो का, काही समस्या आली तर तो ती शांतपणे हाताळतो का, त्याचं त्याच्या इतर नातेवाइकांशी वागणं कसं आहे हे सगळं पाहून आपल्याला त्याच्याबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल काही अंदाज बांधता येतील.

मात्र जोडीदार निवडताना या अपेक्षांसोबतच तो खरंच आपल्याला आवडला आहे आणि आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे हे तर पहायलाच हवं.

जोडीदार निवडण्याचा हक्क आपला मानवी हक्क आहे. त्याचं रक्षण करणं जबाबदारीचं लक्षण आहे.

 

इभ्रतीच्या नावाखाली होणारे गुन्हे (ऑनर क्राइम्स)

भारताच्या अनेक भागांमध्ये वेगळ्या जातीच्या किंवा धर्माच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न किंवा प्रेम केलं म्हणून किंवा स्वतःच्या गोत्रात लग्न केलं म्हणून मुला-मुलींचे खून करण्यात आले आहेत. दहशतीचा वापर करून अनेकांना असे प्रेमसंबंध तोडायला लावल्याची उदाहरणं तर अनेक आहेत. त्यातूनही जे पळून जाऊन किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे लग्न करतात अशांना लग्नानंतरही ठार मारल्याची उदाहरणं देशाच्या विविध भागात घडली आहेत. या सर्व गुन्ह्यांना ऑनर क्राइम्स किंवा घराण्याच्या इभ्रतीपायी केलेले गुन्हे असं म्हटलं जातं. हरयाणाच्या खाप पंचायती, महाराष्ट्रातील अनेक जातींच्या जात पंचायतींनी अशा प्रकारच्या लग्नांना तीव्र विरोध करून जातीचे असे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करण्याचं फर्मान काढल्याच्या त्यासाठी पालकांवर दबाव टाकल्याची उदाहरणं आहेत. लैंगिकतेवरील नियंत्रण हा जात-गोत्र-धर्म रक्षणाचा मुख्य आधार आहे हेच या फतव्यांनी आणि त्यानंतर झालेल्या खुनांमधून सिद्ध झालं आहे.

(इज्जत नगरी की असभ्य बेटीयां – नकुल सानी)

2 Comments
  1. I सोच says

    हस्तमैथुन किती वेळा करावं याचा कोणताही नियम नाही. ज्यावेळी तुम्हाला लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमैथुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.
    https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

  2. varsha gurav says

    आपल्या जोडीदारा विषयी आयुष्यभर एकनिष्ठ राहण्याची किंवा एकमेकांना समजुन घेऊन शेवटपर्यंत नातं निभावून नेण्याची वृत्ती फार कमी आहे.

Comments are closed.