‘कॉलेज कट्टा, कट्यावरच्या गप्पा’- गौरी सुनंदा

1,552

कॉलेज कट्टा. शबनम, डॉली आणि राहुल रोजच भेटतात या कट्ट्यावर. कधी कॉलेज संपल्यावर तर कधी लेक्चर बंक करून. हा कट्टा म्हणजे सेकंड होमच आहे यांच्यासाठी. करमतच नाही यांना कट्ट्यावर आल्याशिवाय. इथे येऊन हे तिघे जण जगातल्या सगळ्या विषयांवर गप्पा मारतात. सगळ्या म्हणजे अगदी सगळ्याच बरं का!

(शबनम आणि राहुल कट्ट्यावर भेटले आहेत. दोघे एकमेकांशी बोलत आहेत.)

शबनम: काय स्कॉलर, आज एकदम वेळेवर.. आणि एकदम टकाटक.. हम्म…. क्या बात है आज हम्म हम्म?

राहुल: ए गप ग. सकाळपासून तुला कुणी भेटलं नाही का?

शबनम: नाही नं. (घड्याळात बघत) अरे यार, ही डॉली अजून कशी आली नाही. नेहमी उशीरा येते.

तेवढ्यात डॉली घाईघाईत, धापा टाकत येते. थोडी घाबरल्यासारखी दिसतेय. तिला बघून राहुल आणि शबनमच्या चेहेऱ्यावर प्रश्नार्थक भाव येतात. डॉली त्यांच्या शेजारी येऊन उभी राहते.

शबनम: काय ग, काय झालं? Any problem? एवढी घाबरल्यासारखी का दिसतेयस?

डॉली: अरे यार, काय सांगू? मोठ्या संकटात अडकले होते. तुला माहितेय ना तो TY चा मुलगा. त्याला कितीही टाळलं तरी मागच्या आठवड्यापासून माझ्या मागे मागे येतोय. आज त्याने मला गाठलेच आणि म्हणाला, “मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझ्यात काही कमी आहे का? मग का मला ‘नाही’ म्हणतेस?”

शबनम: अरे वाह, हिरोईन को अब प्रपोज भी आने लगे. हम्म.. क्या बात है…

डॉली: इथे माझा जीव चाललाय आणि तुला मस्करी सुचतीये..

शबनम: मस्करीचं काय त्यात? डरपोक कुठली… जीव जायला तू काय वाघासमोर उभी होतीस? सरळ नाही म्हणायचं त्याला… तुम्ही मुली घाबरता, काही बोलत नाही आणि या असल्या पोरांचं फावतं.

राहुल: आणि त्याने बदला घेतला तर काय? एकतर्फी प्रेमातून झालेल्या घटना तू कधी ऐकल्या नाहीस का?  Acid attack पर्यंत गोष्टी जातात madam.

डॉली: ए राहुल्या, मला आणखी घाबरवू नकोस.

शबनम: घाबरायचं काय त्यात? तू काय तुझ्या इच्छेविरुध्द त्याला होकार देणारेस?

राहुल: हा ते खरंय… काही जण तर जाम ड्रामेबाज असतात. उगाच इमोशनल blackmail करतात. (राहुल फिल्मी पद्धतीने ड्रामा करून दाखवत) ‘मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत किंवा तू नाही म्हटलंस तर मी जीव देईन and all…’

शबनम: हो हो. अशा ड्रामेबाज लोकांना तर आजिबात भीक घालायची नाही. उद्या मी तुला म्हणलं की माझी आणि तुझी दोस्ती सिध्द करण्यासाठी विहिरीत उडी मार. तर मारणारेस का?

डॉली: तुम्हाला काय जातंय मोठ्या मोठ्या गप्पा मारायला ? तुमच्यावर वेळ आली म्हणजे कळेल.

शबनम: (हसत mama’s tone मध्ये) बेटा, अनुभवाचे बोल आहेत. नातं तोडायचं पण नसतं आणि नकार पण द्यायचा. अवघड आहे पण अशक्य नाही. मी केलंय ते… माझे आणि माझ्या बॉयफ्रेंडचे पण वाद झाले पण मी माझ्या इच्छेविरुद्ध त्याला कधीच होकार दिला नाही.

डॉली: आणि नंतर काय झालं? अबोला, चिडचिड, रुसवे-फुगवे…

शबनम : हो… झाले ना… पण थोडं समजावल्यावर होतं सगळं व्यवस्थित आणि शेवटी आपल्या मर्जीचा संबंध आहे… मनात नसताना, कुणाला तरी हवं आहे म्हणून दबावाखाली काहीही करणं… मला तरी नाही पटत. मग ती कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही.

राहुल: अरे पण इथं तसं नाहीये… इथं तो मुलगा हिच्या मागं जबरदस्ती येतोय… आणि बऱ्याच मुलांना नकार म्हणजे होकारच वाटतो… ते फिल्ममध्ये दाखवतात तसं… लडकी के ना में उसकी हा छुपी होती है… वगैरे बंडलपणा. हिने त्याला स्पष्टपणे सांगितलं आणि त्याने हिचं काही बरं वाईट केलं तर?

डॉली(घाबरून): आपण NSS च्या madam ना सांगूया का?

शबनम: हो सांगू शकतो. पण हे बघ डॉली, त्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा घाबरू नकोस… एकदा त्याला सरळ गाठ आणि न घाबरता, स्पष्टपणे सांग, तुला त्याच्याबद्दल कसलंही आकर्षण किंवा प्रेम वाटत नाही. त्याचा अपमान नाही करायचा. शांतपणे त्याला सांगायचं. तो एकटा असताना. पाहिजे तर मी येते बरोबर आणि मी लांबूनच सर्व काही बघेन आणि तरीही, त्यापुढे त्याने नाही ऐकलं तर आपण सरळ madam ची किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीची मदत घेऊयात.

राहुल: हो आपण ‘आय सोच’ च्या letstalksexuality.com वर पण विचारू शकतो. नक्कीच काहीतरी हिंट मिळेल.

डॉली: हम्म. खरंय… पण फार उशीर होण्याअगोदर मीच त्याला अगदी ठामपणे आणि स्पष्टपणे सांगणं चांगलं. ‘नाही म्हणजे नाही.’  “No means No” “नहीं का मतलब नहीं ही होता है”

राहुल: (तिला चिडवत) अगं एका भाषेत सांगितलं तरी कळेल त्याला.

(तिघेही मोठ्याने हसतात.)

डॉली: बरं, चला आता पळूया. मला उशीर होतोय क्लासला जायला. भेटू…

राहुल: चला मी पण पळतो.. आजपासून मी दररोज जिमला जाणार आहे. भेटूया.

शबनम: अरे जॉन अब्राहम, आज दोन वर्षे झाली आम्ही हेच ऐकतोय. तरीही तुला ऑल दि बेस्ट.. बाय. भेटू.

 

 

 

 

 

 

 

2 Comments
  1. Sanket says

    Nice story….

    1. I सोच says

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

Comments are closed.