स्त्रीचा निरोध
स्त्रीचा निरोध ही पॉलीयुरेथेन किंवा लॅटेक्स रबराची पिशवी असते. तिला दोन रिंगा असतात. तोंडापाशी एक मोठी रिंग असते ती निरोधशी एकसंध असते. दुसरी एक छोटी रिंग निरोधच्या आत असते जी बाहेर काढता येते. स्त्रीचा निरोध स्त्रीच्या योनीमध्ये बसवायचा असतो.
स्त्री-निरोध वापरायची योग्य पदधत :
१. संभोगाच्या वेळी दोघांनी (स्त्रीनं व पुरुषानं) एकाच वेळी निरोध वापरू नये. म्हणजे पुरुष निरोध वापरत असेल तर स्त्रीनं निरोध वापरू नये.
२. स्त्री-निरोध संभोगाच्या अर्धा तास अगोदर स्त्रीनं बसवायचा असतो.
३. स्त्री-निरोध बसवण्यासाठी स्त्रीनं खुर्चीवर पाय फाकवून बसावं किंवा स्क्वॅटिंग पोझिशन’ मध्ये बसावं.
४. निरोधातील छोट्या रिंगचा ‘8’ चा आकडा करून तो योनीत घालावा.
५. एका बोटाचा वापर करून ती छोटी रिंग योनीत जेवढी आत जाईल तेवढी आत घालावी. निरोधची मोठी रिंग योनीवर बसेल.
६. संभोगाच्या वेळी पुरुषाचं लिंग आत जाताना ते स्त्रीच्या निरोधात जात आहे याची खात्री करावी (चुकून लिंग मोठ्या रिंगच्या बाहेरच्या बाजूने आत गेलं तर निरोध वापरण्याचा काही उपयोग होत नाही.)
७. संभोग होऊन लिंग बाहेर काढल्यावर मोठ्या रिंगला एक-दोन पीळ दयावेत व निरोध बाहेर काढायला लागावं.
८. छोटी रिंग योनीमुखाजवळ आली की ती बोटांनी पकडून तिला ‘8’ आकड्यासारखा पीळ देऊन निरोध पूर्णपणे बाहेर काढावा.
९. निरोध कागदात गुंडाळून कच-याच्या पेटीत टाकावा, संडासात टाकू नये, त्याने संडास तुंबू शकतो.
जर स्त्री निरोध गुदमैथुनासाठी वापरायचा असेल तर…
१. निरोध गुदात घालायच्या अगोदर त्याच्या आतील छोटी रिंग काढून बाजूला ठेवावी.
२. निरोधात एक बोट घालून निरोध गुदात घाला. निरोधाची मोठी रिंग गुदद्वारावर बसेल.
३. संभोग झाल्यावर मोठ्या रिंगला एक-दोन पीळ दयावेत व निरोध बाहेर काढावा.
स्त्री-निरोधचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पुरुषाला निरोध चढवायचा नसेल तर आजवर स्त्रीला एस.टी.आय./एच.आय.व्ही.पासून कोणतंच संरक्षण नव्हतं. आता पुरुषानी निरोध नाही वापरला तर स्त्रीनं स्त्रीचा निरोध वापरून संरक्षण मिळवता येतं. म्हणून वेश्या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना काही संस्था स्त्री-निरोध स्वस्त दरात पुरवतात.
स्त्री निरोधचे काही तोटेही आहेत. निरोध व्यवस्थित बसवायची थोडी सवय व्हावी लागते. हा निरोध वापरून संभोग करताना थोडा आवाज होऊ शकतो. स्त्री निरोध घातल्यावर मुखमैथुन करताना निरोधचा अडथळा होऊ शकतो. हा निरोध महाग आहे. तो मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. एकदा वापरल्यावर तो परत वापरायचा नसतो. स्त्रीनं स्त्री-निरोध बसवून एका मागोमाग एक असा अनेक पुरुषांबरोबर संभोग केला पण प्रत्येक पुरुषानंतर निरोध बदलला नाही तर पुरुषांपासून एस.टी.आय./एच.आय.व्ही.चं तिला संरक्षण मिळतं, पण पुरुषाच्या लिंगाला अगोदर संभोग केलेल्या पुरुषाचं वीर्य लागतं (जे स्त्री-निरोधात राहिलेलं असतं). म्हणून त्या वीर्यात जर एस.टी.आय./एच.आय.व्ही.चे जिवाणू/विषाणू असतील तर नंतरच्या पुरुषाला याची लागण होण्याची शक्यता असते.
संदर्भ : वरील संंपादीत लेख बिंदूमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट यांच्या ‘मानवी लैंगिकता’ या पुस्तकातून घेतला आहेत.
2 Responses
हस्थमैथुन चा नाद जास्त लागलेला आहे तरी तो मला सोडायचा आहे कायमस्वरूपी त्यासाठी काय करावे लागेल
हस्तमैथून आणि त्याबाबत बरेच गैरसमज आपल्या समाजात आहेत. त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तुमच्या शंका निरसना साठी पुढील लिंक पहा व ऐका
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/
https://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/