#metoo च्या वादळानंतर आता सहमतीच्या सेक्ससाठी ‘कन्सेण्ट अ‍ॅप’

0 1,369

 

मीटूनंतर अमेरिकेत ‘कन्सेण्ट अ‍ॅप’ नावाचा एक डिजिटल प्रकार चर्चेत आला. शारीरिक जवळीक किंवा संबंध यासाठी ‘सहमती’ आहे असं या अ‍ॅपवर नोंदवायला तरुण-तरुणींनी सुरुवात केली. मात्र त्यावरून तिकडे मोठा गहजब झाला. खासगीपणात घुसखोरी ते तरुणींची माहिती जगजाहीर होण्याची भीती ते कायद्याला मान्य नसलेला पुरावा असे अनेक प्रश्न तयार झाले. आता तेच कन्सेण्ट अ‍ॅपचं वारं आपल्याकडेही येतंय. त्याविषयी ….

नेमके काय आहे अॅप्लिकेशन?

स्मार्टफोनवर हे अॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर जोड़ीदारांची माहिती त्यामध्ये फीड़ करायची असते. अॅप्लिकेशनमध्ये परस्पर संमतीचा एक फॉर्म भरायचा असतो. त्यामध्ये ‘आम्ही कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असून, एकमेकांच्या संमतीने शारीरिक जवळीक किंवा शरीरसंबंध ठेवत आहोत, असं नमूद केलेलं असतं. कुठल्या टप्प्यापर्यंतची सहमती अशा ‘लेव्हल’ही असतात. त्या लेव्हलपर्यंत जोडीदारांचा कन्सेण्ट त्यात नमूद केला जातो. दोघांचा सेल्फी काढून त्यामध्ये फीड़ करायचा असतो. या अॅपमधील नियमावलीनुसार या कन्सेण्टचा वापर एकमेकांना ब्लॅकमेल करण्यासाठी करता येणार नाही, असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं. भविष्यात एखाद्या कारणाने दोघं वेगळे झाले आणि एकमेकांवर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्याचे आरोप केले गेले, तर पुरावा म्हणून या कन्सेण्टचा वापर करता येईल, असं सांगण्यात आलं आहे.

 

नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने स्त्री-पुरुष यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पूर्वीच्या तुलनेत वाढले आहेत. ब-याचदा  तरुण-तरुणी शॉर्ट टर्म रिलेशनशिपमध्ये अडकतात. काही दिवसांपूर्वी एक पालक आपल्या मुलाला घेऊन माझ्याकडे आलेले त्याच्या प्रेयसीने एका करारावर स्वाक्षरी करावी, असा पालकांचा आग्रह होता. दोघे रिलेशनशिपमध्ये असले तरी हे नाते लग्नापर्यंत जाईल की नाही, तिचे आई-वडील परवानगी देतील की नाही, याबद्दल दोघे साशंक होते. भारतीय संस्कृतीच्या मूल्यांमध्ये कसेण्टसारख्या गोष्टी बसत नाहीत. मुळात अशा कन्सेण्टमधून नात्यातील विश्वासाला तडा जाऊ शकतो, भावनिक धक्का बसू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अॅप्लिकेशनचा स्वीकार केला जाणे अवघड आहे.

डॉ. स्वप्निल देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ  

 

कसेण्ट अॅप्लिकेशनमुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. मुळात अॅप पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल का, याचा विचार व्हायला हवा. कन्सेण्ट ही संकल्पना मुळापासून समजून घेण्याच्या बाबतीत आपला समाज़ अजूनही खूप मागे आहे. मुलगी गप्प बसली म्हणजे तिचा होकार आहे, अशी मानसिकता आजही समाजात दिसून येते. वर्चस्व वापरुन अथवा धाकदटपशा दाखवूनही कन्सेण्ट घेतली जाऊ शकते, हे समजून घ्यायला हवे. या अॅपमुळे नातेसंबंध सुरक्षित झाले असा विचार करणा-यांची  कीव करावीशी वाटते.

– अॅड. रमा सरोदे, कायदेतज्ञ

 

हे  अॅप खरंच कायदेशीर पुरावा ठरू शकेल?

– वरवर पाहता हे अॅप्लिकेशन म्हणजे सुरक्षिततेचा पर्याय असं वाटत असलं तरी सायबर तज्ज्ञांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. असे अॅप्लिकेशन कायद्यानुसार प्रमाण मानले जाऊ शकत नाही, असंही जाणकारांचे म्हणणे आहे.

– याबाबत विस्तृत माहिती देताना सायबर तज्ज्ञ पंकज़ घोड़े म्हणाले, ‘कन्सेण्टसारखी अॅप्लिकेशन केवळ फेकच नव्हे तर अत्यंत धोकादायक आहेत. यातून तरुणींची, महिलांची सहजपणे फसवणूक होऊ शकते.

– अॅप्लिकेशनचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते. शासनातर्फ अथवा पोलीस प्रशासनातर्फ अशा प्रकारच्या कोणत्याही अॅप्लिकेशनला मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या अॅप्लिकेशनचा कायद्याप्रमाणे पुरावा म्हणून वापर करता येणार नाही.

– अॅप्लिकेशन तयार करणं आता खूप सोपे झाले आहे. महाविद्यालयातील तरुण सहजपणे असे अॅप्लिकेशन तयार करतात. याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

– अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एखाद्या मुलीची वैयक्तिक माहिती, डिटेल शेअर होतात. त्या मुलीचा कन्सेण्ट घेतला जातो. हे फोटो अथवा माहिती इतरत्र उघड झाली तर मुलीची बदनामी होते. तिच्या भविष्याच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, हे अॅप्लिकेशन केवळ धोकादायकच आहे. अशा प्रकारच्या अॅपवर वेळीच निर्बंध आले पाहिजेत.

(सहमतीच्या सेक्ससाठी ‘कन्सेण्ट अ‍ॅप’ हा प्रज्ञा केळकर-सिंग लिखित लोकमत वर्तमानपत्रातील ऑक्सिजन पुरवणीत आलेला लेख असून पूर्ण लेख वाचण्यासाठी निळ्या शब्दांवर क्लिक करा).  

माहितीचा स्त्रोत : लोकमत ऑक्सिजन 

फोटो साभार : https://techcrunch.com/2014/10/01/good2go/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.