जीन्स घातली म्हणून आजही तरूण मुलीचा जीव जातो…

933

स्वातंत्र्याचं अगदी महत्त्वाचं लक्षण म्हणजे मनासारखं राहता येणं, फिरता येणं, हवं तिथे जाता येणं, हवं ते करता येणं. आणि भारतासारख्या स्वतंत्र देशात प्रत्येक नागरिकाला हे स्वातंत्र्य आपल्या संविधानानं म्हणजेच राज्यघटनेनं दिलं आहे. भारतात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेप्रमाणे, मर्जीप्रमाणे राहू शकते, फिरू शकते, काम करू शकते, आपल्या आपल्या धर्माची, श्रद्धेची उपासना करू शकते. आपल्यातल्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्यासाठी असं स्वातंत्र्य अत्यावश्यक आहे. तरीही स्वातंत्र्याला ६८  वर्षं झाल्यावरही जीन्स घातली म्हणून २१ वर्षाच्या पूजा निषादला जीव गमवावा लागला हे आपलं आजचं वास्तव आहे.

जीन्स घालते म्हणून पूजाच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली आणि घराला कुलुप लावून तो निघून गेला. वेळीच मदत मिळाली असती तर पूजाचा जीव वाचला असता. पण ३  दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. एकविसाव्या वर्षी एका स्वतंत्र देशात जन्मलेल्या स्वतंत्र नागरिक असलेल्या एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला का तर आपल्या आवडीचे कपडे घातले म्हणून. हे कसलं स्वातंत्र्य?

पूजाची गोष्ट कदाचित फार काळ कोणाच्या स्मरणात राहणार नाही. कारण मुलींच्या वागण्यावर, संचारावर, शिक्षणावर, कपड्यांवर आणि अगदी हसण्या-खेळण्यावरही सगळ्याच समाजामध्ये किती तरी बंधनं घातली गेली आहेत. ‘आपल्या समाजात असं चालत नाही’ पासून ते ‘मुली तंग कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात’ असंही समाज म्हणतच असतो. साधं आवडीचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्यही मुलींना नाही. कसं रहायचं, काय घालायचं हे घरचे नाही तर समाजातले लोक ठरवणार. आणि लग्न झाल्यावर सासरचे आणि नवरा. फार थोड्या मुली स्वतःच्या मर्जीने राहू-वागू शकतात हे खरं आहे. मुलीच्या किंवा बाईच्या कपड्यावरून तिची किंमत केली जाते आणि तिच्याबाबत काहीही वावगं झालं तरी त्याची सगळी जबाबदारीही तिच्या कपड्यांवरच टाकली जाते.

पूजासारखी वेळ इतर कुणावर येऊ नये यासाठी आपण सर्वांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे.

मुलींनो, तुमच्या बाबत असं काही घडत असेल तर वेळीच स्वतःचं मत मांडायला शिका. तुमच्या आवडीच्या गोष्टी करणं म्हणजे काही कुणाचा अनादर करणं नाही. प्रेमाने असो किंवा सक्तीने, कुणी तुम्ही काय घालायचं आणि काय नाही हे तुमच्यावर लादत असेल तर समजून घ्या की हे एक प्रकारचं नियंत्रण आहे. आणि समान नात्यांमध्ये प्रेम आणि आदर असायला पाहिजे. नियंत्रण नाही.

आणि मुलांनो, तुम्ही चुकून असं काही तुमच्या आयुष्यातल्या स्त्रियांशी – बहीण, मैत्रीण, आई, बायको, प्रेयसी – असं वागत असाल तर वेळीच स्वतःला रोका. मोकळेपणाने राहण्यात, आवडीचे कपडे घालण्यात काहीही गैर नाही. आपल्या प्रेमाच्या माणसाला नियंत्रणात ठेवायचं नसतं. तिला वाढू द्यायचं असतं. प्रेम त्यातूनच वाढतं. काबूत ठेवायला गेलात तर प्रेम नाही राग आणि चीड निर्माण होईल.

संदर्भ – दै. लोकसत्ता, पुणे आवृत्ती, 31-10-2-15

Comments are closed.