दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष समुपदेशन सुविधा- ८१४९७५६७९६
सी. वाय. डी. ए. मध्ये दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष समुपदेशन सुविधा- ८१४९७५६७९६
युवा विकास आणि उपक्रम केंद्र, (CYDA- Centre for Youth Development and Activities) ही सामाजिक संस्था युवकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अल्पसंख्याकांच्या/दुर्लक्षितांच्या विकासासाठी युवकांसोबत काम करते. युवकांपर्यंत पोहचून त्यांचे आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा शोध घेण्यासाठी मदत करणे हा सी. वाय. डी. ए. चा मुख्य उद्देश आहे.
आजकाल प्रत्येकाला अनेक समस्यांना आणि ताण तणावाला सामोरं जावं लागत आहे. समस्या सोडवण्यासाठी आवश्यक कौशल्यांच्या आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे लोकांना अनपेक्षित परिणामांना सामोरं जावं लागत आहे.
सी. वाय. डी. ए. मध्ये दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे. लहान मुले व किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, वैवाहिक समुपदेशन, कायदेशीर समुपदेशन, करिअर संबंधी समुपदेशन, इ. प्रकारचे समुपदेशन उपलब्ध आहे.
पत्ता: सी. वाय. डी. ए. (CYDA) कार्यालय, अतुर हाऊस, दुसरा मजला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी आणि महेश लंच होमच्या समोर, डॉ. आंबेडकर रोड पुणे- ४११ ००१
संपर्क व्यक्ती: अश्विनी – ८१४९७५६७९६
सर माझ्या बायकोची मासिक पाळी 1 महिना उशिरा आली आहे।।सर खूप भीती वाटत आहे की ती गरोदर तर राहीली नाही आहे ना याची।।सर pls मदत करा।।pls
गर्भधारणा नक्की नाही ना ? याची खात्री करण्यासाठी प्रेग्नंसी कीट आणून घरीच टेस्ट करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.
गर्भधारणा नसेल तर गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं.
गरज वाटल्यास तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत
मी लव्ह मॅरेज केले, माझ्या लग्नाला ५ वर्ष झालीत, मी माझ्या नवऱ्याला व कुटुंबाला हर परीस्थितीत साथ दिली. (आर्थिक / सांसारिक/ मानसिक / शारीरिक ) त्याच्या परिस्थिती आणि मजबुरी ला साथ दिली. स्वतःहा अड्जस्ट करत आली. माझ्या नवऱ्याने घरच्या परिस्थितीची करणे सांगितली. मी त्यांना समजून घेतले हर गोष्टीत. माझ्या कुटुंबात ८ जण आहेत. त्याचे सगळ्याचे केले कसली अपेक्षा ना ठेवता. लग्नानंतर पण जेव्हा मी आजारी पडले तेव्हा नवऱ्याने आणि फॅमिली ने सपोर्ट नाही केला. त्यात आर्थिक प्रॉब्लेम खूप होते. नवऱ्याने फक्त ५/७ महिने जॉब केला. माझ्या व माझ्या सासू च्या वर घर चालायचे. घरातले सगळे एकटीने करणे खाण्याचे खूप प्रॉब्लेम, मुलगी ४ महिन्याची तिला दूध पियाला लागायचे, मला पोटभर खायला नसायचे. नवऱ्याने हमेशा फॅमिली ला खूप इम्पॉर्टन्ट दिल्याने आमच्यात भांडण व्हायची. मला वेळ द्यायचे नाहीत,काळजी करत नव्हते. प्रेमाचे बोल नाही फक्त कामापुरते गॉड बोलणे. सून आणि बायको म्हणून कर्तव्य निभावणे एवढेच आमच्यात होते. आजारात माझ्या मित्राने भावाला सांगितले कि तुम्ही तिला सहारा नाही दिलात तर ती मरेल. आता २ वर्ष झाले मी माझ्या आई-वडिलांकडे राहते पण माझा नवरा अजूनही तसेच वागतो आणि जॉब करत नाही घरी बसून घराचे करतो. मी आई कडे जॉब ला लागून मागे दिवस काढले. बायको चपला सामान मानतात, मी काय करू अशा परिस्थितीत?
तुमच्या बोलण्यावरून तुमची अडचण लक्षात येत आहे. आपल्याकडे स्त्रिया लग्न टिकविण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. त्यातून प्रेम विवाह असेल तर लग्न टिकविण्याचा ताण अजूनच जास्त वाढतो. खरंतर आम्ही तुम्हाला काय करावं, याचं नेमकं उत्तर देऊ शकणार नाही. ते तुम्हालाच ठरवावं लागेल कारण तुम्ही नक्की कोणत्या परिस्थितीत आहात हे आमच्यापेक्षा तुम्हालाच अधिक चांगले माहित आहे. निर्णय घेताना मदत होईल यासाठी काही गोष्टी मात्र नक्की सांगू.
१. तुम्हाला त्या नात्यामध्ये परत जायचे आहे का? यावर एकदा शांतपणे विचार करा. जायचे असेल तर, शक्य असल्यास एखाद्या मध्यस्ताची मदत घेऊन, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अपेक्षा जोडीदारास सांगा. त्याचे म्हणणे देखील ऐकून घ्या आणि तुम्ही एका पातळीवर येणं शक्य असल्यास आणि तुमची इच्छा असल्यास एकत्र राहा. यासाठी शक्य असल्यास एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.
२. एकत्र राहायचा विचार केलात तर कोणत्याही प्रकारची हिंसा, मारहाण, टाकून बोलणे व इतर छळ सहन करू नका वेळीच मदत मागा.
३. एकत्र राहणे अजिबातच शक्य नाही असे तुम्हाला वाटत असेल तर वेगळे होणे हा एक उपाय आहे. तुम्ही सध्या नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहात ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. तुम्ही एकत्र राहून समाधानी नसाल, हिंसा सहन करावी लागत असेल तर वेगळे होता येईल. यासाठी तुम्हाला कौटुंबिक समुपदेशक आणि वकील यांची मदत घेता येईल.
शेवटी निर्णय तुमचा. कोणताही निर्णय घेत असताना त्याच्या परिणामांचा विचार करा. त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवा म्हणजे गोष्टी थोड्या सोप्या जातील. अशा मुद्द्यांवर वेबसाईट वरून उत्तरं देण्यास मर्यादा येतात कारण तुम्ही आमच्या समोर नसता. तुम्ही नेमके कोठे राहता हे जर समजले तर आम्हाला संबंधित ठिकाणच्या समुदेशकांचा संपर्क देता येईल. त्यांच्याशी तुम्हाला प्रत्यक्ष बोलून मदत घेता येईल. योग्य तो निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य मिळो यासाठी खूप सदिच्छा.