पुरुषपण ओलांडताना..

मी कधी निव्वळ पुरुष, कधी तर नुसता नर असतो. माझी समाजातील ओळखही विविध विशेषणे लागलेला पुरुष अशी आहे. मला त्यापलीकडे जाऊन सर्वार्थाने केवळ माणूस बनायचे आहे. हा प्रवास सोपा नाही.

1,814

सध्या निर्भयाच्या खुन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिंगणघाटच्या प्राध्यापिकेला जाळून मारणाऱ्यालाही त्याच यातना भोगायला लावाव्या अशा मागण्या समाजाच्या अनेक स्तरातून केल्या जात आहेत. मुळात हैदराबादेत डॉक्टर स्त्रीला जाळून मारण्याचा आरोप असणाऱ्यांना गोळी घालून मारण्याची बातमी अजून शिळी झालेली नाही. पण अशा प्रकारे ‘इन्स्टन्ट न्याय’ केल्यावर देशातील बलात्कारी पुरुषांना जरब बसेल ही अपेक्षा किती फोल होती हे त्यापाठोपाठ घडलेल्या अनेक घटनांनी सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांत बलात्कार करणाऱ्या किंवा त्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींची (यात अनेक वकील, राजकीय व धार्मिक नेतेही आहेत) निवेदने वाचली तर असे लक्षात येते की देशातील कोटय़वधी पुरुषांची (व काही स्त्रियांचीही ) मानसिकता त्याहून वेगळी नाही. जोवर ही मानसिकता बदलत नाही, तोवर स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी होणार नाही. त्यातील जे दुबळे असतील ते पकडले जाऊन लोकांच्या रागाचे भक्ष्य होतील. राजकीय-आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा ‘दबंग’ असतील तर त्यांच्या समर्थनासाठी हजारोंचे मोच्रे निघतील, हे आजचे वास्तव आहे.

स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराची समस्या ही मुळात स्त्री, पुरुष (व अन्य लिंगी) यांच्या निरामय सहजीवनाची समस्या आहे. म्हणून स्त्रियांसोबत पुरुषांनाही लिंगभावसमतेकडे नेणे हेच स्त्रीमुक्ती + पुरुषमुक्ती = मानवमुक्ती चळवळीचे पुढचे पाऊल असायला हवे.  हा विचार म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे. जागतिकीकरणानंतर जन्मलेल्या-वाढलेल्या पिढीत स्त्रियांचा नकाराचा अधिकार मानणारा,  त्यांना बरोबरीने वागविणारा, त्यांच्याशी मत्रीचे नाते जोडणारा आधुनिक तरुण ठळकपणे दिसू लागला आहे.

स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारात बघ्याची भूमिका घेणारे तरुण जसे या समाजात आहेत, तसेच मैत्रिणींची छेड काढणाऱ्या गुंडांना जाब विचारणारे व त्यासाठी आपल्या आयुष्याचा बळी देणारे डोंबिवलीचा संतोष विचीवारा व अंधेरीचे किनन आणि रुबेन हे युवकही याच समाजाचा भाग आहेत. निर्भयाला अखेपर्यंत साथ देणारा तिचा मित्रही याच पिढीचा. समाजात आज मोठय़ा प्रमाणावर स्त्रीविरोधी हिंसा सुप्त व उघड – दोन्ही रूपांत आढळते. त्यासाठी केवळ पुरुषांना दोष न देता पुरुष असे अमानुष का होतात, अत्याचारी पुरुषांना जाब विचारणारे ‘नवे पुरुष’ समाजात पुरेशा संख्येने का निर्माण होत नाहीत, निर्माण होतात ते आपल्यासमोर का आणले जात नाहीत, हे प्रश्नही आपण आता विचारले पाहिजेत.

अविनाश जोशी या विचारवंताने स्त्री/पुरुषमुक्तीच्या संदर्भात मांडलेले एक कळीचे वाक्य मला नेहमी खुणावते, ‘मुक्ती स्त्रीत्वापासून नव्हे, तर स्त्रीत्वातच’. स्त्री किंवा पुरुष कोणालाही मुक्त व्हायचे असेल तर तिला/त्याला आपल्यातल्या स्त्रीत्वाकडेच परतावे लागेल, हे मलाही मनोमन पटले आहे.Becoming ऐवजी being चा आग्रह; मदान मारणे, सत्ता, वर्चस्व, व्यक्तिवाद याऐवजी प्रेम, सामिलकी, सामूूहिकता यांना महत्त्व; डाव्या मेंदूपेक्षा उजव्या मेंदूचा अधिक वापर या बाबी एकूणच मानवजातीच्या हिताच्या आहेत, असे मी मानतो. म्हणूनच मी स्त्री-चळवळीने स्त्रियांना उंबरठय़ाबाहेर काढण्यात जेवढा रस दाखवला, तितका पुरुषांना उंबरठय़ाच्या आतल्या जगाशी परिचित करून देण्यात दाखवला नाही म्हणून खंतावतो.

गांधी-फुले-आंबेडकर यांच्यासारख्या समतेचा विचार जगणाऱ्या महापुरुषांच्या आयुष्यातून, दादा धर्माधिकारी ते अविनाश जोशी या विचारवंतांच्या लेखनातून, तसेच स्त्रीचळवळीच्या संस्कारातून मला जे आकळले, ते असे –

अधिक चांगल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी मला पुरुषीपणाच्या पलीकडे जावे लागेल. स्वत:चा शोध घेण्यासाठी मला माझ्यातील स्त्रीत्वाचा शोध घेऊन त्याच्याशी नाते जोडावे लागेल.लेखक म्हणून मला माझ्यातील स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्या पल्याड जावे लागेल.

आपल्या स्त्रीत्व/पुरुषत्वाच्या सीमारेखा ओलांडून भिन्निलगी व्यक्तीच्या मनात प्रवेश करू शकणे ही चांगल्या लेखकाची निजखूण आहे, असे मी मानतो. या निकषावर बंगालीतील रवींद्रनाथ टागोर, शरदबाबू, सुनील गंगोपाध्याय, हिंदीतले फणीश्वरनाथ रेणू, विनोदकुमार शुक्ल, राजस्थानीतले विजयदान देठा हे लेखक मला अतिशय भावतात. मेघना पेठेंच्या कथांमध्येही हे वैशिष्टय़ मला जाणवते.

माझ्यातील नरभानाचा निचरा करून निरामय व निखळ मानुषभानापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास किती खडतर आहे, या विचारक-लेखक-कर्त्यां पुरुषांच्या तुलनेत आपले निजबळ किती कमी पडते, याची खंत मला नेहमी बोचत असते. ही खंतच मला पुढची वाटही दाखवेल व या वाटेने चालत राहण्याचे बळ माझ्या अंगी येईल, अशी प्रार्थना करून थांबतो.

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

ravindrarp@gmail.com

————–

पूर्ण लेख वाचण्यासाठी लोकसत्ता वर्तमानपत्रातील पुढील लिंकला भेट द्या : https://www.loksatta.com/chaturang-news/crossing-manhood-chaturang-article-purush-hruday-bai-abn-97-2084761/

लेख साभार : लोकसत्ता

Comments are closed.