‘दंगल’ची उडी उंच पण सुवर्ण पदक दूरच…

1,088

नाट्य आणि वास्तव यांतील उत्तमाचा वेध घेऊ इच्छिणारा दंगल चित्रपट शेवटी अधांतरी लोंबकळत राहतो – तनूल ठाकूर. द वायर मधून साभार…

बॉलीवूड चित्रपटांच्या सुरुवातीला येणाऱ्या नामावलीवर नजर टाकली असता, बरं वाटण्याचे प्रसंग क्वचितच येतात. दंगल आपल्याला हा अनुभव देतो. अगदी सुरुवातीलाच, इतर सर्व निर्मिती सहाय्यकांची नावं येत असताना आपल्याला तिथे ‘कुस्ती समन्वयक’ या शीर्षकाखाली ‘कृपाशंकर बिश्नोई, कंसात अर्जुन अवार्ड विजेते’ असे नाव दिसते. बिश्नोई हे भारतीय महिला कुस्ती संघाचे प्रशिक्षक आहेत ज्यांनी दंगल चित्रपटासाठी आमीर खान आणि इतर कलाकारांना प्रशिक्षण दिले. मुख्यतः कुस्ती या खेळावर आधारित हा चित्रपट, ज्यात भारतीय मल्लांचा संघर्ष दाखवला आहे, या खऱ्या कुस्तीपटूच्या नावाचा उल्लेख करतो आणि त्याचे यश अधोरेखित करतो हे खरोखरच उलेखनीय आहे. कारण भारतासारख्या क्रिकेटप्रिय देशात इतर खेळाच्या खेळाडूंना असा सन्मान देणारी ही कृती महत्वाची आहे.

‘दंगल’ चित्रपट ज्या जगाबद्दल, ज्या विषयाबद्दल बोलतो, त्या विषयी खूप संवेदनशील आहे आणि विशेष म्हणजे त्यात एक सहजता आहे असं दिसतं. महावीर सिंग फोगट (आमीरखान) ला दुसऱ्या खेपेसही, मुलाची आस असताना, जेव्हा मुलगीच होते तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो, ‘कोई ना (चल जाऊ दे)’ – ‘वाईट झालं’ असा त्याचा दुसरा अर्थ. अगदी एक दोन क्षणात हे दृश्य येऊन जातं, पण पितृसत्तेच्या गंडस्थळी अगदी नेमका घाव करतं. मुलगा देऊ न शकल्याबद्दल त्याची बायको (साक्षी तन्वर) त्याच्याजवळ खंत व्यक्त करते तेव्हा तो म्हणतो, ‘इसमे तेरी गलती थोडी ना है! (यात तुझी थोडीच काही चूक आहे)’. हाही असाच एक महत्वाचा प्रसंग! यात असा एक भारतीय पुरुष दिसतो जो स्त्रीद्वेष्टा नाही, पण पितृसत्तेच्या पुरुषी मुल्यांमध्ये रुतलेला असल्यामुळे समानतेचे मूल्य नीटपणे अंगीकारु शकत नाही.

आमीरसारखा कलाकार ही भूमिका साकारत असल्याकारणाने हे पात्र उगाचच सद्गुणाचा पुतळा वगैरे होत नाही ही आणखी एक जमेची बाब! अगदी ‘मुली या मुलांपेक्षा काही कमी नसतात’ हा त्याला झालेला साक्षात्कारही तसाच सहज वाटतो. कारण या साक्षात्कारामागे ‘मुलीने मिळवू दे किंवा मुलाने, सोनं हे सोनं च असतं’ ही त्याची वैयक्तिक आकांक्षाच आहे. चित्रपट महावीर फोगट या पात्राला उगाचच प्रेक्षक प्रिय करत नाही, ही सुद्धा लक्षणीय बाब आहे. हे पात्रही तसं होण्याची पर्वा करत नाही. त्याला नको हे उत्तर चालत नाही, तो मुलींकडून त्यांच्या मर्जीविरुद्ध अंगमेहनत करून घेतो आणि कठोर प्रशिक्षण घेण्यास त्यांना प्रवृत्त करतो, त्यांचे लक्ष विचलीत होणार नाही याची काळजी घेतो. मुलींचे केस कापणे, लग्नातून त्यांना कुस्तीच्या सरावासाठी ओढून आणणे, सतत त्यांना ओरडणे ही आणखी काही उदाहरणं देता येतील.

आयुष्य कसं असायला हवं यापेक्षा ते कसं आहे, हे दाखवण्यात दिग्दर्शक नितीश तिवारी याला इंटरेस्ट आहे असं चित्रपट पाहताना लक्षात येतं. परिणामी, दंगलचा पूर्वार्ध कडक संवाद, प्रभावी अभिनय, देखणे संकलन आणि चित्रीकरण या गोष्टींमुळे प्रेक्षणीय झाला आहे.

दुसऱ्या भागाबद्दल मात्र असं म्हणता येण्यासारखी स्थिती नाही.

पण दुसऱ्या भागाच्या अपयशाबद्दल काही बोलण्याअगोदर ‘आमीर खान प्रोडक्शन’ च्या ‘डीएनए’ची थोडी ओळख करून घेऊया. शाहरुख आणि सलमान, या त्याच्या समकालीन नटांच्या तुलनेत – शाहरुख आपल्या आकर्षक दिसण्याने किंवा एका स्माईल अथवा नजरेच्या इशाऱ्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतो आणि सलमान जो आपल्या पाशवी मर्दानगीने अथवा टपोरी भाषेने लोकांना आकर्षित करून घेतो. आमीरहा अधिक संतुलित वाटतो. तो जे करतो त्या मागे काही एक विचार किंवा अभ्यास असतो. त्याच्या चित्रपटांच्या निवडीतूनही त्याला संवेदनशील आणि व्यामिश्र विषयांची आवड आहे, असं दिसतं. मग तारे जमीन पर असो, ३ इडियट्स, पिके किंवा दंगल असो. हे आलथू-फालथू सिनेमे नव्हते. जगाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन त्यांत होता. आपल्या भोवतालचा काही एक अर्थ लावण्याचा, त्यावर भूमिका घेण्याचा प्रयत्न त्यात होता. शाहरुख-सलमान प्रमाणे आमीर हिरो बनण्याचा प्रयत्न करत नाही, असं वाटतं. एक आठ वर्षाचा मुलगा, ईशान हा तारे जमीन पर.. या सिनेमाच्या मध्यवर्ती भूमिकेत होता, ३ इडियटस मध्ये आमीर खान इतर दोन मुख्य कलाकारांसोबत दिसतो तर दंगल ची कथा गीता या पात्राच्या सुवर्ण पदकाच्या स्वप्नाभोवती गुंफलेली आहे.

 

पण आमीर हा आमीरच आहे. हिरो बनण्यापासून तो स्वतःला थांबवू शकत नाही. फरक एवढाच, की शाहरुख-सलमान प्रमाणे तो बटबटीत नसतो. तो स्वतः मध्यवर्ती भूमिकेत असतो म्हणून नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या पात्रांमुळे आणि विशेष म्हणजे मुद्दामहून प्लॅन केलेल्या खलनायकी भूमिकांमुळे त्याला आपोआप नायकत्व मिळतं. ज्याला आमीर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पराभूत करेल, असा एखादा विलन चित्रपटात आणला की झालं काम. एका पात्राने दुसऱ्या पात्राचा केलेला खातमा याला बहुतेक वेळेस आपल्याकडे ‘इंटेलिजंट’ सिनेमा समजलं जातं. पण मुद्दा तोच राहतो. हे जग सुष्टांचं आणि दुष्टांचं आहे, नायक आणि खलनायकांचं आहे. फरक एवढाच, की इथे आवरण  वेगळं वापरण्यात आलं आहे.

म्हणजे तारे जमीन पर चित्रपटात शेवटी ईशान चित्र रेखाटण्यात मश्गुल आहे आणि आनंदी आहे, एवढं दाखवून भागत नाही. गर्दीच्या पसंदीस चित्रपट उतरावा म्हणून चित्रपटात ईशान स्पर्धा जिंकतो हे दाखवावं लागतं आणि तेही आमिरच्या पात्राच्या मदतीने, एका निष्ठूर बापाच्या विरोधात, जो आता आमिरच्या सांगण्यामुळे सुधारला आहे. खरं तर तारे जमीन पर हा सिनेमा त्या वेळचा एक महत्वाचा सिनेमा होता आणि आहे पण आमिरच्या सिनेमांनी तयार केलेली ‘चाकोरी’ हा सिनेमाही वागवताना दिसतो.

‘दंगल’ मध्ये सुद्धा असंच काहीसं होताना दिसतं. गीता आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी आपले गाव सोडून राष्ट्रीय क्रीडा अकादमीत दाखल होते. तिथे एक प्रशिक्षक आहे ज्याला तिची आणि तिच्या स्वाभाविक कौशल्याची ओळख नाही. गीताचा अधिक भर आक्रमणावर असताना, तो तिला सतत बचाव करण्याबद्दलच सांगत असतो. इतर चित्रपटांप्रमाणेच इथेही या पात्राला एका पठडीत गोठवलं जातं, त्याचा मूर्ख विदुषक केला जातो. हे खरंतर निव्वळ आमिरला हिरो होता यावं म्हणून अस्तित्वात आलेलं पात्र आहे.

गीता महावीरला कुस्तीमध्ये हरवते, असं एक दृश्य पुढं येतं. पण इथेही ती तिच्या नव्याने शिकलेल्या कौशल्याच्या जोरावर मात करत नाही, तर महावीरचे वय वाढल्यामुळे तो हरतो असं समोर येतं. याप्रकारची अनेक दृश्यं पुढं येतात, जिथे प्रेक्षकांना हे जाणवून दिलं जातं, की बापाशिवाय गीता काही करू शकत नाही. बाप आहे (एक पुरुष आहे) म्हणूनच ती आहे.

खरं तर, ही आश्चर्यकारक आणि दुर्दैवी गोष्ट आहे. ‘दंगल’ चित्रपट एकीकडे स्त्रीकेन्द्री दृष्टीकोन मांडतो आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे गीताला स्वतःच्या पायावर व्यक्ती किंवा एक व्यावसायिक खेळाडू म्हणून, उभी राहण्याची एकही संधी देत नाही. चित्रपटात एके ठिकाणी एक खूप सुंदर क्षण आहे. गीता घरापासून लांब आहे, मैत्रिणींसोबत वावरते आहे, उमलत्या वयातले आनंद अनुभवते आहे. ती मॉल मध्ये जाते, कपडे खरेदी करते, सिनेमा पाहते आणि एका मुलाला पाहून हसते. पण सिनेमा या  गोष्टींना तिच्या स्वाभाविक आकांक्षा म्हणून पुढे आणत नाही, तर ही ‘लक्षा’पासून भरकटवणारी, विचलित करणारी व्यवधानं आहेत म्हणून उडवून लावतो. ‘दंगल’ असं दाखवतो की जर तिला सुवर्णाचा वेध घ्यायचा असेल, तर तिला अधिक ‘पुरुषी’ असावं लागेल – तिला केस बारिक करावे लागतील, तिला तिच्या दिसण्याकडे लक्ष देऊन चालणार नाही, वडिलांकडे परत जावं लागेल, हाच एक मार्ग आहे आणि या मार्गापासून ढळून चालणार नाही. इथे लिंगभावातील लवचिकता आणि प्रवाहीपण समजून घेताना ‘दंगल’ अधिक शहाणपण दाखवेल अशी आपली अपेक्षा फोल ठरते.

अर्थात हे मान्यच आहे, की शेवटी ‘दंगल’ हा एक काल्पनिक चित्रपट आहे आणि विश्वासार्ह वाटणारी आणि मनोरंजन मूल्य असणारी कुठलीही पटकथा तो वापरू शकतो. पण आपल्याला हेही विसरून चालणार नाही, की ‘दंगल’ हा एक विशिष्ट प्रकारचा चित्रपट आहे जो जाणतो, की त्याला नेमकं कशाबद्ल बोलायचं आहे – आणि इथे ते लिंगभाव / स्त्री-पुरुष समानतेबद्दल आहे. म्हणून जेव्हा हा चित्रपट त्याच आघाडीवर कमजोर पडतो असं दिसतं, जे मांडायचं आहे त्यावर त्याचाच विश्वास नाही असं जेव्हा दिसतं, तेव्हा आपली निराशाच होते.

स्वैर अनुवाद: अच्युत बोरगांवकर

चित्र साभार: दंगल चित्रपट

साभार: https://thewire.in/88865/dangal-aamir-khan/

Comments are closed.