‘छोटंसं गेट टूगेदर’
आपणा सर्वांना माहितच आहे की, मतिमंद मुलामुलींच्या पालकांसाठी तथापि काही पालकांसोबत ‘स्वीकार आधार गट’ चालवत आहे. मागील वर्षी या गटाची सुरुवात झाली असून यामध्ये पालकांचा सक्रीय सहभाग नेहमीच राहिला आहे. वर्षभरामध्ये ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ यावर आधारित विविध मुद्यांवर चर्चा झाली, पालकांना नवीन माहितीही मिळाली. महत्वाचे म्हणजे पालकांच्या अनुभवांची देवाणघेवाणही झाली आणि त्यातून एकमेकांप्रती आपलेपणा वाढत गेला. अशा प्रकारच्या वातावरणाची, जागेची पालकांना खरंच गरज आहे जिथे ते व्यक्त होऊ शकतील असं वाटतं.
पालकत्व निभावणं हे सगळ्याच पालकांसाठी आव्हानात्मक काम असतं. त्यातंच विशेष गरजा असणारं मूल असलं की, आव्हानं आणि जबाबदाऱ्या बऱ्याचश्या प्रमाणात वाढतात. यावेळी इतरही अनेक प्रकारच्या ताण- तणावांमधून पालक जातच असतात. दैनंदिन कामं आणि ठरलेल्या काही गोष्टी यानेच आयुष्य अगदी व्यापून जातं आणि मग स्वतःसाठी निवांत वेळ काढणं अवघड होऊन बसतं. म्हणूनच पालक आणि मुलं एकत्र येऊन मौजमजा करतील आणि एक वेगळा अनुभव सर्वांसाठी राहील या हेतूने एप्रिल महिन्यात एक छोटंसं गेट टू गेदर संभाजी उदयान, डेक्कन याठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं. आणि हो यामध्ये गप्पा गोष्टी तर झाल्याच शिवाय खेळ आणि खाऊ अशी मस्त मजाही केली.
गेट टू गेदरचा आनंद मुलांनीही लुटला. नरेंद्र, विवेक, प्रणव, चारुदत्त आणि प्रतिक या मुलांशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडी, त्यांच्यातील विविध कौशल्य जाणून घेताना आम्हालाही छान वाटलं. आनंद देत असताना आनंद घेताही आला पाहिजे असाच काही अनुभव यादिवशी आला. आनंदी चेहऱ्यांनी एकमेकांचा निरोप घेताना आणि पुन्हा लवकरच भेटण्याची प्रत्येकाची उत्सुकता पाहून मन मात्र भरून आलं होतं.
चित्र साभार – गेट टुगेदर ची क्षणचित्र
Khup chan upakram ahe
धन्यवाद.