अपंगत्व आणि लैंगिकतेसंदर्भातला मनमोकळा संवाद

930

सुरुवातीपासूनच ‘शरीर साक्षरता’ हा ‘तथापि’ ट्रस्टच्या कामाचा गाभा आहे. किशोरवयीन मुलं-मुली, पालक आणि शिक्षकांसाठी शरीर साक्षरतेच्या माध्यमातून लैंगिकता शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उपक्रम ‘तथापि’ राबवत आहे. किशोरावस्था हा संवेदनशील कालखंड प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो. या काळात शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर घडून येणाऱ्या बदलांविषयी नॉर्मल समजल्या जाणाऱ्या मुला-मुलींप्रमाणेच अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींबरोबरही निकोप संवाद करण्याची गरज असते. या विचारांच्या पार्श्वभूमीवर २०१३ पासून तथापि ट्रस्ट ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ याविषयी काम करत आहे. किशोरावस्थेतील शारीरिक आणि मानसिक बदलांविषयी शास्त्रीय आणि सकारात्मक दृष्टीकोन मुला-मुलींमध्ये तसेच त्यांच्या पालक व शिक्षकांमध्ये रुजावा, वाढीस लागावा असा ‘तथापि’चा प्रयत्न आहे.

‘अपंगत्व आणि लैंगिकता’ हा विषय वेगवेगळं अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींच्या पालक आणि शिक्षकांपर्यंत पोचावा, त्याबद्दल खुलेपणाने चर्चा व्हावी, याविषयीच्या अडचणी समजून घेता याव्यात या उद्देशांतर्गत ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ याविषयी राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही दोन दिवसीय बैठक दिनांक १३-१४ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्यात घेण्यात आली.

२०१३ ते २०१४ या दोन वर्षांमध्ये ‘तथापि’ने जटार चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने ‘अंध किशोरवयीन मुलं-मुली आणि शरीर साक्षरता’ हा विषय हाती घेऊन ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ हे संसाधन विकसित केले. हे संसाधन विकसित करण्यात स्वतः अंध मुला-मुलींनी सहभाग दिला आहे. आपल्या शरीराची आणि मनाची ओळख, वयात येताना होणारे शारीरिक-मानसिक बदल, प्रेम आणि लैंगिकता, साधे आजार आणि साधे उपाय, लैंगिक आरोग्य, लैंगिक शोषणापासून सुरक्षित राहण्यासाठीचे उपाय; अशा अनेक विषयांवर ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या पुस्तकातून मांडणी केली आहे. हा एक संच आहे ज्यामध्ये ब्रेल लिपीतील पुस्तक, ऑडीओ सीडी आणि पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शिका आहे.

तसंच २०१५ ते २०१६ या वर्षामध्ये ‘तथापि’ने ‘मतिमंदत्व आणि शरीर साक्षरता’ हा विषय हाती घेऊन ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ हे पुस्तक मतिमंद मुला-मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी विकसित केले आहे. आपलं शरीर आणि मन, किशोरावस्थेतील शारीरिक-मानसिक बदल, मतिमंद मुला-मुलींचं वयात येणं, त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धती, याबद्दलचे शिक्षकांचे आणि पालकांचे अनुभव, लैंगिक शोषण व सुरक्षितता अशा अनेक विषयांवर मांडणी करण्यात आली आहे. तसेच या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे लेख हा या पुस्तकाचा महत्वाचा भाग आहे. पुस्तकाच्या प्रती तथापिमध्ये उपलब्ध आहेत.

या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०१६ रोजी डॉ. अनिता घई यांच्या हस्ते संपन्न झाला. डॉ. अनिता घई या दिल्ली येथील ‘जीजस आणि मेरी’ कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. शिवाय अपंगत्व आणि लैगिकता, अपंगत्व आणि लिंगभाव या विषयांमध्ये त्या कार्यरत असतात. तसेच यावेळी ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ या मुंबईतील संस्थेच्या कार्यकारी संचालक बिशाखा दत्ता, उमेद परिवार या पुण्यातील संस्थेचे संस्थापक विश्वस्त रमेश शहा आणि ‘तथापि’ ट्रस्टच्या विश्वस्त मेधा काळे उपस्थित होत्या.

‘अपंगत्व आणि लैंगिकता’ याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी त्यांचे अनुभव, मतं मांडली आणि सहभागींसाठी खुली चर्चा घेण्यात आली. यामध्ये मतिमंद मुलाचे पालक भाल कोरगावकर, मतिमंद मुलाचे पालक आणि रिव्ह्का साहिल अक्षर इन्स्टिट्यूट या मतिमंद मुलांच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक पुंडलिक आवटे, माधवी ओगले व्यावसायिक शाळेच्या मुख्याध्यापिका कलिका मुजुमदार, साधना व्हिलेज संस्थेच्या संस्थापक सदस्य मेधा टेंगशे अशा अनुभवी व्यक्तींचा सहभाग होता. विख्यात समुपदेशक डॉ. उज्वल नेने यांनी या सत्राचा अध्यक्षीय समारोप केला.

एकूणच मतिमंद मुलं-मुली वयात येताना त्यांच्यातही शारीरिक-मानसिक बदल होत असतात. पण त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. मतिमंद मुला-मुलींनाही लैंगिकता जगण्याचा हक्क असावा. त्यासाठी काही मार्ग शोधता येतील. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’पेक्षा ‘कम्पॅनियनशिप’कडे जाण्याचा विचार करावा. त्यासाठी पालकांमध्येही याविषयी संवेदनशीलता निर्माण होणं गरजेचं आहे. मतिमंद मुला-मुलींच्या लग्नाचा विचार विविध गोष्टी विचारात घेऊन घ्यावा, त्यांचे लैंगिक शोषणापासून रक्षण व्हावे यासाठी सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श ओळखायला मुला-मुलींना शिकवावे, अशा प्रकारची मते तज्ञांनी व्यक्त केली.

दिनांक १४ फेब्रुवारी रोजी शरीर साक्षरतेविषयी सहभागींसाठी सत्र घेण्यात आले आणि डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अनिता घईंनी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, लहानपणापासूनची जडणघडण, त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांचे अपंगत्वाच्या क्षेत्रातील कार्य अशा अनेक गोष्टी मुलाखतीद्वारे हळूहळू उलगडल्या.

गडचिरोली, यवतमाळ, नाशिक, इगतपुरी, औरंगाबाद, बांदा, सोलापूर, कोळवण, पुणे आणि इतरही ठिकाणहून अनेक कार्यकर्ते, पालक आणि शिक्षक या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या पुढाकाराने आगामी काळात राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या विषयाबद्दल जाणीव जागृती व्हावी यासाठी पालक-शिक्षक-समुपदेशक यांच्यासोबत कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर अतिशय सकारात्मक चर्चा या दोन दिवसात घडली.

शब्दांकन – प्राजक्ता धुमाळ

Comments are closed.