प्रशिक्षकांचे प्रशिक्षण – प्रातिनिधिक गटचर्चा गोषवारा

1 850

 अपंगत्व आणि लैंगिकता – संवादाची गरज आणि कामाची दिशा या एका खुल्या परिसंवादाने

 तथापि ट्रस्ट मागील अनेक वर्षे लैंगिकता शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहे. याच कामाचा पुढील भाग म्हणून तथापि ‘मतिमंदत्व आणि लैंगिकता’ या विषयावर प्रामुख्याने पालक आणि शिक्षक यांच्यासोबत संवादाचे काम करत आहे. लैंगिकतेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर संवाद साधू शकणारे संवादक राज्याच्या विविध भागात तयार व्हावेत आणि त्यांच्या रूपाने स्थानिक गरजा भागवू शकणारे एक संसाधन तयार व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुण्यात १४ मार्च ते १७ मार्च २०१८ या चार दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाची सुरुवात ‘अपंगत्व आणि लैंगिकता – संवादाची गरज आणि कामाची दिशा या एका खुल्या परिसंवादाने करण्यात आली होती. परिसंवादामध्ये या क्षेत्रातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते. सोनाली नवांगुळ- लेखिका आणि कार्यकर्त्या कोल्हापूर, सुनिता कुलकर्णी- शिक्षण तज्ञ, पालक, पुणे, सुनिता लेले- साद संस्था, पुणे, कणिका अगरवाल- विशेष संस्था, मुंबई, दीपिका परखड- निवांत संस्था, पुणे यांनी आपली मते आणि अनुभवांची मांडणी केली. या परिसंवादाचा गोषवारा देत आहोत.  

 गरज आहे स्वतःला मोकळं करत राहण्याची…

सोनाली नवांगुळ- लेखिका आणि कार्यकर्त्या, कोल्हापूर

 वयाच्या ९ व्या वर्षी अपघात झाल्यानंतर माझ्या कमरेखाली संवेदना नाहीशा झाल्या आणि नैसर्गिक विधींवरील नियंत्रणही राहिले नाही. मी सध्या अशाप्रकारचे आयुष्य जगात आहे कि जे कदाचित पुन्हा कधीच दुरुस्त करता येणारं नाही.

 सामाजिक संस्थेमध्ये काम करत असतानाही अनेक नकारात्मक अनुभव आले. अपंगत्व हा एकच दबाव नाही तर अशाप्रकारचे कितीतरी दबाव असतात कि ज्याच्यामुळे स्वतःला व्यक्त होण्यात प्रचंड अडचण निर्माण होते. आपल्यावर अनेक तऱ्हेचे ताण असतात. त्यामुळे केवळ लैंगिकतेबद्दलच्याच नव्हे तर सगळ्याच भावना एवढया तीव्र का होतात याचा विचार कुठेतरी करायला पाहिजे. प्रत्येकालाच जसं दिसायचं तसं दिसण्याचा आणि व्यक्त होण्याचा हक्क आहे. त्यासाठी वाईटपणा पत्करावा लागला तरी चालेलं. कारण आपण जसे आहोत तसे राहायला शिकणं यासाठी स्वतःला प्रचंड मोकळं करत राहण्याची गरज असते.

 आयुष्य जगत असताना महत्वाच्या गोष्टींविषयी माहिती असणं आणि त्याच्या सवयी होणं हा जीवनातील महत्वाचा भाग आहे असं वाटतं. मला जेंव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली तेंव्हा प्रश्न पडलेला की, पाळी ही आनंदाची बाब आहे कि दुःखाची? कारण त्यावेळी मला मासिक पाळीबद्दल काहीच सांगितलं गेलेलं नव्हतं आणि काय करायचं हेही माहिती नव्हतं, त्याबद्दल विचारावं इतका मोकळेपणाही दिला जात नाही ना? लैंगिकतेपर्यंत येण्यासाठीचा जो प्रवास आहे त्यातील अडथळे आपण जसजसे कमी करत आणू तसतसे लैंगिकतेविषयी स्वतःच्या आणि समोरच्याशी जुळवून घेण्याच्या काही युक्त्या सापडतील. त्यासाठी प्रत्येकाला बोलावं आणि व्यक्त व्हावं लागणार आहे. माध्यमांतील कोंडी देखील फोडावी लागणार आहे कारण चित्रपटांमध्ये अपंगाबद्दलच्या प्रेरणादायी कहाण्या दाखविलेल्या असतात परंतू सामान्य आयुष्यात असं असू शकत नाही. म्हणूनच आणखी गरज आहे ती, नवीन माध्यमांचा वापर करून बोलते होण्याची.

 लैंगिकता- मानवी गरज  

सुनिता कुलकर्णी- शिक्षण तज्ञ, पालक,  पुणे  

 कुठल्याही अपंगत्वाबद्दल जरी आपण बोलत असलो तरी लैंगिकता ही एक मानवी गरज म्हणून बघितलं किंवा विचार केला तर कदाचित थोडंसं सोपं होईल. लैंगिकतेला व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते.प्रत्येक अपंग व्यक्तीची गरज किंवा स्वतःची लैंगिकता समजून घेण्याच्या क्षमता आणि पद्धती वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. कुणाला दिसत नसेल, कुणाला ऐकू येत नाही किंवा बोलायला त्रास होत असेल. मात्र सर्वजण स्पर्श हे माध्यम वेगवेगळ्या प्रकारे का होईना वापरू शकतात. व्यक्त होण्यासाठी ते महत्वाचंच आहे. परंतू स्पर्श म्हंटलं की खूपच जवळ आल्याची भावना तयार होते आणि त्याच्यातून मनामध्ये अनेक गैरसमज निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तसेच स्पर्शामागील हेतुसंदर्भात खूप तर्कवितर्कही लावले जाऊ शकतात. म्हणूनच लैंगिकतेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची अत्यंत गरज आहे.

 लैंगिकता म्हटले की बहुतेक वेळेस लोकांना शरीर संबंध(सेक्स) असाच अर्थ लागतो. आणि मग त्यातून अवांछित गर्भधारणा, लैंगिक आजार ई. गोष्टी भेडसाऊ लागतात. परंतू लैंगिकतेचा एवढाच मर्यादित अर्थ नाही. प्रेम, जिव्हाळा, स्पर्श, आपुलकी, जवळीकता हे सुद्धा लैंगिक अभिव्यक्तीतीलच निरनिराळे रंग आहेत. अशा सर्व गोष्टींचा आनंद घेण्यापासून आपण मतीमंद किंवा इतर विशेष मुलांना का रोखतो? अपंगत्वामध्येही नेमके कोणते अपंगत्व आहे, त्यानुसार घरात, कामाच्या ठिकाणी व पूर्ण समाजात नेमका काय बदल करावा लागणार आहे, समाजातील नकारात्मकता कशी कमी करता येईल आणि एकूणच अपंगत्वाचा स्वीकार अधिकाधिक कसा होईल याच्याबाद्दलाही अधिक विचार करणे आवश्यक आहे.

स्वमग्नता (autism) आणि लैंगिकता

सुनिता लेले – साद संस्था,  पुणे

आपल्या भारतामध्ये स्वमग्नता स्विकारायला, सरकारने त्याची मान्यता द्यायला आणि त्याला या कायद्यामध्ये घ्यायला ११९५ हे साल उजाडलं. यात आपण इतर देशांपेक्षा किमान १५-२० वर्षे मागे आहोत. स्वमग्न मुलांची लग्न, त्यांच्या लैंगिक गरजा आणि त्याचं शिक्षण या सर्व गोष्टींबाबत आपण समाज म्हणून पटकन संवेदनशील आणि सजग नाही झालो तर आपण अजून १०-१५  वर्षे मागे जाऊ शकतो.

 लैंगिकता म्हणजे वयात आलेल्या मुलांविषयी आपण बोलतोय पण लहानपणापासूनच लैंगिकते विषयीचा मोकळेपणा ठेऊन आपल्या मुलांशी तसं बोलतोय का? त्याप्रमाणे त्यांना वाढवतोय का? पालकांना मुलांचे अपंगत्व पूर्णपणे स्विकारणंच खूप अवघड होतं. आपल्या इथे मुलांना जसं आहे तसं व्यक्त होण्याची मोकळीकच नाही आहे. हे महत्वाचे मुद्दे  विचारात घ्यायला हवेत. कारण मुलं वयात येत असताना शारीरिक वाढीची लक्षणं दिसायला लागली की, पालक  हतबल होतात. खरेतर अपंगत्व किती तीव्र किंवा सौम्य आहे हे पाहणं गरजेचं आहे. शिवाय मुलाची वाढ कशी झाली आहे, कुठल्या गोष्टीची जबाबदारी घेणं मुलाला किती जमतं या सर्व गोष्टी पाहणंही आवश्यक आहे.  

 स्वमग्नता किंवा कोणत्याही अपंगत्वासह आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींचे लग्न होऊ शकते पण त्यासाठी लागणारा आधार, दोन्ही कुटुबांची आर्थिक बाजू आणि नात्यातील लवचिकतेसाठी उपयोगी प्रशिक्षण या गोष्टी आवश्यक असतात. विशेष मुला-मुलींच्या लैंगिक गरजा किंवा लैंगिकता शिक्षण हा खूप पुढचा विचार जरी आपण करत असलो तरी, या मुलांना स्वतःला न्याय मिळतोय का? स्वतःच्या आवडीनिवडी जोपासता येतात का? असे मुद्दे देखील लैंगिक शिक्षणाचा भाग असू शकतात. यासाठी समाजानेच थोडंसं प्रगल्भ व्हायला पाहिजे.

‘लैंगिक अभिव्यक्ती आणि संघर्ष’  

कणिका अगरवाल – विशेष संस्था, मुंबई

 कर्णबधीर असणाऱ्यांनाही लैंगिकता आहे पण समाजाकडून त्यांच्या लैंगिक अभिव्यक्तीसाठी अनेक मर्यादा येत असतात. त्याबरोबर शिक्षण, अर्थार्जना सोबतच जीवनात इतरही संघर्ष असतातच. त्यामुळे पालकांना अशा पाल्यांच्या भविष्याची काळजी असते. घरातील संवादामध्ये सहभागी होता येत नसल्याने किंवा कुटुंबातील मंडळी अशा संवादामध्ये त्यांना सामील करून घेत नसल्याने अनेकदा घराबद्दल एवढी आत्मियता निर्माण झालेली नसते जेवढी शाळेबद्दल असते. कारण शाळेमध्ये सर्व मुलं त्यांच्यासारखीच असल्याने तिथलं वातावरण आणि व्यक्ती आपल्याश्या वाटत असतात. त्यामुळे मैत्री, प्रेम, आकर्षण सारख्या भावना शाळेतील मित्र, कर्मचारी यांचाबद्दल अधिक प्रकर्षाने त्यांना जाणवतात. त्यांची लैंगिकता अशा जागा उपलब्ध असतील तर लवकर विकसित होते. आणि ती तितकीच strong असते. त्यांचासाठी ही प्रेमाची आणि आपुलकीची भावना असते पण बहुदा पाहणार्यांना ते चुकीचे वाटत असते. यातून अशा भावनांप्रती आणि वर्तनाप्रती अनेकदा एका प्रकारचा नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. तो तसा न ठेवता आकर्षण म्हणजे काय? प्रेम, नातेसंबंध, सेक्स अशा मुद्यांना धरून योग्य मार्गदर्शन करता येणं गरजेचं आहे. त्यातून पुढील अनेक अडचणी टाळता येतील. आपल्याला त्यासाठी अशा विषयांवर चर्चा करणं आवश्यक आहे.

अंधत्व स्विकारताना…

दीपिका परखड – निवांत संस्था,  पुणे

 मी वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत डोळस आयुष्य जगले. परंतू २०१४ रोजी माझी  ७५% दृष्टी गेली. सुरुवातीला यामुळे  खूप तणाव आला होता. एक डोळस आयुष्य जगत असताना अचानक आलेल्या अंधत्वामुळे आता माझ कसं होणार? हे स्वीकारता येईल का? असे विचार मनामध्ये यायला लागले होते. परंतू, निवांत संस्थेमध्ये आल्यानंतर इथलं  वातावरण आणि या मुलांमधील जिद्द पाहून  चांगलं वाटायला लागलं आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

 लैंगिकता हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील इतर विषयांइतकाच महत्वाचा भाग आहे. त्यामुळे वयात येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीला लैंगिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. मी संस्थेत आले त्यावेळी या मुलांच्या लैंगिक शिक्षणाविषयीचा मला प्रश्न पडला होता की, डोळस मुलं आणि अंध मुलं यांच्या लैंगिक शिक्षणात काही फरक आहे का? परंतू नंतर लक्षात आले की, डोळस मुलांप्रमाणे जरी ते स्वतःमध्ये होणारे शारीरिक बदल पाहू शकत नसले तरी ते समजून घेऊ शकतात. स्पर्श हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे कारण त्यांच्या शिक्षणाची, समजून घेण्याची सुरुवातच स्पर्शाच्या माध्यमातून होते.   

 परिसंवादामध्ये अपंगत्व आणि लैंगिकते संदर्भातील दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला गेला. उपस्थितांच्या मनातील प्रश्न, काम करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर काय मार्ग काढता येतील या  मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. अपंगत्व कुठले का असेना परंतू लैंगिकता अभिव्यक्तीची गरज ही एक मानवी गरज आहे, लैंगिक अधिकार हे इतर कुठल्याही अधिकाराइतकेच महत्वाचे आहेत या मुद्द्यावर सर्वच वक्त्यांचे एकमत होते. अपंगत्व आणि लैंगिकता या तशा अवघड समजल्या जाणाऱ्या विषयावर आपल्या समाजात अधिक बोलले जाणे गरजेचे आहे असे मत प्रकर्षाने पुढे आले. या क्षेत्रात विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी असेच एकत्र येऊन कामाची योग्य दिशा ठरवून आपले सकारात्मक योगदान दिले तर ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या संवेदनशील मुद्यावर काम करणे अधिक सोपे होईल या अपेक्षेसह परिसंवादाचा शेवट झाला.

1 Comment
  1. अजय आवळे says

    जर एखाद्या मुलीला काही शारीरिक व्याधी असेल, अणि जर तीच लग्न झाल अणि तिला मूल झाले तर त्या मुलाला पन तिच्या सारखी व्याधी होऊ शकते का..?

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.