बोलू नका, ऐकू नका, पाहू नका!

0 3,690

बोलू नका, मनातही आणू नका असले विचार… हे काय तुमचं असलं सगळं करण्याचं वय आहे… काही तरी थेरं सुचतात तरी कशी… संस्कार म्हणून काही राहिलेच नाहीत… हे सगळं लग्नानंतर… आताचं वय शिकण्याचं…

मनाला न पटणारी पण रेटून सांगितली जाणारी ही काही वाक्यं. आपणही कधी वयात आलो होतो, आपल्याही मनात काय काय होत होतं, आपल्यालाही कुणाबद्दल तरी काही वाटू लागलं होतं आणि आपणही चोरून काही ना काही पाहत होतो, ऐकत होतो, वाचत होतो हे सगळं मनाआड करून कोरडं राहण्याची ही धडपड बहुतेक मोठी माणसं करत आली आहेत.

प्रेम, लैंगिक भावना, इच्छा, आकर्षण या विशिष्ट वयात मना-शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांची ओळख आपली आपल्याला होतच असते. हे बदल काय आहेत, ते का होतात, नव्या भावना कशा समजून घ्यायच्या हे सगळं कळो न कळो, उसळी मारून हे सगळं बाहेर येत असतं. लहान मुलाचं प्रौढामध्ये रुपांतरित होण्याचा हा अतिशय महत्वाचा कालखंड असतो. प्रत्येक प्रजातीत हे बदल घडतात. निसर्गाचा नियमच आहे हा. मनात वादळं निर्माण होत असताना हे कुणाला सांगायचं, कुणाशी बोलायचं, काय बोलायचं हे मात्र कुणी सांगितलेलं नसतं. हातात येतायत पण निसटून जातायत अशा या भावना कुठे आणि कशा व्यक्त करायच्या हे मात्र माहित नाही अशी ही अवस्था. आणि या सर्व भावनांविषयी एक प्रकारची चुप्पी आपल्या समाजात तयार झाली आहे. मग मिळेल तशी माहिती मिळवावी, त्यातून हे ज्ञान पदरी पाडून घ्यावं आणि जमेल तसं मोठं व्हावं अशी रीत समाजात पडून गेली आहे. शरीर वाढतंय, मन बदलतंय पण त्याविषयी बोलायचं नाही, विचारायचं नाही. सगळं स्वतःहून शिकायचं ही अपेक्षा कितपत योग्य मानायची?

माहितीच्या महाजालाने वयात येणाऱ्या मुलांच्या मनातले किती तरी गुंते सोडवायला मदत केली आहे. पूर्वी लपून छपून वाचलेल्या पुस्तकांची, पाहिलेल्या चित्रांची, खुसपुसत मारलेल्या गप्पांची जागा आता माउसच्या मदतीने वेगळ्या जगात नेणाऱ्या इंटरनेट आणि त्यावर उपलब्ध असणाऱ्या लैंगिक स्वरुपाच्या साहित्याने घेतली आहे. तोंड, कान डोळे आणि मेंदूही बंद करून घेतलेल्या मोठ्यांच्या आणि जमेल तशी मदत करणाऱ्या मित्रांच्या जागी आता संगणक, मोबाइल फोन आले आहेत. पोर्नोग्राफी, लैंगिक स्वरुपाची दृश्यं, चित्रपट, अतिशय सहजी उपलब्ध झाली आहेत. मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि उत्सुकता शमवण्यासाठी या साहित्याचा वापर करणाऱ्या मुलांची वयं दिवसेंदिवस कमी होत आहेत. पोर्नोग्राफिक साहित्य कोणत्या वयातील मुला-मुलींनी पाहावे, त्याचे त्यांच्या मनावर काय परिणाम होतात असे अनेक प्रश्न आहेत. आणि प्रश्नांप्रमाणेच उत्तरंही अनेक आहेत. कारण ज्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीत हे घडतंय तीच अत्यंत वेगवेगळी आहे.

मौनावर गाढ श्रद्धा असणारा आणि कामेच्छा आणि वासना शत्रू मानणाऱ्या संस्कृतीमध्ये अनेकदा मुलांसाठी सेक्सविषयी, लैंगिक संबंधांविषयी आणि लैंगिक सुखाविषयी माहिती मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पिवळी पुस्तकं आणि ब्लू फिल्म्स असं रंगीबेरंगी पोर्नोग्राफिक साहित्य. लैंगिक संबंध, प्रणय, लैंगिक क्रिया, समागम, लैंगिक सुख अशा विषयांवर कुठलीही भीती न बाळगता मुलं माहिती मिळवू शकतात आणि आपली उत्सुकता शमवू शकतात. अर्थात यालाही काही पथ्यं आहेतच. उदा. कधी कधी हिंसेचा आणि अत्याचाराचा वापर करून चित्रित केलेले व्हिडियो, त्यातील जबरदस्तीने केलेलं लैगिक इच्छेचं शमन पाहून लैंगिक संबंध असेच असायला पाहिजेत किंवा आपल्या जोडीदाराच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत ती सुखी होत नाही अशा चुकीच्या कल्पनाही अशा साहित्यातून तयार होण्याची शक्यता असते. बलात्काराचे व्हिडिओ करणं आणि ते प्रसारित करणं किंवा त्याचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर करून मुलींना पोर्नोग्राफीच्या जाळ्यात ओढणं या या व्यवसायाच्या काळ्या बाजू आहेत हे आपल्याला नजरेआड करता येणार नाहीत. आणि लैंगिकतेचा, लैंगिक संबंधांचं देखील हे बाजारीकरण आहे. Sex becomes a product to be sold, consumed and bought.

मोबाईल अन् इंटरनेटच्या क्रांतीमुळे हे व्यापारीकरण फार जास्त अन् लवकर होते, हेही खरे. अन् ते सर्वांच्या हातात पडते, हेही खरेच. अनेकदा अशा साहित्याचा खप वाढवण्यासाठी त्यामध्ये भडक, विकृत, हिंसक घटना, प्रसंगही असतात. आणि त्याचा अर्थ सगळीच मुलं लावू शकतील असं नाही. त्यामुळे हे सर्व साहित्य “मुळातच वाईट आहे”, “त्यावर बंदी घालणंच योग्य” असं न मानता त्यातील विकृती आणि हिंसा ओळखायला आणि ती गाळून टाकायला मुलांना शिकवायला लागेल. आणि त्यासोबतच आपण जे पाहतोय ते समजून घेण्यासाठी, त्याचे अर्थ लावण्यासाठी सोबती, सांगातीही हवेतच. आई-वडील, भावंडं, शिक्षक, समुपदेशक, डॉक्टर असे अनेक जण या भूमिका निभावू शकतात. किंबहुना त्यांनी त्या निभावयाच पाहिजेत. नाहीतर वडील घरात टीव्ही लावू देत नाहीत, म्हणून शेजारच्या घरात जावून बघणं जितकं नैसर्गिक आहे, तितकंच अश्लील साहित्यावर बंदी घालून त्याचा चोरटा दुरुपयोग वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की, if you have to teach English to Johnny (or Joan), then it’s not enough to know English, but you have to know how to teach and of course, you have to know Johnny (or Joan)! आपली मुलं एकदमच अनभिज्ञ आहेत असं समजाल तर आपणच अल्पज्ञ आहोत, हे ध्यानात यायला वेळ लागणार नाही.

साभार – ले. डॉ. वासुदेव परळीकर, मेधा काळे (हा लेख दै. लोकमत या वर्तमानपत्रात 5 जुलै 2014 रोजी प्रकाशित झाला होता.)

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.