‘डोन्ट शूट’_अच्युत बोरगावकर

1,976

परवा एका मैत्रिणीचा फोन आला. दवाखान्यातून नुकतीच घरी आली होती. “काय झालं होतं?” मी विचारलं तर म्हणाली, “काही नाही”. “काही नाही साठी दवाखान्यात जायला लागलं?” मी म्हणालो. “बीपी वाढला होता, खूप ताप आला होता, एवढंच डॉक्टर म्हणाले” ती म्हणाली. अधिक विचारल्यानंतर तिने जे कारण सांगितलं त्याने मी चक्रावूनच गेलो. एक मुलगा जो स्वतःला तिचा ‘जवळचा’ वगैरे समजत होता त्याला ‘ही’ नियमित भेटत नाही याचा त्रास होत होता. हिने जेव्हा आपण नको भेटायला म्हटले तेव्हा तो अस्वस्थ वगैरे होई आणि आपण ‘निव्वळ’ मित्र तरी राहूयात असा त्याचा आग्रह होता. ती याला टाळू लागली तर तो अधिकच मागे लागला. वेळी अवेळी रूमच्या खाली येणे, वर्गात भेटणे आणि बोलणे, हॉटेलमध्ये मागे मागे येणे असे काही बाही चालू झाले. त्याचं हिला टेन्शन आलं आणि ही आजारी पडली.

माझी ही मैत्रीण हुशार आहे, अगदी तुम्हा सर्व मुलींप्रमाणे. काही दिवसांतच सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभी राहील. आत्मविश्वास आहे. मग अशा फडतूस गोष्टीने कशी काय आजारी पडली याचं मला खूप आश्चर्य वाटत होतं. पण यासोबतच एक सूक्ष्म भीती माझ्या मनात निर्माण झाली जी मी तातडीने तिला बोलून दाखवली. मी म्हणालो, ‘तुझ्या आयुष्यात काय करायचं आहे, कधी करायचं आहे याचे सर्व निर्णय तूच घ्यायला हवेत आणि ते तसे तू घेशीलच. पण असे नाजूक नातेसंबंध बरेचदा खूप परीक्षा पाहतात. त्यातही बहुतेक वेळेस अनेक दडपणाखाली काही तरी निर्णय घेतला जाण्याची शक्यता असते आणि मग मुली अक्षरशः फसतात. असा अनुभव बरेचदा येतो. तू अशा काही कात्रीत सापडली नाहीस ना?’ यावर ती ‘नाही’ असे म्हणाली.

मला भीती वाटण्याचं कारण सांगतो. आज मोबाईल आणि इंटरनेट किरकोळ गोष्ट झाली आहे. मोबाईलमध्ये कॅमेरा आहे आणि इंटरनेटमध्ये गोष्टी सार्वत्रिक करण्याची ताकद. पोर्न इंडस्ट्री जगातील सर्वात मोठ्या गणल्या जाणाऱ्या उद्योगापैकी एक उद्योग झाली आहे ती याच इंटरनेट आणि मोबाईलच्या जीवावर. या पोर्न उद्योगात देशी पोर्न हा जो एक प्रकार आहे तो सर्वाधिक लोकप्रिय प्रकारांपैकी गणला जातो. फसवून, नकळत किंवा जबरदस्तीने मुली आणि स्त्रियांसोबतचे शरीरसंबंध अनेकदा त्यांच्याच विश्वासाच्या जोडीदारांनी, अक्षरशः नवऱ्यांनी चित्रित केलेल्या व्हीडिओजचा या देशी पोर्न प्रकारामध्ये समावेश असतो. अशा प्रकारचे हजारो व्हीडिओ सध्या अनेक वेबसाईटसवर अपलोड केले गेले आहेत, क्षणाक्षणाला केले जात आहेत. अशा व्हीडिओजचा धमक्या देण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी आणि लैंगिक/आर्थिक शोषण करण्यासाठी सर्रास वापर केला जातो आहे. अशा अनेक बातम्या आपण रोज पाहतो, ऐकतो. जेव्हा माझी मैत्रीण मला तिच्याबद्दल सांगत होती, तेव्हा नेमकी हीच भीती मला वाटली होती.

अगदी चार पाच महिन्याखाली लातूरमध्ये घडलेली एक घटना आठवली. एका मुलीने बदनामीच्या भीतीने स्वतःला जाळून घेतलं. एका बेसावध क्षणी तिचा व्हिडीओ तयार करून एक मुलगा तिला छळत होता. आपल्या सोबत आपल्या घरच्यांचीही बदनामी होईल, लोक काय म्हणतील ही भीति तिच्या जीवावर बेतली. अशा क्षणी समाजातून अथवा बरेचदा घरातूनही मुलींना पाठींबा, आधार मिळणं अवघड असतं याचं शिक्षण आपला सांस्कृतिक परिसर मुलींना लहानपणापासूनच देत असतो हा तुमचाही अनुभव असेल. असं का होतं?

आपल्या परंपराप्रिय आधुनिक समाजात अफवांना (इंग्रजीत गॉसिप) अनन्य साधारण महत्व आहे. त्यात ‘ईश्वरी अंश’ असलेल्या सर्वव्यापी माध्यमांची आणि ओघाने दर्शक/वाचक म्हणून आपली सेन्सेशन/सनसनाटीसाठीची आवड तर सिद्धच झालेली आहे. पण समाजाची घडी नीटनेटकी ‘वगैरे’ ठेवण्यास कारणीभूत समजल्या जाणाऱ्या विवाह, कुटुंब यांसारख्या संस्था आजही मोठ्या प्रमाणात प्रचलित असल्या कारणाने आपल्या समाजात रोजच्या रोज फारसे ‘सेन्सेशन्स’ तयार होत नाहीत. साधारणपणे आपण बहुतेक जण रोज स्वतःच्याच घरी परततो. ही गरज भागवण्यासाठी रोज रोज सीरियल्स तरी किती पाहणार? मग खऱ्या आयुष्यातील एखाद्याच्या किंवा एखादीच्या प्रेम आणि तत्सम संबंधांची बातमी ‘प्रकरणात’ रूपांतरित होवून तिखट-मीठ लावून चघळली जाते. ही ब्रेकिंग न्यूज संथ, रटाळ, ‘तोच नवरा-तीच बायको’ टाईप शांतता ब्रेक करते. असं कोणी आपल्याच नात्यात असेल तर जितकं नातं जवळचं तितकं अधिक टेन्शन त्या कुटुंबाला येतं आणि जितकं लांबचं तितकी अधिक गॉसिपची मज्जा घेतली जाते.

पण या गोष्टींचा मुलींच्या आयुष्यावर खूप गंभीर परिणाम होतो. त्यांची आयुष्यच उध्वस्त होऊ शकतात. मुलींनी स्वतःला दोष देऊ नये, खंबीर रहावं, पोलिसात तक्रार करावी हे सगळं खरं आहे पण असा एखादा एपिसोड त्या मुलीचा आणि कुटुंबाचाही जीवन रस शोषून घेतो.

माझी सर्व मुलींना कळकळीची विनंती आहे. (कारण मुलांची खात्री देणं अवघड आहे, आत्ता तरी) कृपया या प्रकारांना बळी पडू नका. ही अगदीच खरी आणि पक्की गोष्ट आहे की, तुमचे निर्णय तुम्हीच घेणं गरजेचं आहे. जितक्या आपणच आपल्या आयुष्याच्या कर्त्या-धर्त्या असू तितकं आपण एक स्वयंपूर्ण आणि समृध्द आयुष्य जगू. आपले नातेसंबंध आपणच ठरवणं, ते प्रत्येक मुलीच्या हातात असणं, असे निर्णय घेण्यासाठी सक्षम होण्याचं शिक्षण घेण्याची संधी प्रत्येक मुलीला मिळणं हा प्रत्येक मुलीचा अधिकार आहे. स्वतःचे जोडीदारही स्वतःच निवडा. पण या जोडीदारांना तुमच्या खाजगी, बेसावध क्षणांचं शुटींग करू देऊ नका. कारण ते कधी इंटरनेटवर जाईल आणि तुमचा खाजगीपणाचा मुलभूत हक्क मारला जाईल हे सांगता येत नाही…

 

2 Comments
 1. अच्युत, ‘डोन्ट शूट’ या लेखातून तू अतिशय महत्वाच्या परंतु दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या विषयाबद्दल खूप उत्तम पद्धतीने लिहिलं आहेस.
  बऱ्याचदा व्यक्ती, मुलगी जेंव्हा प्रेमात असते त्यावेळी तिचा समोरच्या व्यक्तीवर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास असतो. त्यामुळे अशा प्रणयाच्या क्षणांचे शुटींग होईल किंवा केले तर त्याचा दुरुपयोग आपला जोडीदार करेल हे त्यांच्या धानीमनीही नसते. माझ्या पाहण्यातील एका केसमध्ये एका विवाहित पुरुषाने त्याच्या नात्यातील त्याच्यापेक्षा अत्यंत कमी वयाच्या मुलीला प्रेमाचा वास्ता आणि लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले व चित्रीकरण केले आणि ज्यावेळी त्यांचे संबंध जगजाहीर होऊन वाईट स्थितीला पोहोचले त्यावेळी त्या क्लिप्स नातेवाईकात दाखवून ती मुलगी कशी वाईट चारित्र्याची आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला. तो विवाहित; बदनामी झाली तरी बायकोलेकारांसोबत पण तिची बदनामी. आणि या धसक्याने मुलीने साऱ्या जगाशी संपर्क आणि संबंध तोडला. माणसांवरचा विश्वास उडालाय तिचा. मुले बऱ्याचदा मुलींना ‘माझ्यावर तुझा विश्वास नाही का?’ असे भावनिक आवाहन करून असे शुटींग करतात, ज्यास मुलींनी कडाडून विरोध करायला हवा. कधीकधी मुलीनाही अशा क्षणांच्या चित्रीकरणाची गंमत वाटून ते शूट करण्यास संमती देण्याचा मोह होतो, जो त्यांनी भविष्यकालीन परिणामांचा विचार करून टाळावा. तू म्हणतोस तसं मुलीची आयुष्ये याने उध्वस्त होतात. त्यांचा आत्मविश्वास गमावून त्यांच्यातील जिवंतपणाही नाहीसा होतो. सामाजिक संरक्षणामुळे पुरुष सुटतात पण मुली बदनामीच्या आणि ब्लाकमेलिंगच्या जाळ्यात अडकतात.

  मुळातच अशा वैयक्तिक क्षणाचे जे फक्त तुमचे क्षण असतात, त्यांचे कशाचे शुटींग करावेच कशासाठी?प्रेम,प्रणय ही प्रत्येकाची अत्यंत खाजगी बाब असते; तिचे प्रदर्शन कशासाठी? त्यास मनात जपून ठेवावयास हवे. आणि हो, नात्यात एकमेकांबद्दल आणि नात्याबद्दल विश्वास,सन्मान आणि बांधिलकी असेल तर असे शुटींग होणारच नाहीत. त्यामुळे मुळातच आपापले नातेही तपासून पाहायला हवे. आणि विश्वासाच्या नात्यातही असे होत असेल तर त्यास विरोध करून ते थांबविले पाहिजेत.

  सर्वात महत्वाचे, असे शुटींग झाले/केले असेल आणि त्याबद्दल कुणी तुम्हांस ते जगजाहीर करण्याची धमकी देऊन ब्लाकमेल करत असेल तर मुलींनी व इतरांनी न घाबरता ताबडतोब ही बाब घरच्यांच्या, जवळच्या विश्वासू व्यक्तींच्या निदर्शनास आणून त्याविरुद्ध पोलिसात तक्रार करावयास हवी. असे करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे व त्यास शिक्षाही आहे. आपल्या खाजगी क्षणांना बदनाम करणे हा त्या व्यक्तीचा दोष आहे, आपला नाही हे मुलींना स्वतःला बजावले पाहिजे.

  शेवटी, प्रेम माणसाला आणखी छान माणूस बनविणारी गोष्ट आहे आणि संमतीने केलेला प्रणय ही नैसर्गिक आणि सुंदर गोष्ट आहे. पण त्याचा कुणीही गैरवापर करणार नाही यासाठी सतर्क राहणे तेवढेच गरजेचे. प्रेमात होकारास जेवढे महत्व आहे तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक नकार महत्वाचा आहे. त्याचाही वापर मुलींनी केला पाहिजे.

 2. I सोच says

  धन्यवाद लक्ष्मी…

Comments are closed.