इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव पिल्स-डॉ. रीतू परचुरे. 

‘गरोदरपण किंवा प्रेग्नन्सी’ राहू नये यासाठीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य व नियमित वापर असेल तर गरोदर राहण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच. परंतु एखादे वेळी पुरेसे सरंक्षण न वापरता संबंध आले तर गरोदरपण राहू शकते. अशा वेळी काय करायचं? आता अशी साधने उपलब्ध आहेत जी असुरक्षित संबंध आल्यानंतरही वापरता येतात. असुरक्षित संबंधानंतर तातडीने घ्यावयाच्या गोळ्या किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव पिल्स हा असाच एक पर्याय. या गोळ्यांमुळे गरोदरपण राहण्याची शक्यता पुष्कळच कमी होते. या गोळ्यांना ‘मॉर्निंग आफ्टर पिल्स’ असेही म्हटले जाते.

या गोळ्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम या व तत्सम अनेक मुद्यांविषयी समज-गैरसमजांचा पुरेसा गोंधळ अनेकांच्या मनात असू शकतो. म्हणूनच, या विषयी अधिक शास्त्रीय व सविस्तर माहिती समजून घेणे महत्वाचे आहे.

या गोळ्या कधी घ्यायच्या असतात?

तांबी, गर्भ निरोधक गोळ्या (उदा. माला डी), होर्मोनचे इंजेक्शन, यासारखे कुठलेही साधन वापरलेले नसेल किंवा त्यांचा अनियमित वापर असेल, संबंधांच्या वेळी कंडोम वापरला नसेल किंवा कंडोम फाटला, तर गरोदरपण राहण्याची शक्यता असते. अशा वेळी, म्हणजेच असुरक्षित संबंधांनंतर ह्या गोळ्या घ्यायच्या असतात. असुरक्षित संबंधांनंतर पुढच्या ७२ तासांच्या आत गोळ्या घेतल्यास गर्भधारणा टाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. म्हणूनच ‘मॉर्निंग आफ्टर पिल्स’ हे संबोधन फारसं बरोबर नाही. जितक्या लवकर या गोळ्या घेतल्या जातील तितकं चांगलं. असुरक्षित संबंधांनंतरच्या पहिल्या १२  तासात या गोळ्यांचा फायदा सर्वाधिक असतो.

अर्थात, संतती नियमनासाठी पूर्णपणे किंवा फक्त या गोळ्यांवर अवलंबणे चूकच ठरेल. या गोळ्या फक्त ‘इमर्जन्सी’ साठी आहेत. हे नेहमी वापरावयाचे संतती नियमनाचे साधन नाही. एकाच मासिक पाळीच्या चक्रात (menstrual cycle) अनेकदा या गोळ्या घेणं आरोग्याला अपायकारक ठरू शकतं.

तसेच हे ही लक्षात ठेवायला हवं की या गोळ्या एच. आय. व्ही. /एड्स किंवा इतर लिंग सांसर्गिक आजारांविरूद्ध कुठलेही संरक्षण देत नाहीत. त्यासाठी प्रत्येक संबंधाच्या वेळी कंडोम वापरणं अत्यावश्यक आहे.

या गोळ्या कसं काम करतात?

या गोळ्यांमुळे स्त्रीबीज बीजांडामधून बाहेर टाकले जाण्याची प्रक्रिया थांबते किंवा पुढे ढकलली जाते. यापलीकडे गर्भाशयमुखाजवळील स्त्राव घट्ट झाल्यामुळे शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोचू न शकणे, फलित गर्भाचे गर्भाशयात रोपण होण्यास अटकाव इत्यादी प्रकारेही या गोळ्या काम करत असाव्यात. पण त्याविषयीचे ठाम पुरावे आज तरी उपलब्ध नाहीत. गोळी घ्यायच्या अगोदरच गर्भारपण राहिलेले असेल तर साहजिकच औषध घेऊनही काहीच फायदा होत नाही. पण गर्भार असताना चुकून कधी ही गोळी घेतली गेली तर त्याचा आई किंवा बाळावर कुठलाही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होत नाही.

या गोळ्यांचे काही दुष्परिणाम आहेत का?

या गोळ्या घेतल्यानंतर एक–दोन दिवस, काही जणींना  मळमळ व उलट्या याचा त्रास होतो. गोळी घेतल्या घेतल्या २ तासांत उलटी झाली तर परत एक गोळी घ्यावी लागू शकते. काही जणींना डोकेदुखी, पोटात दुखणे, थकवा यासारखा त्रास होतो. पाळी अनियमित होणे हा बऱ्याच जणींमध्ये दिसणारा  अजून एक दुष्परिणाम. विशेषतः गोळ्या घेतलेल्या महिन्यात मासिक पाळी पुढे मागे होण्याचे प्रमाण अधिक असते. जर पाळीची तारीख दोन आठवड्याहून अधिक काळ पुढे गेली तर प्रेग्नन्सीची तपासणी करून घ्यायला हवी.

या गोळ्या सहजपणे उपलब्ध असतील तर त्यांचा चुकीचा वापर तर होणार नाही ना?

या गोळ्या डॉक्टरांकडे, औषधांच्या दुकानात, नर्स बाईंकडे, आशा वर्कर कडे, संतती नियमन या विषयावर काम करणाऱ्या संस्थांकडे मिळू शकतात.  त्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज असतेच असं नाही.

काही वर्षांपूवी, या गोळ्यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात टेलीव्हीजन (TV) सारख्या माध्यमांवर येत असत. त्यामुळे गोळ्यांचा गैरवापर तर होणार नाही ना याची भीती वैद्यकीय व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या मनात होती. आजही, विशेषतः तरुण मुलं-मुली सर्रास या गोळ्या वापरतात अशी चिंता अनेकांच्या बोलण्यातून डोकावताना दिसते. यातील नैतिक अनैतिकतेच्या आपापल्या चौकटी किंवा संकल्पना थोड्या बाजूला ठेवून, जरा शास्त्रीय दृष्टीने या विषयाकडे पाहायला हवे.

‘नको असलेलं गरोदरपण’ हा भारतातला एक महत्वाचा प्रश्न आहे. लग्न झालेल्या किंवा न झालेल्या अशा दोन्ही गटांमध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात दिसतो. महिलांच्या आरोग्यावर, आणि अनेकदा त्यांच्या आख्ख्या आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम  होऊ शकतो. उपलब्ध सर्व पर्यायांची  योग्य ती माहिती असेल तर हे टाळणं सहजी शक्य आहे. म्हणूनच संतती नियमनाच्या उपलब्ध सर्व साधनांची नीट माहिती सर्वाना असणं गरजेचं आहे. सुरक्षित काय आणि शरीरासाठी घातक काय ते जाणून घेऊन मग त्या साधनांचा वापर करणं कधीही चांगलं.

आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की,  नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. खरं तर पाळी चक्रातले काहीच दिवस स्त्री जननक्षम असते किंवा गर्भ धारणा होऊ शकते. पुरुषाच्या शरीरात मात्र रोज लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं तयार होत असतात आणि प्रत्येक वेळी वीर्यामध्ये पुरुषबीजं असतात. तसंच निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधक पद्धत आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे.

Email – health@prayaspune.org

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

4 Responses

  1. विकी says:

    मी गर्लफ्रेंड बरोबर असुरक्षित संबंध ठेवले नंतर unwanted 72 pill. दीले पण तिला 5 दिवसांनी रक्तस्राव झालं काचे कारण काय

    • हार्मोनल imbalance मुळे कधी कधी होण्याची शक्यता असते, पण असं जर पुन्हा पुन्हा होत असेल तर त्वरीत डॉक्टरांना भेटा.

  2. Dg says:

    मी सेक्स केल्यानंतर ४ तासांनी I pill 72 tablet दिली आणि नंतर पुन्हा ४ तासांनी सेक्स केला तर pregency होण्याची chance आहे का plz suggest

    • गर्भधारणा होण्याची शक्यता नाही आहे.
      पण जर गर्भधारणा नको असल्यास निरोध सारखा पर्याय वापरायला हवा, कारण या गोळ्या एच. आय. व्ही. /एड्स किंवा इतर लिंग सांसर्गिक आजारांविरूद्ध कुठलेही संरक्षण देत नाहीत. त्यासाठी प्रत्येक संबंधाच्या वेळी कंडोम वापरणं अत्यावश्यक आहे.या गोळ्या फक्त ‘इमर्जन्सी’ साठी आहेत. हे नेहमी वापरावयाचे संतती नियमनाचे साधन नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap