एकदा हातात झाडू घेऊन…

0 895

मुलगा म्हणजे शूरवीर, कर्तबगार, घराबाहेरची कामं करणारा आणि मुलगी म्हणजे दुबळी, नाजूक घरातली कामं करणारी असं जवळपास सगळ्याच मुला-मुलींच्या डोक्यात ‘फिट’ झालेलं असतं. पण खरंच असं आहे का हो? खरं तर लहानपणापासून मुला-मुलींना कसं वाढवलं जातं, त्यानुसार त्यांच्यात गुण, विविध कौशल्ये विकसित होण्यास मदत होत असते. म्हणूनच लहानपणापासूनच मुला-मुलींना समान वागणूक देणं महत्वाचं आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही, कोणत्याही वयात आपण वेगवेगळे गुण, कौशल्ये शिकू शकतो. मनानं पक्क ठरवलं तर मुलगा असो वा मुलगी मुला-मुलींमधल्या सामाजिक भेदाच्या चौकटी तुम्ही नक्कीच तोडू शकता…
त्यासाठी ठरवलेल्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या मनगटात बळ यावं, तुमच्या प्रयत्नांना यश यावं  यासाठी या कवितेतून अनेक शुभेच्छा!

एकदा हातात झाडू घेऊन…

एकदा हातात झाडू घेऊन पहावा म्हटलं;

उठलो तेव्हा सारं घर चकाचक दिसलं

झाडू हातात घेण्याचं काही कारणच नव्हतं उरलं!

 

दुसऱ्या दिवशी म्हटलं कपडे धुवून पहावं;

अरे अरे राहू दे, म्हणत कुणीतरी तेवढ्यातच का यावं?

लगेच मेंदूनं फर्मावलं – हातातलं काम सोडून द्यावं!

 

आता त्यानं ठरवून टाकलं, जेवून झालं की ताट घेऊनच उठायचं

आपल्यात अशी पद्धत नाही, आता काय करायचं?

प्रत्येक जण अडवणार, त्यांना कसं सांगायचं?

 

मित्र हसले, शेजारी चिडवू लागले

पण त्यानं हे सगळे विचार मनातून काढून टाकले

 

पोहायला शिकायचं तर कोण काय म्हणेल

नाही शिकलीस कराटे तर काय गं अडेल?

काय कपडे, कसे केस अशी कशी ही मुलगी?

काय करावं हिच्यापुढे आता हद्द झाली!

 

कोणी हसतं, कोणी बोलतं, कोणी करतं सूचनांचा भडिमार

खचलेल्या मनाचा गोंधळ कोण सोडवणार?

 

लोक बोलणार, हसणार आणि चिडवणारसुद्धा;

नवीन गोष्टींची सवय नाही त्यांनासुद्धा

थोडं दुर्लक्ष करा, थोडी हिंमत धरा

मन करा खंबीर म्हणजे मनगटात येईल जोर

टाका पुढचं पाउल होऊ नका कमजोर!!!

 

 

संदर्भ – ‘शरीर साक्षरता मुलांसाठी’ – तथापि प्रकाशन 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.