आता तुम्हीच सांगा काय करायचे?

1,159

आयुष्यात अनेकदा असं होतं की लैंगिकता आणि त्या सोबतीने येणारे नातेसंबंध कुणाकुणाला वेगळ्याच अनपेक्षित वळणावर आणून सोडतात आणि त्यामुळे उभा राहतो एक कळीचा प्रश्न- आता काय करायचं? इथे दिलेली गोष्ट नेमकं कुठलं वळण घेईल याचा अंदाज करत ‘आता काय करायचं?’ हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो का पाहा. आणि तुम्ही सुचवलेलं उत्तर, पर्याय आमच्यासोबत शेअर करा…

———–

ही गोष्ट आहे एका कलावती, रुपवतीची !  लहानपणी ही रूपा दिसायची अगदी बाहुलीसारखी. सुंदर चित्रं काढायची. हातात कला होती तिच्या. वयात आल्यावर तरुण तिच्याभावती रुंजी न घालते तरच नवल. त्यातला एक तिचा चांगला मित्र झाला आणि  कॉलेजचे दिवस सरताना त्याने तिला मागणी घातली. तिने घरच्यांना सांगितले. त्यांनी चौकशी केली तेव्हा कळले की मुलाचा धाकटा भाऊ मतिमंद आहे. रूपाचा मित्र आयुष्यभर त्याला सांभाळणार होता. रूपानेसुद्धा तयारी दाखविली होती. घरचे म्हणाले, हे आनुवंशिक असले तर?  नात्यातल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला.  ते म्हणाले, टाळा. सगळीकडून दबाव टाकण्यात आला.  रूपा गोंधळली. मैत्रिणी म्हणाल्या, घरच्यांचे ऐक. मग रीतसर दाखवून एका डॉक्टरांच्या इंजिनियर मुलाशी तिचे लग्न लागले.

नवरा प्रेमळ होता. तिचे कौतुक करायचा पण त्याला कलेत गती नव्हती. सासरे नामांकित डॉक्टर, व्यवसाय जोरात आणि पैसा पुष्कळ. मुलाने नोकरी सोडली आणि क्लासेस सुरु केले. रूपाने कालांतराने दोन मुलांना जन्म दिला. पण तिला कलेची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. एका नवीन सुरु होणाऱ्या शाळेत ती दाखल झाली आणि अहोरात्र झटून तिने शाळेच्या कामात झोकून दिले. सासूने नाके मुरडली तरी घरून तिला पाठींबा होता आणि नवऱ्याला कौतुक होतेच.

शाळेचे नाव झाले आणि तिची एक ओळख निर्माण झाली. आत्मविश्वासाने ती निर्णय घेऊ लागली. पालकांच्या प्रश्नांना सामोरे जाऊ लागली. तिचे विश्व विस्तारत होते आणि तिचा नवरा मात्र घरात आणि क्लासेसमध्ये गुंतून पडला होता. मुले मोठी होत होती आणि रूपाचा घरातल्यांशी संवाद कमी होत चालला होता.

अशा स्थितीत एक व्यक्ती तिच्या जीवनात आली. परदेशातून परतलेली श्वेता तिच्या मुलाचा प्रवेश घेण्याच्या निमित्ताने तिला भेटली. विचार सारखे आचार सारखे म्हणून दोघींच्या तारा जुळल्या आणि रुपाची चांगली गट्टी जमली. त्याच सुमारास व्यवस्थापनाशी मतभेद होऊन रूपाने शाळा सोडली. श्वेताबरोबर काही व्यवसाय करायचे ठरले. नवऱ्याचा पाठींबा होताच.

दोघींची घसट वाढत होती. रुपाला श्वेताच्या सहवासात वेगळी जाणीव होऊ लागली होती. स्वतःच्या आवडीनिवडीबद्दलचा श्वेताचा निःसंकोचपणा  तिला भावला होता. रुपाशी तिचे वागणे हळुवार होते आणि श्वेताने तिला शरीराला स्वीकारायला शिकवले होते. श्वेताचा स्पर्श मुलायम होता आणि रुपां  मोहरून जात होती. हे सारे तिला नवीन होते. नवऱ्याकडून हे सुख तिला मिळाले नव्हते. या लैंगिक संबंधांमध्ये काही गैर नाही असे श्वेता तिला पटवून देत होती.

व्यवसायामुळे श्वेताबरोबर वेळ घालवण्याचे चांगले निमित्त रुपाला मिळाले होते. रुपाची लक्षणे ‘ठीक’ नाहीत हे सासू सासऱ्यांच्या लक्षात येऊ लागले होते.  त्यांनी रूपाचे घराकडे होणारे दुर्लक्ष तिच्या आई वडिलांना सांगितले. पण “ती आमचे ऐकत नाही ” असे त्यांनी सांगितले.  मुलांच्या शिक्षणाव्यतिरिक्त कशात रुपाला रस उरला नव्हता. श्वेता आणि तिचा मुलगा एवढेच तिचे आता कुटुंब बनले होते.

रूपाचा नवरा हताशपणे आपल्या आयुष्याकडे पाहत बसला होता. रुपा-श्वेताच्या ‘समपथिक’तेची त्याला जाणीव झाली होती पण हे बोलणार कुणाशी? मुले एक दोन वर्षात नोकरीला लागली की फारकत घ्यायची असा तो विचार करत होता. रूपाचे काम गटांगळ्या खात होते पण ती श्वेताच्या सहवासात रमत होती.

श्वेताबरोबरचे समाजाला पचनी न पडणारे संबंध एका बाजूला अन कुटुंब-मुले यांची जबाबदारी दुसरीकडे, स्वत:ची सर्जनशीलता कामी आणण्याची ओढ दुसऱ्या बाजूला…

आता तुम्हीच सांगा काय करायचे… 

Comments are closed.