गोरा रंग दो दिन में ढल जायेगा…

1,185

पारगावच्या कमळी आणि मंजुळी एकदम पक्क्या मैतरणी. एक राहती वरल्या आळीत आन् एक खाल्ल्या. त्यांच्या गप्पा ऐकू या.
(कमळी – क., मंजुळी – मं.)

क. माय मंजुळे, तुला समजलं का गं?

मं. काय ते?

क. आगं, रुक्सानाभाभी हाय ना तिच्या पोरीनं दुकान सुरू केलंय तालुक्याला.

मं. मंग? आमच्या ननदबाईचं बी हाय. बी अन्‌ खताचं.

क. आस्सं? मग खादच लाव माय तोंडाला.

मं. काय बी काय बोलतीस गं?

क. मंग, मानसाला नीट सांगू द्यावं का?

मं. बरं बाई… बोल.

क. आगं भाभीच्या पोरीनं दुकान टाकलंय. तिचं ब्युटी पार्लर होतं की नाई… आता दुकान बी सुरू केलंय. कसली कसली किरीम अन्‌ पावडरी आनल्याय्‌त माय. जरा लावल्या का लगीच गोरी पान. आमच्या शेजारनीच्या धाकल्या बहिनीचं लगीन होतं म्हनून समद्या बाया गेलत्या. फेशल, मेक अप करून नवीन कोनची तरी पावडर लावून का जर आल्या… अगं, तुला सांगते संगीता तर वळखूच यीना गेली बंग. निस्ती गोरी चिट.

मं. अस्सं? मंग तुमी बी लावनार हाय का आता?

क. अगं त्येच सांगाया आले व्हते ना? मी बी आनलीये एक किरीम. सात दिवसात एकदम गोरं होतं त्यानी. तुज्यासाठी बी आनलीया येक. नवी जाहिरात पाह्यली न्हाईस का?

मं. कोनची?

क. अगं त्ये न्हाई का त्ये? एक पोरगी असती. आन्‌ तिला नोकरी मिळत नसती. दिसायला काळी. कुनी घ्यावं माय कामावर? तिच्या बापाला लईजडीबुटीची अवशिदं माहित राहतेत. त्यो देतो तिला एक किरीम. आन्‌ मंग काय थेट सिनेमातच जाते माय. अश्शी जादू हाय त्या ट्यूबची. फकस्त सात दीस लावायची.

मं. अस्सं का? म्हंजी तुजा सिनिमा यायाला काय वेळ लागायचा न्हाई. कोन हाय हिरो? पाटील का अजून कोन?

क. मंजुळे, लई म्हंजी लईच चाबरी हाइस बग. मला कुटं जायाचं हाय त्या सिनेमात? मी आपली अशीच चांगलं दिसाया लावनार हाये.

मं. पर महाग असंल न्हवं.

क. हाय तशी. पर त्यांची काय तर आफर हाय म्हनं. बचत गटाच्या बायांकडं देनार हायता एजन्सी. त्यातून सस्तात मिळतील.

मं. अस्सं का? गटाच्या बाया लगोलग वळखू येतील आता. समद्या गोऱ्या पान.

क. ऱ्हाऊ दे उगा. मस्करी करू नगं. सस्ताच्या बी हायता. चार रुपयाची ट्यूब सात दीस जाती बग.

मं. पर कमळे खरंच होतंय का गोरं ते पहा बई, न्हाई तर त्या संभ्याच्या बाईवानी व्हायाचं.

क. तिचं काय अजूक?

मं. तुला ठावं न्हाय का? आगं, काळी हाय न्हवं… लगीन जमंना झाल्तं. म्हनून तिला कोन तरी आनून दिल्या व्हत्या माय क्रीम अन्‌ पावडरी. लावीत असंल गोरं हुईल म्हनून. मंग संभ्याची सोयरीक ठरली तवा जरा जास्तच लावली म्हनं क्रीम का काय. हळदीच्या दिवशी पहायचं व्हतीस. समदा चेहरा लालेलाल अन्‌ धब्बे. जरा हळद सइन हुइना गेलती. दवाखान्यातून अवशिद आनलं तवा बरी झाली बाई. हाये ते तोंड अजूकच काळं पडलंय बिचारीचं. म्या तर म्हन्लं कशापायी करावा असला खटाटोप ?

क. कशापायी म्हंजी? लगीन कसं ठरावं?

मं. काळ्या पोरींचं कठीनच हाय माय. समदं चांगलं असतं पर लोक बी रंगच पाहतेत आन्‌ न्हाई म्हनून सांगतेत. आता रंगाचं का हाय गं इतकं? उना तानात राबून, रानानी काम करून गोरं कसं रहावं माय?

क. आगं त्येच्यासाठी तर हायता किरीम आन्‌ साबन.

मं. अन्‌ एवडं सांगायलीस मला. किती बाया रोज लावित्यात. काय बी होत न्हाई त्येंच्या रंगाला. उगा जाहिरात करायची आन्‌ इकत घ्याया लावायचं असला धंदा हाय. अन्‌ आता तर काय गड्यावाला बी गोरंच व्हायचं याड लागलंय.

क. आता सिनेमात गोरेच ऱ्हातात बग हिरो.

मं. ऱ्हानारच की. त्यांना का कुटं खड्डे खांदायचेत का दारी धरायच्यात? त्यांच्या बाप जन्मात कोन केली न्हाइत अस्ली कामं म्हनून पोरं बी गोरीच हायता. त्येंचं बगून आपुन बी त्यांच्यामागं कुटवर धावावं कमळे?

क. पर मंजुळे, कुनी बी पोरगा बग. समद्याला गोरी पान बायकूच हवी असती, सिनेमातल्यावानी.

मं. असंना का. पर आपुन नी आपला चेहरा फकस्त कुना दुसऱ्यासाठी हाय का? आन्‌ गोऱ्या पोरीच सुंदर ऱ्हातेत असं कुनी सांगिटलंय्? बगनाऱ्याच्या नजरंवर असतं समदं. नजर बदलली तर परतेकाच्याच चेहर्‍यात काय तरी चांगलं भेटतं बग.

क. मंग किरीम घेत न्हाईस म्हन की…

मं. न्हाई बई. काय बी लावून जानारा रंग न्हाई आमचा. येकदम पक्का हाय. अन्‌ हाय त्योच ब्येस हाय. समजलीस?

 

 

Comments are closed.