ट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य 

1,611

लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करताना रक्त आलं नाही तर ती ‘सेकंड हॅण्ड माल’ आहे, असा शेरा सर्रास तिच्यावर मारला जातो. याच्यावरून लग्न मोडल्याचेही प्रसंग आहेत. काही जातपंचायतींनी कौमार्य चाचणीचे कठोर निकष लावले आहेत. कौमार्य चाचणी उत्तीर्ण असेल तरच लग्न होईल वगैरे अटी आहेत. या कौमार्य पुराणातून अनेक हिंसक गोष्टी घडतात. बाईच्या व्हर्जीनीटीला-योनीशुचितेला आत्यंतिक महत्त्वाचा भाग मानलं जातं. याभोवती तर नातेसंबंध आकाराला येतात.

आपल्या उदात्त,भव्य-दिव्य संस्कृतीचं जतन करण्याचं काम स्त्रीचं आहे, असं आपण मानत आलेलो आहोत. या सा-यावर उपाय म्हणून एक अत्यंत विचित्र बाब अलीकडेच समोर आली.

अमेझॉन या ऑनलाईन दुकानात ‘फेक ब्लड कॅप्सुल’ हे प्रोडक्ट विक्रीसाठी आले. स्त्रीला तिची व्हर्जिनीटी सिद्ध करण्याकरता मदत करणारी गोळी, असं सांगत या कॅप्सुलची जाहिरात होते आहे. ही कॅप्सुल घेताच सेक्सनंतर रक्त येईल, वगैरे गोष्टी म्हटल्या जात आहेत. वैद्यकीय तथ्य काय, त्याचे फायदे-तोटे काय, हा वेगळा मुद्दा आहे;पण या प्रकारे एखादं प्रोडक्ट बाजारात येतं तेव्हा तरी आपण २०१९ मध्ये आहोत आणि तरीही व्हर्जीनीटीच्या मध्ययुगीन खुळचट कल्पनांमध्ये रुतून बसलो आहोत, हे कळायला हवं. फेक, खोटं रक्त आणता येईल;पण फेक प्रेमाचं काय करता येईल ?

नात्यांमध्ये जेव्हा विश्वास नसतो, प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची स्पेस नसते तेव्हा अशा प्रोडक्टसची आवश्यकता भासणं स्वाभाविक आहे. तो तिला, ती त्याला फसवत राहील;पण यात नक्की कोण फसेल ? आपण स्वतःच फसत चाललो आहोत, हरत चाललो आहोत, हे कसं कळेल ? सारे आवंढे गिळून ती नकली हसू आणेल किंवा तो उगाच तिच्या सुरात सूर मिसळत दोन अश्रू ढाळेल;पण आपण आपल्याशी प्रामाणिक नसू तेव्हा या सा-या नाटकाचा अर्थ काय ? ‘मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया’ अशी सारी आपली गत झाली आहे. रडण्याकरता, हसण्याकरता माणसं नियुक्त करावी लागतील किंबहुना तशी माणसं असतील तर आता आश्चर्य वाटायला नको, अशा स्थितीत आपण आहोत.

प्रत्येक वेळी आपण खरं बोलू शकत नसतो, हे अगदी खरंय;पण कुठंतरी खरं बोलण्याची स्पेस असली पाहिजे. त्याला तिच्याशी, तिला त्याच्याशी किंवा स्वतःला स्वतःशी तरी खरं बोलण्याचा अवकाश असला पाहिजे. खोटं रक्त आणता येईल, नक्राश्रू आणता येतील;पण तोवर बावनकशी खरेखुरे असणारे आपण हरवलेलो, संपलेलो असू; त्याचं काय ? हे प्रश्नचिन्ह मोठं गंभीर आहे. आपल्याला आरशात पाहताना भीती वाटता कामा नये. आरशातल्या आपल्या प्रतिमेला भिडता आलं पाहिजे. स्वतःलाच काय खोटं खोटं पटवणार आपण ?

लाय डिटेक्टर लावूनही सत्य सापडतच असं नाही;पण डोळ्यांच्या सरोवरात ते दिसू शकतं. नार्को टेस्ट घेऊन ते गवसेल असं नाही;पण श्वासांच्या बदलणा-या लयीत ते असू शकतं. फोटो, स्क्रीनशॉट, व्हिडीओ असूनही हाताला लागणार नाही सत्य;पण शरीरभर पसरलेल्या कंपनात सत्याचे अंश असू शकतात.

‘नही चाहिए सेकंड हॅण्ड जवानी’ असं गाणं म्हणताना जगण्यात ठायीठायी असलेल्या खोटेपणाला नाकारता येतं का ? क्रॅश व्हर्जन नको, लायसन्स कॉपी हवी असा आग्रह धरताना आपल्या स्वतःची भ्रष्ट आवृत्ती निर्माण होत नाही ना, हे काळजीपूर्वक पहायला हवं. व्हर्जीनीटी तपासता येईल कदाचित किंवा लपवताही येईल;पण स्वत्वाची, सत्याची लिटमस टेस्ट कशी घेणार ?  या लिटमस टेस्टमध्ये पास होता आलं तरच तुकारामांच्या मागे उभा राहून ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही/मानियले नाही/ बहुमता’ म्हणत कोरसमध्ये सामील होता येतं.

-श्रीरंजन आवटे (shriranjan91@gmail.com)

आपलं महानगर, सारांश, १७ नोव्हेंबर २०१९

इतर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या :

लोकसत्ता : https://www.loksatta.com/mumbai-news/massive-sales-of-deceptive-pills-that-prove-virginity-akp-94-2018535/ 

सकाळ:

https://www.esakal.com/mumbai/fake-hymen-pills-are-freely-sold-online-236954?fbclid=IwAR2Yb9lCRrNu_hO6OHoyEzxTg13hoWUWanT9h7Vf-fffi4hClVx7IUPwg8o

सोशल मिडिया वर खूप सा-या लोकांनी या प्रोड्क्टबद्दल संंताप व्यक्त केल्यामुळे सध्यातरी अमेझॉनने हे मागे घेतले आहे. पण महत्वाचे म्हणजे हे प्रोडक्ट विक्रीस येण्यामागची आपल्या समाजाची बाईकडे व तिच्या शरीराकडे पाहण्याची मानसिकताच जबाबदार आहे.  आता हीच वेळ आहे पुन्हा लक्षात घेण्याची की, बाईच्या शरीरावर बाईचाच  हक्क आहे.  अन्यथा हेच खरं ठरेल की अशी मानसिकता असणारे आपण माणुस म्हणुन घेण्यासच अपात्र आहोत. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.

Comments are closed.