‘चि. व चि. सौ. का.’च्या निमित्ताने- सचिन, निशा

3,476

‘चि. व चि. सौ. का’ या चित्रपटाची सुरवातच खरं तर गमतीशीर आणि विचार करायला लावणारी आहे.  रजिस्टर ऑफिसमध्ये एकमेकांशी एकदम गुडी-गुडी बोलणारं जोडपं म्हणजेच सत्याचा ‘मित्र’ आणि सावीची ‘मैत्रीण’ लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशीच एकमेकांशी कडाक्याने भांडत आहेत. भांडणाचं कारण काय तर एकमेकांच्या सवयी. परस्परांच्या काही सवयी त्यांना माहिती नव्हत्या आणि काही सवयी लग्नानंतर बदलतील असं गृहीत धरलं होतं. असं गृहीत धरलं होतं की, लग्न झाल्यावर बदलेल. या घटनेविषयी बोलताना सावीची एक मैत्रीण म्हणते देखील, ‘अजून पायाचं प्लॅस्टर देखील निघालं नाही आणि यांचं लग्न मोडलं!’

या घटनेनंतर मात्र सावी अस्वस्थ होते. वाढणारे डिव्होर्सचे प्रमाण आणि अयशस्वी लग्न यामुळे ती लग्न या नात्याकडे अधिक जागरुक होऊन पाहतेय. त्यातच सावित्रीला सत्यप्रकाशचं स्थळं येतं. सत्यप्रकाश हा नवनवीन प्रयोग करून पाहण्यात अधिकच उत्सुक असतो. “लग्नाआधी अशारीरिक एकत्र राहून पाहीन आणि मगच लग्नाचा निर्णय घेईन”, अशी ही सावीची अट. या साविच्या अटीला सत्याची देखील साथ मिळते. सुरवातीला मुलांच्या या पोरकटपणाला नाही म्हणणारे पालक, आपली मुलं स्वत:च्या मतावर ठाम आहेत हे लक्षात आल्यावर या गोष्टीसाठी तयार होतात.

या चित्रपटातील विशेष भावलेलं पात्र आणि गोष्ट म्हणजे सत्याची ‘आज्जी’, तिचं एका विधुराची असलेलं नातं  आणि नंतर लग्न. या प्रवाहाच्या विरुद्ध नात्याचा कुटुंबाकडून सहजतेनं स्वीकार. समाजाला खूप विचार करायला लावणारा हा विषय अतिशय हळुवारपणे हाताळला आहे.

वृद्धापकाळात देखील जोडीदाराची गरज भासू सकते आणि या वयातील सहजीवनाचे महत्व याबद्दलचे विचार यानिमित्ताने मनात येऊन गेले. एकंदरीत जुन्या नव्याला जोडणारी ही सगळी पात्र फारच इंटरेस्टिंग आहेत.

आता ‘फक्त व्हेगन’ या मुद्यावर ते एकत्र राहायला लागतात. दोघांचाही एकत्र राहून बघण्याचा निर्णय घेतात. अगदी टोकाचे असणारे हे दोघे ए. सी. सारख्या मुद्द्यावर कायमस्वरूपी अॅडजस्ट  करू शकतील का? सावीला केबलवाला, रिक्षावालासुद्धा तिला शाकाहारीच लागतो. शाकाहारी केबलवाला मिळाला नाही म्हणून घरात केबल पण नाही. एकपरी सत्या अॅडजस्ट  करेल पण त्याच्या घरचे आणि त्याच्या घरचे वातावरणाचं काय ? त्यातही इथंपर्यंत ते दोघेही अॅडजस्टमेंट दाखवायला तयार होतात. दोघांनाही एकमेकांच्या कामात एकमेकांची मदत होते. सत्याच्या टेक्नॉलॉजी मुळं सावीचं काम जोमानं सुरु होतं आणि सावीच्या सडेतोड बोलण्यानं  सत्याची रखडलेली कामं पटापट व्हायला लागतात. त्यामुळं तसं दोघं पूरक वाटायला लागतात. (निदान काही बाबतीत तरी!)

सत्याच्या पार्टीतलं नॉनव्हेज जेवण सावीने पाहिल्यानंतर दोघांमध्ये त्यावरून कडाक्याची भांडणं होतात. हा प्रसंग पाहिल्यावर असं वाटतं की, ‘बस्स, आता निर्णय झाला. या दोघांचं एकमेकांशी पटणं अशक्य आहे’ पण दोघांनाही एकमेकांचे बरेच मुद्दे पटायला लागतात शिवाय त्यांची भावनिक गुंतवणूक देखील व्हायला लागते. चित्रपटाच्या शेवटी दोघेही एकत्र सहजीवन सुरु करण्याचा निर्णय घेतात. संसाराच्या पलीकडे जाऊन ‘सहजीवन’ हा इतका गोड शब्द मराठी चित्रपटात पहिल्यांदाच ऐकायला मिळाला, असे म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

समाजातील पारंपारिक विचारांना वैचारिकतेच्या पातळीवर घेऊन जाणारा, युवा पिढीच्या मतांचं प्रतिनिधित्व करणारा, पहिल्यांदा संसाराच्या जागी सहजीवनाची संकल्पना मांडणारा असा हा चित्रपट आहे. चित्रपटातील मुद्दे आम्हाला महत्वाचे वाटतात, त्यावर त्यांनी काढलेले सोल्युशन्स  किंवा त्यांनी घेतलेला निर्णय हा ‘योग्य कि अयोग्य’ हा भाग वेगळा. चित्रपट असल्या कारणाने पॉझिटीव्ह शेवट दाखवणे, मध्ये मध्ये रंजकता आणण्यासाठी काही गोष्टी अतिरेक दाखविणे, इत्यादी मर्यादा आपण लक्षात घेऊयात. तरीही ‘सासू सुनेचा छळ’, ‘कौटुंबिक वाद’ याच्या पलीकडे जाऊन अधिक सकारात्मक विषय चित्रपटामध्ये चर्चिले जात आहेत हे जाणवतंय.

मित्र मैत्रिणींनो, आपल्या युवापिढीचं नेतृत्व करण्याऱ्या या युवारत्नांनी म्हणजेच सावी आणि  सत्या या दोघांनी स्वतःचा जोडीदार कसा असायला हवा आणि जोडीदार निवडीची प्रक्रिया कशी असायला हवी हे ठरवलंय. बहुतांश तरुणवर्ग आता या सगळ्याकडे अगदी डोळसपणे पाहतोय. आजच्या लग्नाळू मुलामुलींना देखील स्वतःचा जोडीदार डोळसपणे निवडायचा आहे.  तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही या सगळ्याकडे डोळसपणे पाहताय ना? काहींनी आपला जोडीदार डोळसपणे निवडला देखील असेल. तुमचे अनुभव आम्हाला tathapi@gmail.com या ई-मेल वर नक्की कळवा.

– सचिन निशा

चित्र साभार: http://marathistars.com/movies/chi-va-chi-sau-ka-2017-marathi-movie/

 

Comments are closed.