पहला पहला प्यार है… – अच्युत बोरगावकर

1,112

कॉलेजात मला सर्वजण बारक्या म्हणायचे. मी दिसायचोही बारकाच. उंची कमी, वजनही कमी आणि बाकी फीचर्सही असेच अगदी साधारण, आठवी-नववीत असल्यासारखे.

माझं कॉलेज हे शहरातील तिसऱ्या क्रमांकाचं महाविद्यालय समजलं जायचं. म्हणजे पहिल्या दोन महाविद्यालयात ज्यांना प्रवेश मिळायचा नाही ते या तिसऱ्या क्रमांकाच्या महाविद्यालयात यायचे. ही एक वेगळी अलिखित विषमताच पाळली जायची माझ्या शहरात. (माझा शालेय जीवनापासून ते एकूणच आयुष्यातला परफॉर्मंस असाच तिसऱ्या क्रमांकाचाच राहिला आहे.) शिवाय आणखी एक अतिच सुटसुटीत जातीप्रथा माझ्या वेळेस होती ती म्हणजे तुमच्या टक्केवारीवरून सायन्स, कॉमर्स की आर्टस हे शब्दशः ठरवलं जायचं. म्हणजे ७५ च्या पुढचे ‘प्रतिष्ठित’ सायन्सलाच जायचे. एवढे टक्केवाला चुकूनही आर्टस शाखेशी रोटी-बेटी व्यवहार करणार नाही. म्हणजे तशी बोदच नाही. ६० ते ७५ टक्केवाला आणि त्यातही वाणी, मारवाडी, सिंधी या जात समूहांमधील असेल तर कॉमर्स. उरलेले आर्टस् शाखेला. अपेक्षेप्रमाणे मी आर्टस् घेतलं. कारण मला आणि माझ्या हितचिंतकांना (पालकांना) एवढाच पर्याय माहित होता. असो. तर या एकूण समांतर जातव्यवस्थेचा फायदा म्हणजे माझ्या महाविद्यालयात असे सर्व ‘असिलेक्टलेले’ अठरा पगड, ग्रामीण-शहरी जात समूह जाम भरलेले.

आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे वर्गात मुली खच्चून भरलेल्या. अगदी एकाच वर्गात! एक-दोन बेंच सोडून बसलेल्या. आम्ही मुलं सुसाट, काय करावं हे न समजून फूल बावचळलेली. म्हणजे  खेड्या पाड्यातून जिथे मुली सातवी पर्यंत वगेरे शिकून लग्न करून गायब व्हायच्या तिथून आलेली मुलं इतक्या मुली पाहून थोडी बावरलेलेच आणि त्यात मुली इतक्या कॉन्फीडंट की त्याचंही दडपण! पहिला महिना तर एकूण परिस्थिती समजून घेण्यातच गेला. सायकॉलॉजी नावाचाही विषय असतो हे माहित नसतानाही काही मुलांनी तो घेतलेला. अकरावीला सर्व मुली झाडून सायकॉलॉजीला. पहिल्यांदा मुलं घाबरली. कित्येकांनी विषय बदलण्यासाठी अर्ज केला. थोडं ‘शहाणपण’ आल्यानंतर परत सायकॉलॉजीला मुलांची गर्दी. काहीही चाललेलं.

यथावकाश आम्ही स्थिर-स्थावर झालो. सुंदर असल्या म्हणून काय झालं, आपल्याइतकेच टक्के घेवून मुली आल्या आहेत हे कळल्यावर थोडा धीर आला. सहामाही परीक्षा येईपर्यंत आमचा नवा ग्रुप इतका स्थिरावला होता की ग्रुपमधील काही मुलांनी ‘जोड्या लावा’ कार्यक्रम चालू केलेला. माझी जोडी एका मुस्लिम मुलीशी लावली गेली. मला ‘जगण्याचं कारण’ सापडल्याचा आनंद! आई-वडीलांनी दहावीपर्यंत शिकवलं याचं मला पहिल्यांदाच मोल वाटलं. धर्म-जाती-रूढी खोट्या आहेत हे पहिल्यांदाच पटलं. मी पूर्ण निधर्मी झालो. कधी कधी तर बाळासाहेब ठाकरेवर टीका करायला लागलो. हे ऐकून पोरं चिडायची हे वेगळं.

पण इथेही मी तिसराच होतो. वेळ गेला तसं कळलं, तिच्या तथाकथित प्रेमात इतर दोन मुलं आहेत. त्यात भर म्हणजे ती दोघंही मुस्लिम. त्यातला एक एरियाचा डॉन वगैरे. त्याने दुसऱ्याला तिच्यावर प्रेम करतो, यावरून मारलं वगैरे, अशा गोष्टी कानावर आल्या. (अशा गोष्टीत सहभाग वगैरे तर दूरच पण साधा दर्शक होणंही माझ्या आवाक्यातील गोष्ट नव्हती).

हे माझं पहिलं प्रेम. एकतर्फी. आपल्या वर्गातील असंख्य मुलांमध्ये माझ्यासारखा ‘बारका’ समजला जाणारा एखादा मुलगा आहे ज्याला आपण बेहद आवडतो याची कल्पना त्या मुलीला असण्याची सुतराम शक्यताच नव्हती. पण मी भयंकर स्टेडी होतो. फूल फोकस्ड. अविचल. माझं कॉलेजातील पूर्ण रुटीन या एकाच गोष्टीभोवती फिक्स झालेलं. माझ्या सर्व वह्या-पुस्तकांवर, घराच्या भिंतींवर-पायऱ्यांवर इतकंच काय हाता-पायांवर तिच्या नावाचे इनिशियल लिहिलेले, तिचे सर्व विषय माझे, ती जो तास बुडवायची तो मीही बुडवायचो, तिची ट्युशन ती माझीही ट्युशन, तिच्यासोबतच (थोडं अंतर राखून, मागे वगैरे) मी ट्युशनला जाणार, परतताना तिच्यासोबतच, जेव्हा ती कॉलेजात यायची तेव्हा मी गेटात स्वागताला हजर, ती जाताना मी दु:खी वगैरे.

एकदा इंग्रजीच्या प्राध्यापक बाईंनी माझी उत्तरपत्रिका वर्गात वाचून दाखवली. आदर्श उत्तर कसं लिहावं, असं काही त्या बोलल्या. सर्व वर्गात माझं नाव. मी असाही हवेतच होतो. त्यात आणखी एक फुंकर. ग्रुपला कटिंग चहा पाजावा लागला. दुसऱ्या दिवशी वर्गात त्या मुलीने माझी उत्तरपत्रिका मागितली. मी म्हणालो उद्या देतो. पहिलंच संभाषण. पोरांना परत कटिंग चहा. मी घरी आलो. उत्तरपत्रिका काढली. सविस्तर बसून, ठळक दिसणार नाही अशा प्रकारे, तिच्या इनिशियलमधील अक्षरं उत्तरपत्रिकेत जिथे जिथे आली होती तिथे तिथे अंडरलाईन केली. दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका दिली. उत्तरपत्रिका परत मिळेपर्यंत जिवंत राहिलो एवढंच म्हणता येईल. उत्तरपत्रिका साभार परत मिळाली. अगदी सहज. मीही सहज झालो. मलाही अधिक अपेक्षा नव्हतीच. तिला तर नव्हतीच नव्हती.

बारावीची परीक्षा इमानदारीत अभ्यास करून दिली. उत्तमपणे पास झालो. मी डी.एड. ला गेलो. ती बीएला गेली. मी विचार केला ‘लेट्स मूव्ह ऑन’ (अशा वेळीच इंग्रजी मदतीला येते). काही दिवसांनी तिच्या लग्नाची बातमी आली. मी म्हणालो ‘गुड’ तर डी.एड. च्या दुसऱ्या वर्षाला ती परत समोर हजर. बीए सोडून डी.एड. ला. पोरांना म्हटलं हा शेवटचा कटिंग चहा.

4 Comments
 1. अच्युत, खूप सुंदर लिहिलंय. खूपच रोमांचक पद्धतीने लिहिले आहे. सुरुवातीपासून वाचनात गुंगलेले डोळे शेवटावर येऊन थांबतात.
  मलाही माझ्या कॉलेजचे दिवस डोळ्यासमोर तरळले. माझ्या कॉलेजमध्येही तेच सूत्र होतं, मी गणित आणि सायन्समध्ये फारशी कामगिरी करणार नाही असे माझे गुरुजन आणि वडील यांना वाटले तसेच भाषा चांगल्या म्हणून आर्टसला गेले..असो.

  तू तुझं पहिलं एकतर्फी प्रेम कोणतही हिंसक वळण लागू न अतिशय सकारात्मक घेऊन कटिंग चहावर भागविल हे कौतुकास्पद. पण बऱ्याचदा तरुण मुलं एकतर्फी प्रेम हा अधिकार मानतात आणि त्यास ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रेम ही आपोआप होणारी गोष्ट आहे, ती जबरदस्ती मिळू शकत नाही हे मुले आणि मुलीनीही वेळीच समजून घेतले तर पुढचे अनेक अनर्थ टळतील.

  आणि, हो त्यापुढील स्टोरी वाचायला मिळायला हवी असे शेवट वाचल्यावर कुणालाही वाटेल, अगदी मलाही वाटले.

  1. I सोच says

   खरं आहे लक्ष्मी.. एकतर्फी प्रेम आणि त्याला लागणारे हिंसक वळण हा खरंच खूप गंभीर प्रश्न आहे… वेबसाईटच्या माध्यमातून आपण याबद्दलही एक सकारात्मक दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न करत आहोतच… आशा आहे की, काही तरुणांमध्ये तरी आपण सकारात्मक मुल्ये रुजवू शकू…

 2. डॉ. राहुल कांबळे says

  अच्युत दा खुप छान मांडणी केलीय तुम्ही. काॉलेजचे ते दिवस मस्त रेखाटले आहेत. पहिलं प्रेम तेही प्रस्थापित समाजबंधनांच्या विरोधातलं, अगदी लैला-मजनू सारखं पण एकतर्फीची जाणीव, मला खात्री आहे सगळ्यांच्या डोळ्यांपुढे त्यांचे महाविद्यालयीन जीवन नक्कीच तरळनननार हा लेख वाचल्यानंतर. याचा पुढचा भाग पण वाचायला मिळायला हवा आम्हांला….

  1. I सोच says

   अच्युत पुढचा भाग लिहिल की नाही माहित नाही पण आपल्याला माहितेय, जवळजवळ प्रत्येकाची अशी एक गोष्ट असते… एकतर्फी प्रेमाची नसेल पण आणखी काही… जुन्या आठवणी… वेबसाईट हा एक छान स्पेस आहे… कुणी लिहिणार असेल तर नक्की लिहा…

Comments are closed.