महिला हिंसा विरोधी पंधरवडा : तुम्हाला हे माहित आहे काय ?

2,105

१९९१ साली अमेरिकेत आयोजित ‘पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला लिडरशिप कार्यशाळेत’ महिला आणि मुलींवरील हिंसा विरोधी मोहिमेची सुरुवात झाली. महिलांवर होणारी कुठलीही हिंसा, मग ती शारीरिक असो की मानसिक, आर्थिक असो की भावनिक ही मानवी हक्कांचे उल्लंघन आहे हे अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या पंधरवड्याची, म्हणजेच २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, निवड केली गेली. जगभरातील महिला या दिवसांमध्ये स्त्रियांवरील हिंसेचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात आणि आपला आवाज बुलंद करतात. जगातील १३० पेक्षा अधिक देशातील महिला हिंसा विरोधी लढ्यात अग्रेसर हजारो संस्था आणि संघटना या पंधरवाड्याच्या माध्यमातून जनतेमध्ये जागृती करण्याचे आणि हिंसा विरोधी वातावरण तयार करण्याचे काम करतात.

या पंधरवड्याचे भारताच्या दृष्टीने वेगळे महत्व आहे, वेगळेपण आहे. आपल्या वाचकांच्या माहितीसाठी यातील महत्वाचे संदर्भ खाली दिले आहेत. आपल्याला याचा उपयोग होईल अशी आशा आहे.  

२५ नोव्हेंबर

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाविरोधी दिवस

१९६० साली डॉमिनिक संघराज्यात तिथल्या ट्रॉजिल्लो या हुकुमशहाने केलेल्या पॅट्रिया, मिनर्व्हा आणि मारिया या मीराबेल बहिणींच्या हत्येचा स्मृतिदिन म्हणून २५ नोव्हेंबर ओळखला जातो. तिथल्या हुकुशाहाने या बहिणींची हत्या केली कारण त्या वारंवार तुरुंगात जाऊन देखील या जुलमी राजवटीला विरोध करणं थांबवत नव्हत्या. १९६१ मध्ये तिथल्या जनतेने उठाव करून ही राजवट झुगारून टाकली आणि या बहिणींचा लढा त्यामागची एक मुख्य प्रेरणा होती. १९८१ साली बोगोटा (कोलंबिया) इथे पार पडलेल्या एका स्त्रीवादी संमेलनात हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला हिंसा विरोधी दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

२६ नोव्हेंबर

भारतीय संविधान दिवस

२६ नोव्हेंबर १९४९ साली भारताच्या संसदेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने निर्मित राज्यघटनेचा स्वीकार केला. भारतीय राज्यघटना ही देशातील प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, लिंग, वर्ण किंवा वर्ग निरपेक्ष आणि प्रत्येक सामाजिक भेदाच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे जगण्याचा, बोलण्याचा, आपले मत मांडण्याचा, काम करण्याचा आणि संचाराचा अधिकार देते आणि या सर्व हक्कांच्या सुरक्षेची हमी देते.

२८ नोव्हेंबर

महात्मा फुले पुण्यतिथी

दलित, शोषित आणि गावकुसाबाहेरील प्रत्येक बाई, पुरुषाचा आवाज म्हणजे महात्मा फुले. बाईला शिक्षणाचा अधिकार आहे हे सांगणारे आणि प्रत्यक्षात तो मिळवून देणारे ज्योतिबा फुले. एक युग प्रवर्तक माणूस. एक असा माणूस जो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक पुरुष शोषक, हिंसा करणारा नसतो किंवा व्यक्ती म्हणून बाईचा आदर करणं प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. बालविवाह आणि बहुपत्नीत्व अशा सरंजामी आणि जुनाट रूढींवर आसूड ओढणारे महात्मा फुले यांचे महिलांवरील हिंसा आणि विषमता विरोधी लढाईत मोलाचे योगदान राहिले आहे.

३० नोव्हेंबर

दक्षिण आशियाई महिला शांतता, न्याय, मानवी हक्क आणि लोकशाही दिवस

२००२ साली समानता, शांतता आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित एका चर्चासत्रात ज्यात भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशातील सहभागींचा समावेश होता. ३० नोव्हेंबर हा दिवस ‘दक्षिण आशियाई महिला शांतता, न्याय, मानवी हक्क आणि लोकशाही दिवस’ म्हणून पाळायचा ठरवले गेले. दक्षिण आशियाई देशातील महिलांना पितृसत्ताक व्यवस्थेसोबतच सिमावर्तीय आणि देशांतर्गत संघर्ष, धार्मिक आणि वर्गीय संघर्षाचा प्रचंड सामना करावा लागतो. हा दिवस या सर्व देशांच्या सामाजिक व्यवस्थेतील अंगभूत हिंसेला अधोरेखित करण्यासाठी, या विभागातील वाढत्या सैनिकीकरणाविरोधात बोलण्यासाठी आणि शांतता, लोकशाही, न्याय आणि सहिष्णुता ही मूल्य जपण्याच्या उद्दिष्टासाठी समर्पित आहे.

१ डिसेंबर

जागतिक एड्स दिन

एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्या व्यक्तींच्या अधिकार संरक्षणाच्या मागणीसाठी हा दिवस महत्वाचा आहे. एचआयव्हीचा जगभरातील प्रभाव आणि प्रसार रोखण्याच्या उद्देशाने १९८८ साली संयुक्त राष्ट्र संघटना आयोजित विविध देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून पाळण्याचे ठरवले गेले. कुटुंबातील एखाद्या सदस्याला एड्स आजार असेल तरी त्या कुटुंबातील बाईला खूप काही सहन करावे लागते. या सोबतच हा दिवस वेश्या व्यवसायातील महिला आणि भिन्न लैंगिक कल असणाऱ्या व्यक्तींना सामोरे जावे लागणाऱ्या भेदभावा विरोधात आवाज उठवण्याचे बळ देतो.

३ डिसेंबर

भोपाळ वायू दुर्घटना निषेध दिवस

याच दिवशी भोपाळमधील युनिअन कार्बाईडच्या कारखान्यात व्यवस्थापनाच्या गुन्हेगारी चुकीतून आयसोसायनाईट या जीवघेण्या विषारी वायूची गळती होऊन मानवी इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी औद्योगिक शोकांतिका घडली. शेकडो माणसं मेली, हजारो कायमची अपंग झाली अथवा जीवघेणे आजार त्यांना जडले. असंख्य माणसं रस्त्यावर आली. पुढच्या काळात कित्येक मुलं काही न काही अपंगत्व घेऊन जन्माला आली. आज तब्बल तेहत्तीस-चैतीस वर्षांच्या नंतरही या गुन्ह्यामुळे बाधित लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही.

जागतिक अपंगत्व दिन

जगभरातील अपंग व्यक्ती त्यांच्या विरोधातील भेदभाव आणि विषमतेच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि त्यांच्यासाठी अधिक मैत्रीपूर्ण परिसर आणि पर्यावरण असावा या मागणीसाठी याच दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित करतात. एखाद्या महिलेला जेंव्हा अपंगत्वाचा सामना करावा लागतो तेंव्हा तिचा संघर्ष अधिकच अवघड असतो. हा दिवस अशा महिलांच्या आणि एकूणच विशेषत्व असणाऱ्या व्यक्तींच्या अधिकारांच्या चळवळींना पाठींबा व्यक्त करण्याचा आहे.

६ डिसेंबर

भारतात बहुसंख्यांकातील धर्माभिमानी आणि धर्मद्वेष्ट्या टोळ्यांनी अल्पसंख्यांकांचे धार्मिक स्थळ म्हणजेच अयोध्येतील बाबरी मस्जिद याच दिवशी पाडली. देशभरात उसळलेली धार्मिक दंगल आणि वाढलेला अविश्वास, तिरस्कार आणि हिंसेच्या वातावरणाने देश ढवळून निघाला. हजारोंना आपले प्राण गमवावे लागले. आयोध्या आणि मग मुंबई, गोध्रा, गुजरात आणि मालेगाव… अशा अनेक ठिकाणी नंतरच्या काळात महिलांच्या शरीरांना लोकांनी धार्मिक युद्धाची भूमी बनवलेले आपण पहिले आहे.

याच दिवशी १९८९ साली कॅनडातील मॉन्ट्रिअल या शहरात एका माथेफिरूने अभियांत्रिकी शाखेत शिकत असलेल्या १४ युवतींना गोळ्या घालून ठार केले होते. त्याला या महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला नाही या कारणाने त्याने हे कृत्य केले होते. स्वतःला मारण्यापूर्वी त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली होती ज्यात त्याने स्त्रीवादी समूहांच्या विरुद्ध खूप गरळ ओकली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन

दलित आणि स्त्रियांचे अधिकार संविधानाच्या रूपाने सुरक्षित केले जाण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे. जे इतर अनेक देशात होऊ शकले नाही ते स्वतंत्र भारतात पहिल्या दिवसापासूनच पासूनच झाले. इतर देशात महिलांना आपल्या अधिकारांसाठी झगडा करावा लागला. भारतात महिलांचा संवैधानिक पद्धतीने समान दर्जा आहे.

१० डिसेंबर

आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन

१९४८ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आम सभेने जगभरातील सर्व राष्ट्र आणि नागरिकांचे स्वातंत्र्य व अधिकारांचा आदर राखला जावा या उद्देशाने ३० कलमी मानवी हक्कांची सनद जाहीर केली आणि तिचा स्वीकार केला. या सनदेचा आणि त्यातील कलमांचा ज्यात समानतेचा अधिकार, भेदभावापासून मुक्ती तसेच जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, वैयक्तिक सुरक्षितता आणि कायद्यासमोर समान असल्याचा अधिकार आहेत, जगभरातील सर्व देश आणि लोक आनंदाने स्वीकार करतात आणि ते अंगिकारतात.

 

आपल्याला ही माहिती कशी वाटली? आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की लिहा.

तसेच या लेखाची लिंक आपल्या इतर मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

 

Comments are closed.