लैंगिक आरोग्याबाबत मार्गदर्शन व HIV ची तपासणी मोफत

0 2,546

एच.आय.व्ही./ एड्सला आटोक्यात आणण्यासाठी गेली अनेक वर्षे निकराचे प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना यश देखील मिळते आहे. एच.आय.व्ही./ एड्स हा एक  सामाजिक आरोग्याचा एक प्रश्न आहे. त्याला २०३० पर्यंत पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी जे धोरण आखण्यात आले आहे त्याला ९०-९०-९० असे संबोधले जाते. याचा अर्थ असा की, एच.आय.व्ही. चा संसर्ग असलेल्यांपैकी ९०% हून जास्त जणांना त्याची कल्पना असेल, त्यांपैकी ९०% हून जास्त लोकांना उपचार मिळत  असतील आणि  नियमित उपचार घेत असल्यामुळे त्यांपैकी ९०% हून अधिकांच्या रक्तात एचआयव्ही विषाणूंचे प्रमाण नगण्य असेल; असे झाले तर ही साथ संपवणे नक्कीच शक्य आहे.

९०-९०-९० साधले तर साथ आटोक्यात येईल, हा विश्वास गेल्या काही वर्षातल्या संशोधनांच्या निष्कर्षांतून निर्माण झालेला आहे. आतापर्यंत, एच.आय.व्ही./ एड्सचा संसर्ग असलेल्या व्यक्तींना उपचार सुरू करताना, (या उपचारांना ए.आर.टी. म्हणजे एन्टी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट म्हणतात), ज्यांची प्रतिकार शक्तीची पातळी एका टप्प्यापर्यंत खाली आलेली आहे त्यांनाच हे उपचार सुरु केले जात. मात्र नवीन संशोधनातून असे लक्षात आले की,  निदान झाल्यावर लगेच उपचार सुरु केल्याने त्या व्यक्तीची तब्येत दीर्घकाळ उत्तम तर राहतेच, शिवाय अशा व्यक्तींच्या रक्तातील एच.आय.व्ही. विषाणूंचे प्रमाण अगदी नगण्य उरल्याने दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यताही अतिशय कमी होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, एच.आय.व्ही.चा संसर्ग  संसर्ग असलेल्या गरोदर स्त्रीने जर व्यवस्थित उपचार घेतले तर तिच्या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. नियमित ए.आर.टी. उपचार घेणारी व्यक्ती एच.आय.व्ही. असूनही अनेक वर्षे, म्हणजेच जवळपास सर्वसामान्यपणे एखादी व्यक्ती जितकी वर्षे जगेल तितकी वर्षे तर जगू शकतेच शिवाय दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यताही खूपच कमी होते.  उपचार लवकर सुरु केल्याने दुहेरी फायदा साधता येतो, याला  उपचारातून प्रतिबंध म्हणतात.

या औषधांचा आणखी एक उपयोग लक्षात आलेला आहे. ज्या व्यक्तींना आज एच.आय.व्ही./ एड्सचा संसर्ग नाही, परंतु काही कारणांनी संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त आहे  अशा  गटांतल्या व्यक्तींमध्येही औषधांनी एच.आय.व्ही.चा संसर्ग होण्याची शक्यता कमी करता येते. याला जोखीमपूर्व संरक्षण (Pre-exposure prophylaxis- PrEP) म्हणतात.

अशाप्रकारे एच.आय.व्ही./ एड्सला पायबंद घालण्याची क्षमता तर  संशोधनांनी आणून दिलेली आहे, मग अडचण कुठे आहे? अडचण अशी आहे की, आजही एच.आय.व्ही./ एड्सचा संसर्ग असलेल्यांपैकी जवळपास निम्म्या व्यक्तींना त्याची कल्पनाच नाही. त्यासाठी वर सांगितलेल्या मार्गाने जायचे तर पहिली पायरी म्हणून अधिकाधिक व्यक्तींनी स्वतःची एच.आय.व्ही. ची तपासणी करून घ्यायला हवी. एच.आय.व्ही./ एड्सबद्दल आजही भीतीचे आणि दूषणाचे वातावरण आहे, ते दूर व्हायला हवे. एच.आय.व्ही./ एड्सचा संसर्ग  असल्याचे कळल्यावर न घाबरता लवकर उपचार सुरु होऊन त्याचा, त्या व्यक्तीला आणि समाजाला देखील फायदा होईल.

प्रयास या संस्थेचा ‘आरोग्य गट’ गेली पंचवीस वर्षे एच.आय.व्ही./ एड्स विरुद्धच्या मोहिमेत सातत्यानी भाग घेत आला आहे. या वर्षीच्या १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त १ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत (सोमवार ते शुक्रवार ) सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० या कालावधीत प्रयासच्या अमृता क्लिनिकमध्ये एच.आय.व्ही./ एड्सची तपासणी मोफत करून मिळेल. त्याच बरोबरीनी ज्यांना बी (B) आणि सी (C) प्रकारच्या काविळीची व  सिफिलिस या आजाराचीही   तपासणी करून घ्यायची आहे, ती देखील मोफत होईल. या सर्व  आजारांवर देखील आता उपचार उपलब्ध आहेत. या तपासण्यांबाबत तसेच लैंगिकता व लैंगिक आरोग्याबाबतही मार्गदर्शन आणि समुपदेशन ही मोफत उपलब्ध आहे त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या.

अधिक माहितीसाठी:

  • संपर्क : ०२० २५४४१२३०, ८६०५८८५६४९, ९४२२०६०२४२.
  • पत्ता : प्रयास आरोग्य गट, कर्वे रोड, संभाजी पूलाच्या कोप-यावर, पुणे – ४११००४

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.